आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमात समर्थ शहाचा वाढदिवस साजरा

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख) नेरुळ येथील यूथकौन्सिल नेरुळ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कुमार समर्थ शहा या बालकाचा प्रथम वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा दिनांक ३० ऑगस्ट २४ रोजी पनवेल मधील चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमातील बालगोपाळांच्या समवेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. आश्रमाच्या छात्रावास प्रमुख सौ. प्रिया आचवल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात आश्रम केंद्रप्रमुख संदीप शिंदे, श्रीमती मैत्रई दाबके, यूथ कौन्सिलचे पदाधिकारी विक्रम राम, रमेश सुर्वे, रवींद्र कांबळे, सुभाष हांडे देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. हिंदुस्तान युनिलिव्हर लि. मध्ये कार्यरत असलेले व खारघर येथे वास्तव्यास असलेले समर्थ शहाचे वडील कौशल शहा यांनी सक्रिय सहयोग देऊन आश्रमातील मुलांसाठी गहू, तांदूळ, तूरडाळ, मुगडाळ, साखर, गोडतेल, खोबरेल तेलाच्या बोटल, साबण आदी गरजेच्या वस्तूंबरोबरच केक, चॉकलेट आदी वस्तू आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या. एकूण पस्तीस विद्यार्थी सदर आश्रमात वास्तव्यास आहेत.
    यूथकौन्सिल नेरुळच्या कार्याबरोबर स्वयंसेवकांचे कौतुक करून प्रिया आचवल म्हणाल्या की यूथ कौन्सिलचे स्वयंसेवक कोरोना वगैरे अडचणीमुळे या आश्रमात खूप दिवसांनी आले आहेत याचा आम्हाला आनंद झाला आहे. म्हणूनच बऱ्याच दिवसानंतर चिंचवली आश्रमात आपले येणे झाले हे पुन्हा आपली घरवापसी झाली असे मी म्हणेन. आपल्या घरवापसीचे मनःपूर्वक स्वागत आम्ही करतो असे सांगून त्या म्हणाल्या की समर्थ याला वाढदिवसाच्या निमित्ताने आश्रमाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. समर्थ यास दीर्घायुष्य लाभो तसेच आपणा सर्वांनाही निरोगी असं दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना.
   मुलांशी संवाद साधताना सुभाष हांडे देशमुख म्हणाले की काही तांत्रिक अडचणीमुळे आपणांस भेटण्यास जरी विलंब झाला असला तरी तुमच्या सर्वांची आठवण आम्हाला सतत येत असते. खरे तर संस्थेच्या सर्व स्वयंसेवकांच्या हृदयात तुम्ही बसलेले आहात. त्यामुळेच तुम्हाला भेटून समाधान तर वाटतेच त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आम्हालाही पुढील कार्यास प्रेरणा देतो.
    मुलांच्या गोड आवाजातील स्वागत गीताने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष हांडे देशमुख यांनी केले . रमेश सुर्वे यांनी आभार मानले. संदीप शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन छान केले होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...