आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

महिलांवर अत्याचार करणाऱ्या क्रूर - हैवान नराधम गुन्हेगारांना भर चौकात फाशी द्या...!!

  आपल्या महाराष्ट्राच्या पवित्र संतांच्या भूमीत महिलांवरील अत्याचारांच्या घटना राजरोसपणे दिवसेंदिवस ह्या वाढतच आहेत, नराधमाना कायद्याची भीती राहिलीच नाही, आगरी समाजातील कोपरखैरणे येथील माहेरवाशीण व बेलापूर येथील सासर असणारी आमची भगिनी , स्वर्गीय अक्षता म्हात्रे हिच्यावर घडलेल्या प्रसंगाने अतीव दुःख होत आहे. सासरची मंडळी पती, दीर, सासु - सासरे व नणंद यांच्या सततच्या शारीरिक व मानसिक छलाला कंटाळून मानसिक तणावाखाली येऊन अक्षताने घर सोडले व शांतीच्या शोधात मंदिराचा आश्रय घेतला. स्वतःला देवाचा दुत समजणारे पुजारी त्या मानसीक स्थर्य गमावणाऱ्या स्त्रीला आधार देण्याऐवजी तिला चहा मधून भांगेच्या गोळ्या मिसळून तिला बेशुद्ध करून तिच्यावर तीन हैवान पुजारी अत्याचार करतात व तिला शुद्ध येताच गुन्हा दडवण्याच्या भीतीने तिची गळा दाबून हत्या करतात व सदर शिल - डायघर विभागातील गणपती मंदिराच्या डोंगरावरून तिला खाली फेकून देतात.  किती भयानक व कौर्याची सीमा पार करणारी ही दुर्दैवी घटना आहे . या नराधमाना अशा वेळी आपल्या आया - बहिणीची आठवण नाही झाली का ? देवाची सुध्दा तुम्हाला भीती नाही वाटली का ?

        मंदिरातच असे अत्याचार होत असतील तर विश्वासाचे ठिकाणचं राहिले नाही हे दुर्दैव होय, काय दुःखात देवाच्या दरबारी आश्रय घेणे ही त्या भगिनीची चूक होती का? देवाच्या दरबारी सेवा देणाऱ्या पुजाऱ्याच्या हातून चहा घेणे ही त्या भगीनीची चूक होती का? देवाच्या दारी अशा पीडित महिलांना भोगवस्तू म्हणून पाहण्याचा अधिकार अशा नराधमाना कुणी दिला? कमीत कमी ज्याची सेवा करता त्या देवाची तरी भीती बाळगा? अशा हैवांनाना पुजाऱ्याचे कुणी प्रमानपत्र दिले? त्यांची नेमणूक कुणी केली ? देवाच्या दारी देखील महिला सुरक्षित नाहीत ? सुरक्षिततेचे दुसरे ठिकाण कोणते ? हे दुर्दैव होय ! 
      तसेच दुर्दैवी कावेरी नाखवाच्या बाबतीत देखील घडलेली घटना क्रूर आहे, मद्यप्राशन करून धन दांडग्यांच्या मुलाने त्यांना गाडीखाली चिरडले ,गरीब मच्छी विक्रेते नाखवा कुटुंबाचा आधार हरपला , यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचत नाही का? यांचा काय गुन्हा? महिलांनी घराबाहेर पडूच नये का ? अशा क्रूर नराधमाना जरी देवाची व माणसांची भीती वाटत नसली तरी कायद्याची भीती व दरारा वाटायलाच हवा. नाहीतर पुन्हा दुसरी कावेरी नाखवा व अक्षता म्हात्रे अशा नराधमांचा बळी ठरेल! हे कुठेतरी थांबायला हवे तरच आपल्या भगिनी सुरक्षीत जीवन व्यथित करू शकतील. त्यामुळे कायद्याने व सरकारने पुजारी म्हणून व धनदांडग्यांची मुले म्हणून अशा सैतानांनवर कुठलीही सहानभुती दाखवू नये, आगरी - कोळी समाजातील निष्णात वकिलांनी व महाराष्ट्रातील महिला आयोगाने याची गंभीर दखल घेऊन आपली पूर्ण ताकत पणाला लावून आपल्या दुर्दैवी भगिनींना न्याय मिळवून द्यावा जेणेकरून कायद्याच्या पळवाटा शोधण्यास गुन्हेगारांना वाव मिळू नये.आपल्या समाजबांधवांनी देखील पेटून उठून आपल्या भगिनींना न्याय मिळवून देण्यास हातभार लावला. पिडीत अक्षतास घराबाहेर पडण्यास भाग पाडणाऱ्या सासरच्या मंडलीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी जेणेकरून कुठल्याही महिलेचा शारीरिक व मानसिक छळ पुन्हा होणार नाही .
       दुर्दैवी अक्षताच्या मृत्यूस जबाबदार क्रूर नराधम पूजाऱ्यांस भर चौकात चाबकाचे फटके देऊन फाशी द्यावी तरच अशा घटनांना चाप बसून असे कृत्य पुन्हा करण्यास कुणीही हैवान धजावणार नाही .आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या करिता सरकारने जलदगती खटला चालवण्यासाठी अभीयोक्त्याची नेमणूक करावी, सर्व मंदिर व प्रार्थना स्थळ येथे सी. सी. टिव्ही बसविण्यात यावे व तेथील सुरक्षित वाढ करावी. तसेच तेथील कर्मचारी व पुजारी यांची नजीकच्या पोलीसस्टेशन मध्ये चारित्र्य पडताळणी करण्यात यावी. या निंदनीय घटनेचा जाहीर निषेध ! आपल्या भगिनींना स्वर्गीय अक्षता म्हात्रे व स्वर्गीय कावेरी नाखवा यांना व त्याच्या घरच्या मंडळींना सरकारने न्याय मिळवून द्यावा हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.

- दिनेश हरिश्चंद्र तुरे - मुक्त पत्रकार, 
प्रतिनिधी - आपला वार्ताहर ,
( मो. ९९६९२७१५१३ )
Email : dineshture@yahoo.co.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...