घाटकोपर (शांताराम गुडेकर ) काँग्रेसचे युवा नेते व प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांना मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी स्लम सेल विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.माजी मंत्री, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षाताई गायकवाड यांनी राजहंस यांना नियुक्तीचे पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
माजी मंत्री, लोकनेते स्व. एकनाथराव गायकवाड यांच्या बरोबर सुरेशचंद्र राजहंस यांना काम करण्याची संधी मिळाली. सुरेशचंद्र राजहंस यांचा अभ्यास, कामासाठीची धडपड व दलित, वंचित समाजासाठी तळमळीने काम करण्याची त्यांची चिकाटी पाहून गायकवाड साहेब यांनी राजहंस यांना मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये प्रवक्ता पदावर काम करण्याची संधी दिली होती. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राजहंस यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती.
सुरेशचंद्र राजहंस यांनी सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात काम केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते म्हणून त्यांनी आपला ठसा उमटला आहे. विविध राजकीय सामाजिक प्रश्न हाती घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. घरकाम करणाऱ्या महिला, विधवाप्रथा बंदी, नाका कामगार, असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्या न्याय, हक्क आणि अधिकारासाठी मुंबईत गेल्या वीस वर्षापासून सातत्याने त्यांचे कार्य सुरू आहे.
गुजरात व कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचारक म्हणून त्यांनी काम केले आहे. सकाळ समूहाच्या वतीने सत्कार भूमिपुत्रांचा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या मानाच्या सकाळ आयडॉल महाराष्ट्र पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.“मुंबईतील झोपडपट्टी व झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाठपुरावा करुन त्यांना न्याय देण्याचे काम करेन. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझी जबाबदारी पाडेन तसेच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई यांनी मुंबई स्लम विभागाची जबाबदारी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, ह्या पदाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन”, असे राजहंस म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा