मुंबई (शांताराम गुडेकर ) कवयित्री सौ.वीणा विश्वास चव्हाण यांच्या "अजूनही काही भावतं तिला" या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ कवी आणि गीतकार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे झाले.सौ.वीणा चव्हाण यांची कविता चिंतनशील आहे आणि ती सूक्ष्म अवलोकनातून जन्माला आलेली आहे असे उदगार याप्रसंगी श्री प्रसाद कुलकर्णी यांनी काढले.कविता करू म्हणून करता येत नाही आणि करायची होते तेव्हा ती टाळू म्हणून टाळता येत नाही.तो सृजनाचा हुंकार असतो. वीणाताईंनी तो आपल्या शब्दांमध्ये अचूक पकडला आहे असेही ते म्हणाले.
या प्रकाशन सोहळ्यास सुप्रसिध्द लेखक, दिग्दर्शक श्री. राजेश देशपांडे, मोडीदर्पण या दिवाळी अंकाचे संपादक श्री. सुभाष लाड, जेष्ठ साहित्यिक श्री.अशोक लोटणकर, जेष्ठ कवयित्री योगिनी राऊळ आणि कवी, संपादक श्री.गीतेश शिंदे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच या प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी अभिनेते प्रफुल सामंत,अभिनेते, नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार व कवी संजय गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.त्याचबरोबर वाटूळ गावातील मान्यवर, हितचिंतक, मित्रपरिवार, नातेवाईक या सोहळ्यास उपस्थित होते.श्री. दिनेश मोरे यांनी या सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन केले या प्रसंगी त्यांनी सौ.वीणा चव्हाण यांची छोटीशी मुलाखतही घेतली.या सोहळ्याचे नियोजन कवी विराज चव्हाण यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा