आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

आजातशत्रू शक्तीचंद अनंतात विलीन

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. मध्ये दीर्घकाळ सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले श्री. शक्तीचंद यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दिनांक २७ डिसेंबर रोजी आकस्मित निधन झाले. कंपनीत प्रामाणिकपणे सेवा बजावलेले आणि समाजसेवेचे व्रत घेऊन ते अखेरपर्यंत निष्ठेने सांभाळलेले तसेच समाजाच्या सर्व स्तरावर सेवा देणारं एक चालतं बोलतं हक्काचं सेवा देणार विद्यापीठ अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह आरसीएफ परिवारात दुःखाचे वातावरण पसरले व प्रत्येकाच्या मुखातून हळहळ व्यक्त होत आहे. हे खरेच. म्हणूनच त्यांच्या मित्र परिवाराच्या उपस्थितीत दिनांक २८ डिसेंबर रोजी वाशी येथील स्मशानभूमीत पार पडलेल्या अंत्यसंस्कारा प्रसंगी मान्यवरांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. यावेळी वाशी गुरुद्वार कमिटीनेही श्रद्धांजली वाहिली.
                  पंजाब सारख्या सधन प्रांतातून भुंगा या गावातून नोकरीनिमित्ताने आरसीएफमध्ये आलेले, राजबिंडे व्यक्तिमत्व लाभलेले शक्तीचंद अतिशय विनयशील स्वभावाचे होते. ते स्वतःच्या वाट्याला आलेले कुठल्याही प्रकारचे काम अतिशय निष्ठेने आणि श्रद्धापूर्वक करीत असत. सहाजिकच कंपनीत काम करत असताना सहकाऱ्यांप्रमाणे व्यवस्थापनाबरोबरही त्यांचे संबंध अतिशय चांगले होते. किंबहुना त्यांनी ते प्रयत्नपूर्वक सांभाळले होते. जपले होते. त्यांनी घेतलेल्या समाजसेवेच्या व्रताने ते अधिक दृढ होत गेले आणि त्यांचा जनसंपर्क आधीक व्यापक झाला. कोणाला नाही म्हणणे हे त्यांना कधी जमलेच नाही. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत. सहाजिकच ते सर्वांना हवे हवेसे वाटत असत. 
         सामाजिक कामाबरोबरच व्यवस्थापनाद्वारे आरसीएफ मध्ये साजरे होत असलेले २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या कार्यक्रमात तसेच गणेशोत्सवात त्यांचा सहभाग नेहमीच असे. त्यात प्रामुख्याने बैशाखी हा सण अगदी स्वतः पुढाकार घेऊन ते अधिक प्रभावीपणे वसाहतीत साजरा करीत असत. आरसीएफ मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सोशल फोरम मध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असे. कुठलेही काम पदरमोड करुन जबाबदारीने करण्याची त्यांची तयारी असे. त्यामुळे फोरमचे काम अधिक सुलभपणे पार पडत असे. खरे तर ! फोरमचा मोठा आधार गेल्याचे, त्यांच्या जाण्याने जाणवणार आहे. वयाच्या ८० व्या वर्षात पदार्पण केलेल्या शक्तीचंद यांचा उत्साह खूप दांडगा होता. इच्छाशक्ती खूप प्रबळ होती. त्यामुळे ते अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. गेल्या सप्टेंबर मधील त्यांचा ८० व्या वर्षातला पदार्पण वाढदिवस सोहळा फोरमच्या कार्यकारिणी मंडळांने मोठ्या उत्साहाने वाशी येथे साजरा केला. आणि त्यांना पुढील निरोगी अशा दीर्घ आयुष्यासाठीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या. पण नियतीच्या मनात काय आहे हे कोण सांगू शकते ?
       म्हणूनच वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत समाजसेवेचे व्रत निष्ठेने सांभाळून कृतार्थपणे व फार संयमाने जीवन व्यतीत केलेल्या शक्तीचंद यांनी, "जो मनुष्य मानव सेवा करताना संयमाचा स्वामी असतो तो सर्व गोष्टींचा स्वामी ठरतो" ही उक्ती शक्तिचंद यांनी आपल्या यशस्वी जीवन प्रवासातून सिद्ध केली असे म्हणावेसे वाटते.  भावपूर्ण श्रद्धांजली

-सुभाष हांडे देशमुख 
      नेरुळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !

मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...