डोंबिवली: रविवार दि.१०डिसेंबर रोजी डोंबिवली (पश्चिम) कुंभारखान पाडा येथील गणेशघाट येथे माजी शिक्षिका सौ.स्व.जयश्री देविदास म्हात्रे यांना सरस्वती मंदिर पडलेगांव मधील १९७१ पासुन ते २०१० पर्यंत शिकत असलेल्या माजी विद्यार्थी /विद्यार्थीनींनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. स्व.जयश्री देविदास म्हात्रे बाई यांनी सरस्वती मंदिर पडलेगांव येथे ३० वर्ष सेवा करून २००८ मध्ये सेवानिवृत्त झाल्या. अवघ्या १५ वर्षानंतरही आजतागायत पंचक्रोषीतील माजी विद्यार्थी/विद्यार्थीनींमध्ये स्व.म्हात्रे बाईंचा व माजी मुख्याध्यापक म्हात्रे सरांचा सलोख्याचा संबंध आहे. स्व.म्हात्रे बाईंचा मराठी विषय आवडीचा होता.म्हात्रे बाईंना स्वच्छता फार आवडत होती. फुलांचा तर बाईंना फारच लळा होता.अशा प्रेमळ व शांत स्वभावाच्या म्हात्रे बाईंच्या आकस्मित जाण्याने सर्व पंचक्रोषीतील विद्यार्थी/विद्यार्थीनींवर दुःखाचा डोंगर कोसळला. म्हात्रे बाईंना विद्यार्थी 'मोठ्या म्हात्रे बाई' या नावानेच ओळखत होते.आज त्यांचा भावपूर्ण श्रध्दांजलीचा कार्यक्रम माजी विद्यार्थी /विद्यार्थीनींनी उत्कृष्टपणे पार पाडला.
भावपूर्ण कार्यक्रमाची सुरूवात स्व.म्हात्रे बाईंच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून दीप प्रज्ज्वलनाने केली. कार्यक्रमाचे सुत्र संचलन अतिशय मार्मिकपणे काळुराम गायकवाड सरांनी केले. माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून स्व.म्हात्रे बाईंना श्रध्दांजली अर्पन केली. प्रशांत पाटील,निलेश म्हात्रे म्हात्रे,सौ.प्रियांका भोईर,नवनाथ ठाकुर, प्रल्हाद पाटील, मेघनाथ पाटील, बाबाजी पाटील,माजी मुख्याध्यापक एम.आर.म्हात्रे सर व राम पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्व.म्हात्रे बाईंना श्रध्दांजली अर्पण केली. विशेष म्हणजे भावपूर्ण श्रध्दांजली कार्यक्रमास स्व.म्हात्रे बाईंचे माजी विद्यार्थी माजी नगरसेवक,ठाणे मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बाबाजी पाटील साहेब,सेवानिवृत्त शिक्षकवृंद प्रभाकर तळेले सर (नाशिक),सेवानिवृत्त शिक्षकवृंद तुकाराम झोके सर दांपत्य (अहमदनगर), माजी क्लार्क परशुराम ठाकुर व देविदास म्हात्रे सरांचे कुटुंबिय हे सर्व उपस्थित होते.
भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त करतांना कवी नवनाथ ठाकुर यांनी स्व-रचित कविता
जीवन तुमचे जणू पुजेची थाळी ||
तुम्हास वाहतो मी शब्द सुमनांजळी ||
वाचून श्रध्दांजली अर्पण केली. तसेच डॉ.सदानंद पाटील यांची स्व-रचित कविता देविदास म्हात्रे सरांनी भावपूर्ण अंतःकरणाने सादर केली.
भावपूर्ण श्रध्दांजली कार्यक्रमाचे समापन प्रल्हाद पाटील यांनी गीतेचा आधार घेऊन मृत्यूची भूमिका समजावून केले.गीता सांगते शोक करू नकोस.या अर्थाच्या एका श्लोकाच्या आधाराने
*देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत।*
*तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि।।2.30।।*
उपस्थितांना भगवंताने अर्जूनाला केलेला संदेश समजावला. स्व.म्हात्रे बाईंनी व म्हात्रे सरांनी दिलेले ध्येय आम्ही विद्यार्थी पुढे घेऊन गेलो तरच खऱ्याअर्थाने म्हात्रे बाईंना श्रध्दांजली वाहिली असे सार्थक होईल.असा संकल्प करून भावपूर्ण कार्यक्रमाचे समापन केले. शेवटी उपस्थित सर्व माजी विद्यार्थी /विद्यार्थीनींनी स्व.म्हात्रे बाईंच्या प्रतिमेला गुलाब पुष्पे अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.
अशाप्रकारे माजी मुख्याध्यापक देविदास म्हात्रे सर व स्व.जयश्री म्हात्रे बाई हे एक आदर्श शिक्षक दांपत्य सर्वांच्या मनात घर करून आहे. या दांपत्याने शेकडो विद्यार्थ्यांना घडविले.शिक्षणासोबत संस्कारांचेही सिंचन केले. याचाच परिणाम आज स्व.म्हात्रे बाईंना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी ९०-१०० च्या संख्येने माजी विद्यार्थी /विद्यार्थीनी वेळात वेळ काढून उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा