मुंबई, दि. ६ : पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाची नोंद घेऊन पत्रकारांनी वाटचाल केली पाहिजे. राज्य शासनही पत्रकारांसाठी वैद्यकीय सहायता योजना, अधिस्वीकृती योजना, पत्रकारांना निवृत्तीनंतर सन्मान अशा काही महत्त्वपूर्ण योजना राबविते. या योजनांमध्ये काही सुधारणा करण्याबाबत काही सूचना येत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या हितासाठी आवश्यक त्या सुधारणा या योजनांत जरूर करण्यात येतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
माध्यम क्षेत्रात गेल्या तीन - साडे तीन दशकात खूप बदल झाले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पत्रकारांनी या बदलाची नोंद घेतली पाहिजे. अर्थात या बदलांमुळे पत्रकारांचे महत्व कमी होणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वृत्तपत्रांनी मोठी भूमिका बजावली. आजही नागरिकांना, वाचकांना खऱ्या अर्थाने सज्ञान करणे आणि लोकशिक्षणाची भूमिका माध्यमांनी पार पाडण्याची गरज आहे. आपल्या समाजापुढील अंमली पदार्थांचा वाढता वापर, नक्षलवाद, दहशतवाद, रोजगार, बदललेल्या कुटुंब व्यवस्था, बाजारू चंगळवाद या समस्यांचा वेध घेऊन माध्यमांनी वस्तुनिष्ठ आणि मार्गदर्शक अशी भूमिका मांडली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गडचिरोली येथील नक्षलवादाचा बिमोड करण्याची राज्य शासनाची भूमिका असून तेथील नागरिकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतले जात असल्याचे सांगितले.
अप्रतिम मीडियाच्या वतीने प्रकाश कथले (वर्धा), हेमंत जोशी आणि योगेश त्रिवेदी (मुंबई) यांना चौथा स्तंभ राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याशिवाय, माध्यम उद्योजकता व संपादकीय नेतृत्व, पर्यावरण वृत्त, वने व इको टुरिझम वृत्त, टीव्ही न्यूज चॅनेल टीम लीडर, विकास वृत्त, स्थानिक पर्यटन वृत्त, उद्योग/व्यापार वृत्त, कला-संस्कृती, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, साहित्य, ग्रामीण विकास, सहकार अशा विविध विभागात पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ‘अप्रतिम महावक्ता’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. फळे यांनी तर सूत्रसंचालन सोनाली शेटे यांनी केले. आभार विवेक देशपांडे यांनी मानले.
.jpg)
.jpg)
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा