मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) : समाज माध्यमाच्या भाऊ गर्दीमध्ये देखील वृत्तपत्रांची भूमिका अबाधित असून समाजाला दिशा दाखवण्याचे काम वृत्तपत्र करतात तसेच प्रिंट मिडिया हे आजचे प्रभावी माध्यम आहे आणि भविष्य काळात देखील प्रिंट मिडीया कायमच राहणार असे, प्रतिपादन आ. संजय केळकर यांनी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण समारंभाच्या कार्यक्रमात केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून व मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा दै. प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, प्रमुख अतिथि म्हणून ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर, आदिवासी सेवक गंगाधर म्हात्रे, दै. लोकसत्ताचे वसई-विरार ब्युरो चीफ सुहास बिर्हाडे, ज्येष्ठ पत्रकार रामहरी कराड व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर व्यासपीठावर उपस्थित होते.डिजिटल माध्यमांच्या प्रभावामध्ये वृत्तपत्रांचे महत्व टिकवून ठेवण्यासाठी पत्रकारांनी आवश्यक ते बदल स्वतःमध्ये करायला हवेत असे मत प्रहार चे संपादक सुकृत खांडेकर यांनी मांडले. २२ वर्षे संस्था चालवणे हे ‘शिवधनुष्य’ उचलण्यासारखे आहे असे सांगत त्यांनी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांचे कौतुक केले.
पारितोषिक वितरण समारंभामध्ये डॉ. सुकृत खांडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार, रामहरी कराड यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार, सुहास बिर्हाडे यांना कै. यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार व गंगाधर म्हात्रे यांना जीवनगौरव पुरस्कार तसेच विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणार्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.श्री अरुण सुरडकर ,श्री भारत शंकरराव गठ्ठेवार, श्री दिलीप जाधव आणि श्री दिपक सोनवणे यांना पत्रकार भूषण पुरस्कार तर उद्योजक शुभम गुप्ता यांना उद्योगश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या श्री सुनिल साहेबराव टिप्परसे,श्री सुमंगल मोहिते,श्री सुहास मधुकर पाटील,श्री सचिन खुपसे,श्री राजू केशवराव यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वृत्तपत्र लेखक कृष्णा काजरोळकर,श्री विश्वनाथ पंडीत,श्री रमेश लांजेवार, श्री श्याम ठाणेदार व श्री संजय साळगावकर,यांना पत्रभूषण पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून सौ. वैशाली बेलाशे यांना शिक्षक रत्न पुरस्कार देण्यात आला. सावी दिवाळी अंक, पालघर, दै. किल्ले रायगड, रायगड आणि गंधाली, मुंबई ह्या दिवाळी अंकांना उत्कृठ दिवाळी अंक म्हणून दिवाळी अंक पुरस्कार देण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा