मार्गताम्हने/चिपळूण- चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीमार्फत 2021- 22 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 'उत्सव स्वातंत्र्याचा- गौरव स्वातंत्र्यवीरांचा՚ साजरा करीत आहे. त्या निमित्ताने २ ऑक्टोंबर 2021 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी गुरुवार दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी संस्थेच्या डॉ .तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय, मार्गताम्हाने येथे आंतरमहाविद्यालयीन देशभक्तीपर काव्यवाचन स्पर्धा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. जयसिंगराव मोरे, खजिनदार मनोहरपंत चव्हाण, व संचालक कृष्णकांत चव्हाण उपस्थित होते.
या आंतरमहाविद्यालयीन देशभक्तीपर काव्यवाचन स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाने 'न भूतो -न भविष्यते' अशा रीतीने इतके उत्कृष्टपणे काव्यवाचन सादर केले की स्पर्धेसाठी उपस्थित असणा-या परीक्षकांसह उपस्थित मान्यवरांनाही गुणवान काव्य वाचका֗֗ची निवड करताना प्रश्न पडला. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर कविता सादरीकरणामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्यवीर वि. दा .सावरकर, भगतसिंग ,सुखदेव, राजगुरू पासून ते महात्मा गांधी ,सुभाषचंद्र बोस, नुकतेच देशासाठी समर्पित झालेले सीडीएस जनरल बिपिन रावत यासारख्या महापुरुषांच्या वरील विषयांनी या कविता परिपूर्ण होत्या.
या स्पर्धेसाठी डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयाचे २३ स्पर्धेक, ज्ञानदीप महाविद्यालय, बोरज खेड या महाविद्यालयातील 14 स्पर्धक, डॉ. तानाजीराव चोरगे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय मांडकी- पालवन येथील २ स्पर्धेक, आयसीएस महाविद्यालय खेड मधील ५ स्पर्धक, आनंदराव पवार महाविद्यालयातील ६ स्पर्धक, पाटपन्हाळे कॉलेजमधील एक स्पर्धक, पेढांबे कॉलेजमधील दोन स्पर्धक, खरे -ढेरे कॉलेज गुहागर मधील एक स्पर्धक, सावर्डे कॉलेजमधील एक स्पर्धक असे एकूण 55 स्पर्धक काव्यवाचन स्पर्धेसाठी उपस्थित होते. महाराष्ट्रात बसचा संप सुरू असताना ही स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आमच्या महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला आहे.
स्पर्धक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कवितांचे प्रस्तुतीकरण अतिशय प्रभावी पद्धतीने सादर केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक डॉक्टर तानाजीराव चोरगे महाविद्यालय ,मांडकी पालवण येथील विद्यार्थी अविनाश रहाटे यांनी प्राप्त केला. त्याने प्रस्तुत केलेली 'मी शहीद जवान बोलतोय 'ही कविता अतिशय हृदयस्पर्शी होती. द्वितीय क्रमांक आयसीएस महाविद्यालय, खेड येथील विद्यार्थिनी तेजस्विनी कांबळे यांनी सादर केलेली ' असा माझा भारत देश ' ही कविता भारताचे विविधांगी दर्शन घडवणारी होती. तर तृतीय क्रमांक ज्ञानदीप महाविद्यालय बोरज,खेड येथील विद्यार्थिनी पल्लवी कदम यांनी प्राप्त केला. त्यांनी सादर केलेली' स्मरण' ही कविता सर्वांनाच भावनिक बनवून गेली. तसेच उत्तेजनार्थ क्रमांक ज्ञानदीप महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वैभवी लाड व वफा ढाणेकर यांनी प्राप्त केला.
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मधुकरराव चव्हाण यांनी आभासी पद्धतीने स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत, देशासाठी समर्पित झालेल्या वीरांचे नेहमी स्मरण करीत त्यांच्याकडून आदर्श घ्यावेत, असा मनोदय व्यक्त केला. संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. जयसिंगराव मोरे यांनी काव्य वाचन स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना प्रेरित करीत संस्थेचा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा अशी इच्छा व्यक्त केली.
आंतरमहाविद्यालयीन देशभक्तीपर काव्यवाचन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डी. बी. जे. महाविद्यालय मधील मराठी विषयाचे प्राध्यापक श्री विनायक बांद्रे तसेच इंग्लिश स्कूल मार्गताम्हाने येथील मुख्याध्यापिका सौ कृतिका संदीप सोहनी यांनी उत्तम रित्या परीक्षण पार पाडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युवराज जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. राजश्री कदम यांनी काव्यवाचन स्पर्धेतील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करीत संस्थेद्वारे वर्षभर आयोजित केल्या जाणा-या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले. तसेच परीक्षक प्रा. विनायक बांद्रे व कृतिका सोहनी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना काव्य वाचनाबद्दल यथोचित मार्गदर्शन केले तसेच भविष्यातील काव्यवाचन स्पर्धेसाठी काही मूलमंत्रही दिले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार खोत यांनी विद्यार्थीदशेतील आपले काव्यवाचनाचे अनुभव व्यक्त करीत अधिक वाचन व अभिव्यक्ति बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका प्रियांका गोयथळे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. रामचंद्र माने, डॉ. सत्येंद्र राजे, डॉ. एस डी सुतार, डॉ. नामदेव डोंगरे, प्रा.विकास मेहेंदळे , संदीप चव्हाण, संदीप जंगम, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ,विद्यार्थिनी यांनी अथक प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा