आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ९ जानेवारी, २०२२

साहित्य संमेलनात दिग्गजांची मुशाफिरी !

शनिवारी 22 जानेवारीला सकाळी 8 वाजतापासून पनवेलला वाजणार साहित्य संमेलनाचा  डंका

पनवेल: सद्य:स्थितीत भयमुक्त समाजाची निर्मिती-संगोपन, मुळात अभिजात असलेल्या माय मराठीचा तिन्ही लोकी झेंडा फडकावण्याचे सृजनशील प्रयास आणि दर्जेदार साहित्याची संवेदनशिलता जोपासण्याच्या हेतूने शनिवारी (ता. 22) पनवेलला होत असलेल्या पहिल्या राज्यव्यापी साहित्य संमेलानाला राज्यातील ख्यातनाम साहित्यिक, विचारवंत, गीतकार, राजकीय- सामाजिक विश्लेषकांची उपस्थिती लाभणार असल्याने संमेलनाची रौनक वाढणार आहे.

  सकाळी 8 वाजता ग्रंथ दिंडीचे आयोजन वारकरी सांप्रदयाच्या प्रमुख उपस्थितीत केले आहे. हभप पुंडलिक महाराज फडके, सुरेश महाराज, कृष्णा महाराज व अन्य दिंडी प्रमुख यांची उपस्थिती असेल. कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि पनवेल संघर्ष समितीच्या पहिल्या राज्यव्यापी साहित्य संमेलनासाठी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मान्यवर, श्रोते, रसिकांच्या स्वागतासाठी स्व. हरिश्चंद्र चांगु कडू साहित्य नगरी सज्ज झाली आहे.

   त्यानंतर सकाळी 9 वाजता सुरु होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, वक्ता दशसहस्रेषू डॉ. श्रीपाल सबनीस असतील. वाचकांची अचूक नस हेरून एकापेक्षा एक सरस आणि सक्षम कादंबरी देणारे पानिपतकार विश्वास पाटील हे संमेलनाचे उदघाटक असतील. कार्यक्रमाचे आयोजक, कवी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्य संस्कृती रक्षणाची धुरा खांद्द्यावर यशस्वी पेलाणारे निर्भीड नेतृत्व कांतीलाल कडू हे अर्थातच स्वागताध्यक्ष आहेत.

    याशिवाय संत साहित्य वाड:मयाचे अभ्यासक उल्हासदादा पवार आणि कवी कुळातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

     सकाळी 11 वाजता पहिल्या परिसंवादाला प्रारंभ होईल. 'इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि राजकीय हस्तक्षेप' या विषयावर चर्चा आणि मंथन घडणार आहे. महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक दिनकर गांगल हे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असतील. चर्चेत सहभागी होत आहेत, प्रामुख्याने ज्येष्ठ विचारवंत तसेच राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर, साम टीव्हीचे संपादक प्रसन्न जोशी आणि सामाजिक कार्यकर्ते संजय मंगो.

      दुपारच्या दुसऱ्या सत्रात 'सोशल मीडिया आणि साहित्य' या सद्य:स्थितीतील गंभीर आणि तितक्याच वलयांकित विषयावरील परिसंवाद राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे उपसंचालक प्राचार्य विजय जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2.30 वाजता संपन्न होत आहे. ज्येष्ठ संगीतकार आणि व्यासंगी व्यक्तीमत्व असलेले कौशल इनामदार, ज्येष्ठ पत्रकार दुर्गेश सोनार तसेच कवयित्री वृषाली विनायक आदी मान्यवर चर्चेत सहभागी होवून समाज जीवनाच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

     तिसऱ्या सत्रात कवितेचे आभाळ बरसणार आहे, दुपारी 4 वाजता. महाराष्ट्राचे दोन लाडके कविवर्य त्यांच्या कवी कुळासह कविता आणि गजलेचे जागरण मांडणार आहेत. कविवर्य प्रा. अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कवी संमेलनात राज्यात प्रथमच पनवेलच्या पुण्यनगरीत कविता आणि गजल एकत्र नांदणार आहेत. प्रा. बागवे यांच्या सोबत आपल्या वेगळ्या ढंगातील कविता, गाण्याचे विश्व खुलवणारे कविवर्य अरुण म्हात्रे यांची उपस्थिती चार चाँद लावणार हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

     या कार्यक्रमाचे स्वतंत्र सूत्रसंचालन नव्या दमाचे कवी गितेश शिंदे करतील. तर मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर करणार आहेत.

कवी संमेलनात कविवर्य  रवी लाखे, गजलकार आप्पा ठाकूर, मंगेश विश्वासराव, सतीश सोळंकुरकर, नारायण लाळे, राजीव जोशी, प्रा. एल. बी. पाटील, कॅप्टन वैभव दळवी, ज्येष्ठ कवयित्री आणि राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या ज्योती ठाकरे, दादासाहेब गावडे, ज्योत्स्ना रजपूत, सुनिता रामचंद्र, बंडू सुमन अंधेरे, डॉ. विनायक पवार, विशाल उशिरे, जितेंद्र लाड, प्रा. प्रकाश पाटील, संजय गुरव आणि दीपाली पंडित आदी जण काव्य कट्ट्यावरील मैफिल सजवणार आहेत.

     त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संध्याकाळी 6.30 वाजता कार्यक्रमाचा सांगता समारंभ आणि राष्ट्रगीत होईल.कार्यक्रमादरम्यान दिग्गज साहित्यिकांचे स्मरण करण्यासाठी त्यांच्या तसबीरी कार्यक्रमास्थळी लावण्यात येतील. कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळत पुस्तक विक्रीचे स्टॉलही लावण्यात येतील. मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरसह वैद्यकीय सेवा उपलब्ध ठेवण्याचे आयोजकांनी नियोजन केलेले आहे.

पनवेलसह रायगड आणि ठाणे येथील सरस्वतांना अनमोल पर्वणी लाभल्याने साहित्य संमेलनाची उत्सुकता वाढीस लागली आहे, हे ओघाओघानेच आलेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न

नवी मुंबई(वैभव पाटील)  मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...