नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अहोरात्र सज्ज
अलिबाग - रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. जिल्ह्यात दि.6 जानेवारी 2022 च्या कोविड अहवालानुसार या एकाच दिवशी तब्बल 1 हजार 96 करोना रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज दि.7 जानेवारी 2022 रोजी जिल्ह्यातील लसीकरण व कोविड-19 उपाययोजना व त्याविषयीची पूर्वतयारी याबाबत दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली.
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने,उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कोविड केअर सेंटर सुसज्ज ठेवावेत, प्रत्येक तहसील कार्यालयात कंट्रोल रूम तयार करावा, नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे, कोविड चाचणी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यावर भर द्यावा, हाय रिस्क कॉन्टॅक्टची तात्काळ कोविड चाचणी करावी, ज्याच्यामुळे संसर्ग वाढू शकतो त्यांना तात्काळ शोधून आवश्यकता असल्यास त्यांच्यावर योग्य उपचार सुरू करावेत, गृह विलगीकरणातील रुग्णांना फोनद्वारे संपर्क करावेत, त्यांना घरातच राहण्यासाठी आवाहन करावे, कोविड-19 अनुरूप वर्तनाचे पालन काटेकोरपणे होईल, याबाबत दक्ष राहावे, कॉल सेंटर सुरू करावे, या कॉल सेंटरद्वारे नागरिकांना कोविड चाचणी कुठे करायची आहे, तब्येत खालावल्यास कुठे संपर्क करायचा, ॲम्बुलन्सची माहिती, ऑक्सिजन हवा असेल तर कोणाला संपर्क करायचा, इतर आवश्यक वैद्यकीय मदत व मार्गदर्शन, बेडची उपलब्धता याची माहितीही नागरिकांना त्या त्या कंट्रोल रूमद्वारे देण्यात यावी, कोविड अनुरूप वर्तनाबाबत आवश्यक जनजागृती नियमितपणे करावी, ऑक्सिजन स्टोरेज युनिट व ऑक्सिजन प्लांटची वारंवार तपासणी करावी, ऑक्सिजन गळती होऊ नये, याबाबत प्राधान्याने खबरदारी घ्यावी, ऑक्सिजन चा साठा वाहून नेण्यासाठीची यंत्रणा सज्ज ठेवावी, फायर ऑडिट च्या दृष्टीने खात्री करावी, कोविड केअर सेंटर मधील स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीकल अशा सर्व प्रकारच्या यंत्रणा व्यवस्थित असल्याची खात्री करावी, अग्निशमन यंत्र कार्यान्वित असल्याबाबतची खात्री करावी, हे अग्निशमन यंत्र योग्य ठिकाणी दर्शनी भागात, पटकन हाताशी लागतील, या पद्धतीने ठेवावेत, नागरिकांच्या अँटीजेन चाचणी, आवश्यकता भासल्यास आरटीपीसीआर चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, गृह विलगीकरण, गरज लागल्यास संबंधितास कोविड केअर सेंटर मध्ये पाठविणे, त्यापुढेही गरज लागल्यास तात्काळ योग्य वैद्यकीय उपचार याबाबत नागरिकांना जागरूक ठेवावे, खेळांच्या स्पर्धा, लहान-मोठे लग्न समारंभ, इतर कार्यक्रम रद्द करावेत, लसीकरणावर भर द्यावा, कंट्रोल रूम मध्ये डॉक्टर, समुपदेशक यांची उपलब्धता ठेवावी, गृह विलगीकरणामध्ये असणाऱ्या नागरिकांशी सतत संपर्कात राहावे, त्यांची विचारपूस करावी, त्यांना काय हवे नको ते याबाबत काळजी घ्यावी, सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवावा, गरज असेल त्या ठिकाणी मॉक ड्रिल घ्यावेत, जास्तीत जास्त नागरिकांच्या कोविड तपासण्या कराव्यात, नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी, कोणत्याही प्रकारे बेसावध राहू नये, अशा प्रकारच्या सविस्तर सूचना दिल्या.
शेवटी प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याचे रक्षण करणे, प्रत्येक गरजू नागरिकाला वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, ही प्रशासन म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, हे लक्षात घेवून सर्वांनी नेमून दिलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी याशिवाय मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे, या सूचनांचे पालन करण्याचे सर्व नागरिकांना वारंवार आवाहन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा