आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दिवसा वाहतूक बंदी

उरण - उरण तालुक्यासह नवी मुंबई,मुंबई,ठाणे,रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे. नवी मुंबई ते ठाणे तसेच मुंबईच्या रस्त्यावर प्रचंड रहदारी, ट्रॅफिक असते त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत दिवसा अवजड वाहनांना प्रवेश बंदी म्हणजेच वाहतूक बंदी करण्यात आली आहे.

 जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर जड वाहने नवी मुंबई हद्दीतून ठाणे जिल्ह्यातील हद्दीत प्रवेश करून गुजरात तसेच नाशिक जिल्ह्याच्या दिशेने जात असल्याने ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात दैनंदिन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन सदर वाहतूक कोंडीचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे .सदर वाहतूक कोंडी समस्या संदर्भात नागरिकांचे शासन दरबारी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने ठाणे जिल्ह्यातील सदर वाहतूक समस्येची दखल घेतली आहे. यावर आम जनतेच्या सोयीसाठी वाहतूक सुरळीत राहणे आवश्यक असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन गृहविभाग क्र.MVA 116/CR /37/7R/ दि 27/9/96 चे अधिसूचने नुसार मोटार वाहन कायदा कलम 115,116(1), (अ) (ब ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत बिपीनकुमार सिंह-पोलीस आयुक्त नवी मुंबई यांनी तसे आदेश पारीत केले आहेत .

    मोटार परिवहन कायद्याचे कलम 2(16) अन्वये परिभाषित नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर सर्व प्रकारची जड अवघड वाहनांना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सर्व शहराचे मार्गावरून वाहतुकीस दररोज सकाळी 6 ते रात्री 11 दरम्यान पूर्णतः बंदी करण्यात येत असून सदरच्या जड अवजड वाहनांना रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत वाहतुकीस परवानगी(मुभा) देण्यात येत आहे.सदरची वाहतूक नियंत्रण अधीसूचना ही जीवनावश्यक वाहने,पोलीस वाहने,फायर ब्रिगेड,रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.सदरचे अधिसूचना 25/9/ 2021 रोजी पासून ते पुढील आदेश येईपर्यंत अंमलात राहील असे वाहतूक नियंत्रण अधिसूचना (GR )द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

   सदरच्या अधिसूचनेमुळे दैनंदिन प्रवास करणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आजपर्यंत उरण मध्ये वाहनांच्या अपघातात 800 हुन अधिक व्यक्तींचा बळी गेला आहे. रस्ते अपघातात मृत्युंची संख्या अधिक आहे.मात्र नवीन काढलेल्या अधिसूचनेमुळे  नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील वाहतूक कोंडी आता कमी होणार असून अपघाती मृत्यूची संख्या देखील कमी होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी,जनतेने या निर्णयाचे स्वागत करून प्रशासनाचे आभार मानले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: