आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

'गुगल' गुरू चा वाढदिवस!

     

आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे. इंटरनेट म्हणजे माहितीचा खजिना. इंटरनेटवर  कोणतीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध असते. कोणतीही माहिती शोधायची असेल तर गुगलवर सर्च केले जाते. अभ्यासाच्या काही नोट्स काढायच्या असतील किंवा काही संदर्भ शोधायचे असेल तर गुगलला सर्च केले जाते. गुगलही क्षणात हवी ती माहिती पुरवते म्हणूनच गुगलला गुरु असे म्हटले जाते. गुगल गुरूमुळे माहितीचा महास्फोट झाला आहे. गुगल म्हणजे इंटरनेट वरील एक विश्वच आहे. आज त्याच गुगल गुरू चा वाढदिवस आहे. 

         अमेरिकेतील मेनलो पार्कमधील सुसान वेजोसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज व सर्जेई  ब्रिन यांनी ७ सप्टेंबर १९९८ साली गुगल कंपनीची स्थापना केली. लॅरी पेज व सर्जेई ब्रिन यांनी सुरवातीला या कंपनीचे नाव 'बॅकरब' असे ठेवले होते. मात्र नंतर ते बदलून गुगल असे ठेवण्यात आले. त्याचे कारणही रंजक आहे. गुगल ही एक गणिती संज्ञा आहे. एकावर १०० शुन्ये दिल्यावर जो आकडा येतो त्याला गुगल म्हटले जाते. मिल्टन सिरोट्टा या गणित तज्ज्ञाने ही संज्ञा शोधून काढली व वापरली. जगातील प्रचंड माहितीच्या साठ्याचे व्यवस्थापन करणे व जगातील कोणालाही ही माहिती सहजगत्या उपलब्ध करून देणे हा हेतू असल्याने कंपनीचे नाव गुगल असे ठेवण्यात आले.   गुगल कंपनीची स्थापना ७ सप्टेंबरला झाली असली तरी २००५ पासून कंपनीने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला. या पाठीमागचे कारण म्हणजे २७ सप्टेंबर रोजी गुगलला सर्वात अधिक पेज व्ह्यू मिळाले. २७ सप्टेंबर या दिवशी सर्वात जास्त पेज व्ह्यू मिळाल्याने  हाच दिवस गुगलचा  वाढदिवस म्हणून साजरा करण्यात यावा  असा अट्टाहास गुगलमधील  कर्मचाऱ्यांनी धरला. कंपनीने तो मान्य केला तेंव्हापासून म्हणजे २००५ पासून २७ सप्टेंबर याच  दिवशी गुगलचा वाढदिवस  साजरा केला जातो. ७ सप्टेंबर १९९५ रोजी स्थापन झालेल्या  गुगल कंपनीच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. गुगल ही आज जगातील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक कंपनी आहे. गुगल कंपनी  केवळ भूतकाळात रमत नाही तर भविष्याचा वेध घेऊन नवीन नवीन फीचर्स आपल्या ग्राहकांना देते. गुगलने त्यांच्या मुख्य शोध यंत्रात अनेकदा सुधारणा केली असून, इतर अनेक उपकरणांवर त्याचा वापर कसा वाढवता येईल याचा विचार केला आहे. १९९८ साली गुगलने तंत्रज्ञानाचे जग नाट्यमयरित्या बदलून टाकले व सर्च इंजिन कायमचे सुधारून टाकले. गुगलने जग बदलून टाकले. गुगलने इंटरनेट विश्वात क्रांती केली. आज गुगल हे नाव माहीत नसणारा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. गुगलमुळे इंटरनेटची विक्रमी वाढ झाली. जगातील अब्जावधी लोक गुगलचा वापर करतात. गुगल हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. गुगलवर आपण आपल्याला पडलेल्या कोणत्याही प्रश्नांचे उत्तर शोधू शकतो म्हणूनच आज ज्याच्या त्याच्या तोंडी गुगल गुरू हा शब्द रूढ झाला आहे. जगातील कोणतीही माहिती अथवा प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास गुगल गुरूला विचारा तो क्षणात ती माहिती किंवा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देईल. गुगल गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

-श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: