आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

जगातील सर्वात मोठा शेतकऱ्यांचा संप यशस्वी करणारा आगरी माणुस क्रांतीसुर्य नारायण नागू पाटील

 लोकनेते दि.बा पाटलांचा इतिहास तर झाकी आहे…जगाला नारायण नागू पाटील सांगणं अजून बाकी आहे’

२४ जुन २०२१ च्या आंदोलना नंतर आपला लढवय्या योध्दा आदरणीय दि.बा पाटील आणि त्यांच्या नेतृत्वात प्रस्थापित झालेला साडेबारा टक्केचा कायदा संपुर्ण महाराष्ट्राला माहित पडला. परंतू असे आमच्या भुमीपुत्रांत रत्नांचा आगार आहे जे केवळ आपल्या पुरती नाही तर अखंड समाजासाठी लढले आहे ज्यांचा इतिहास जगा समोर यायचा आहे आणि अशाच एका रत्नांचा म्हणजे क्रांतीसुर्य नारायण नागू पाटील यांचा स्मृती…तर जाणुन घेऊया ‘लोकनेते दि.बा पाटलांचा इतिहास तर झाकी आहे…जगाला नारायण नागू पाटील सांगणं अजून बाकी आहे’

    आप्पासाहेबांच्या आई महादीबाई यांनी आपल्याला पुत्ररत्न प्राप्त व्हावा यासाठी नागेश्वर देवाला नवस केला होता.दिनांक २९ ऑगस्ट १८९२ रोजी अलिबागच्या खारेपाटातील धेरंड या गावी श्रावणी सोमवारी क्रांतीसुर्य नारायण नागू पाटलांचा जन्म झाला अन अखंड आगरी समाजाच्याबरोबर शेतकऱ्यांना त्यांचा देव लाभला.शाळेत असतानाच एकूण वर्तन पाहून आप्पासाहेबांना लाभलेले पहिले गुरू काणे गुरूजींनी तर हा मुलगा पुढे हूशार होणार ही भविष्यवाणीच केली होती. कै.दत्तू गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी ‘आगरी बोंर्डिंग’ स्थापन केले होते

   विद्यार्थी दशेत ‘आगरी बोर्डिंगात’ असतानाच त्यांना ईंग्रज सरकार विरुध्द येणारे वाङ्मय मिळत असे जे ते रात्रभर जागुन वाचीत अन त्यातील आवडणारा भाग लिहून ठेऊन पाठांतर करत असत. या गुप्तवाङ्मयात सर्वाधिक भाग स्वातंत्र्यवीर  सावरकरांच्या क्रांतीप्रवन काव्यानेच भरलेले असत ज्याचे ते पठन करुन ठेवीत. अशाप्रकारे देशभक्तीचे धडे त्यांनी विद्यार्थीदशेतच गिरवले होते.

आप्पासाहेबांसोबच डॉ.बाबासाहेबांचे दुर्मिळ छायाचित्र

कठीण काळात चिकाटीने आपले शिक्षण घेत पुढे ते शाळेत प्राध्यापकही झाले अन पुढे ते आगरी समाजातील पहिले आमदारही झाले, त्यांच्या पत्नी देखील मुख्याध्यापिका होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणामध्ये जमीन कसणाऱ्या कुळांची खोतांकडून पिळवणूक होत होती ज्यात खोतांनी काही सामाजिक काळिमा फासणाऱ्या  गोष्टी देखील केल्या न या पिळवणुकीतून शेतकऱ्यांची सुटका करण्याचे आप्पासाहेबांनी निश्चय केले.२५ फेब्रुवारी १९३० रोजी पेण येथे खोती विरोधात सभा झाली त्या परिषदेचे नेतृत्व आप्पासाहेब अन अनंत चित्रे यांनी केले होते. असंख्य शेतकऱ्यांचा या परिषदेत सहभाग होता अन सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार ॲड.ए.एन सुर्वे अध्यक्ष स्थानी होते. त्यानंतर या चळवळीशी अनेक शेतकरी संघटना जोडू लागल्या. २४ जानेवारी १९३१ ला पोलादपुर येथे सभाझाली आणि मग आप्पासाहेबांनी या सभेचे सत्र करीत संपुर्ण कोकण पिंजुन काढला.

खोती पध्दतीच्या विरोधात वाढता पाठिंबा पाहता सावकारांनी कुरगोडी अन कारस्थाने करीत नाना पाटलांविरोधात खोट्या तक्रारीदेखील केल्या. १९३२ ते १९३३ आप्पासाहेबांवर सरकारने भाषणबंदी ही आणली अन नजरकैदेतही ठेवले होते तेव्हा आप्पासाहेब वेषांतर ठिकठिकाणी भाषणे यशस्वी करीत. १९३३ ला सरकारने भाषणबंदी उठवली. २७ ऑक्टोंबर चरी सारख्या छोट्यागावात शेतकऱ्यांची सभा बोलवली आणि या सभेत शेतकऱ्यांना संपावर जाण्याचे आवाहन केले मग सुरू झाला ऐतिहासिक असा शेतकऱ्यांचा संप!

  कुळांनी जमीनी कसायला नकार दिला आणि अन्न पिकवायचे नाही असा ठाम निश्चय केला. या दरम्यान शेती न केल्यामुळे उपासमारीची वेळ येणार होती परंतू इकडचा भुमीपुत्र शेतकरी हबकला नाही तर त्याने लाकडे विकली,कंदमुळे विकली. एक महत्वाची बाब म्हणजे त्यावेळसही आपले सागरी जिल्हे हे एक होते. संपूर्ण मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, वसई भागातील आगरी, कुणबी, गवळी, कोळी, भंडारी, खारवी, भोई, कराडी, सुतार, कुंभार या शेतकरी समाजांचा त्यांना पाठिंबा होता.ठाणे-डोंबिवलीतून अनेकदा धान शेतकऱ्यांना दिल्याचे अनेक ज्येष्ठांचे सांगणे आहे.

   या ऐतिहासिक संपात मोलाची साथ नारायण नागू पाटील यांना मिळाली ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. १९३४ ला बाबासाहेब बोटीने चरी येथे येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले अन यासंदर्भात कायदा बनविण्याचेही सुचवले होते यानंतर स्वत: जिल्हाधिकारी मध्यस्थी करण्यासाठी आप्पासाहेबांकडे आले होते परंतू त्यातून काही निष्पण झाले नाही.याच दरम्यान संपावर आरोपवजा वृतांत करण्याचे काम काही वृत्तपत्रातून चालू होते. मग आप्पासाहेबांनी ७ जून १९३७ रोजी संपाचे वृत्तांत योग्य पध्दतीने शेतकऱ्यापर्यंत पोहचावे यासाठी  ‘दै.कृषीवल’ वृत्तपत्र सुरु केले.

१७ सप्टेंबर १९३९ रोजी खोती पध्दती बंद करण्याचे विधेयक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजदुर पक्षाच्या १४ आमदांच्या पाठिंब्यानिशी मुंबई विधीमंडळात मांडले यातून सरकार जागे झाले अन सरकार चरी येथे आप्पासाहेबांना भेटण्यास गेले आणि शेतकऱ्याचा विजय झाला अन ‘कसेल त्याची जमीन’ #कुळकायदा हे तत्व प्रस्थापित झालं! तब्बल ६ वर्ष चाललेला हा शेतकऱ्यांचा यशस्वी असा एकमेव संप आहे ज्याचं नेतृत्व आपल्या भुमीपुत्राने केले होते यासमोर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बंगालमधील निळी च्या बागेतील व गुजरातमधील बोर्डोली सत्याग्रह लहान होता. अशा क्रांतीसुर्याची दखल महाराष्ट्र सांस्कृतीक मंडळाने वा पाठ्यपुस्तकात का बरी घेतली नसेल या वादात न जाता आतातरी ती घ्यावी हीच या योध्यास आदरांजली असेल…..

-सर्वेश रविंद्र तरे 

(लेखक प्रसिद्ध आगरी कवी व साहित्यिक तसेच पंचमहाभूत संघटनेचे सहसंस्थापक आहेत)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...