आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार रवींद्र मालुसरे यांना जाहीर

फलटण : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यस्तरीय पत्रकारांच्या प्रातिनिधीक संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणार्‍या २८ व्या सन २०२० च्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली असून त्यातील सन्मानाचा मुंबई विभागातून रविंद्र तुकाराम मालुसरे, संपादक, साप्ताहिक पोलादपूर अस्मिता व मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे अध्यक्ष यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

   याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार ‘दर्पण’ पुरस्कार मुंबई येथील उत्कृष्ट समाज माध्यम पत्रकारिता करणारे मुक्त पत्रकार श्री.योगेश वसंतराव त्रिवेदी व धाडसी पत्रकार, कोविड योद्धा म्हणून ‘दर्पण’ पुरस्कार श्री.मंगेश चिवटे (मुंबई)यांना जाहीर करण्यात आला आहे.

 रवींद्र मालुसरे हे मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष असून गेल्या अनेक वर्षात त्यांनी अनेक उपक्रम कल्पकतेने राबविले आहेत. मुंबई आणि महाड पोलादपूर तालुक्यातील अनेक सामाजिक-सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. गेली ३२ वर्षें ते विविध विषयांवर वर्तमानपत्रातून सातत्याने लेखन करीत असतात. 

 जाहीर केलेले पुरस्कार ‘कोव्हिड-2019’ च्या परिस्थितीत राज्य शासनाच्या निर्देशानुसार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी पोंभुर्ले ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ‘दर्पण’ स्मारक प्रकल्पातील ‘दर्पण’ सभागृहात समारंभपूर्वक देण्यात येतील. सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव (सातारा) व कृष्णा शेवडीकर (नांदेड) तसेच कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके (सातारा) यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: