आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

अपघातग्रस्तांचे देवदूत कल्पेश ठाकूर यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा ---जिल्हाधिकारी निधी चौधरी ; "साई सहारा प्रतिष्ठान"च्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

पेण:-  मुंबई-गोवा महामार्गावर मागील 16 वर्षांपासून अपघातग्रस्तांना विनामूल्य मदत करणारे, अपघातग्रस्तांचे देवदूत  कल्पेश ठाकूर यांचा आदर्श जिल्ह्यातील सर्वांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज येथे केले.

     जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते मुंबई-गोवा महामार्गावरील आंबिवली फाटा,पेण येथील साई सहारा हॉटेल येथे साई सहारा प्रतिष्ठानच्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पेण उपविभागीय पोलिस अधिकारी विभा चव्हाण, तहसिलदार डॉ.अरुणा जाधव, वरिष्ठ माजी पोलीस निरीक्षक आय.एस.पाटील, पेण पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ, दादर सागरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील, उपनिरीक्षक के.आर.भौड, डॉ. किशोर देशमुख, महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अभियंता संजय ठाकूर आदी उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी निधी चौधरी पुढे म्हणाल्या की, देशात व महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट सुरु आहे. मी पेण प्रांताधिकारी असताना कल्पेश ठाकूर यांच्या सामाजिक कार्याची माहिती होती. मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांसाठी त्यांचे मदतकार्य गेली अनेक वर्षे सुरू आहे. मुख्य म्हणजे त्यांनी आपल्या या मदतकार्यात मागील सोळा वर्षांपासून सातत्य ठेवले आहे. ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे. ज्या प्रकारे अनाथांच्या आई पद्मश्री सिंधूताई सपकाळ निरपेक्ष भावनेने कार्य करीत आहेत, त्याप्रमाणेच कल्पेश ठाकूर यांनीही कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता नि:स्वार्थी भावनेने हे मदतकार्य असेच चालू ठेवावे.पेण प्रांताधिकारी असताना माझ्या हातून त्यांच्या या समाजसेवी कार्याचा गौरव करण्यात आला होता,  आज जिल्हाधिकारी म्हणून त्यांना पुन्हा गौरविताना एक विशेष समाधान मिळत आहे.

    करोनाची भयंकर लाट संपूर्ण जगात, देशात व राज्यात निर्माण झाली आहे. या काळात रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील तरुणांनी कल्पेश ठाकूर यांचा आदर्श घेवून गरजूंना मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. करोना पासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, वारंवार हात धुणे व सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे, या त्रिसूत्रीचे पालन जनतेने काटेकोरपणे करावे, सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप अशा कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, करोना रोगावर प्रतिबंधक लस देण्याची मोहीम जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून वय वर्ष 45 वरील सर्वांनी दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना यावेळी केले.

    जिल्‍हाधिकारी श्रीमती चौधरी पुढे म्हणाल्या, राज्यात करोना आजारावरील  उपचार म्हणून देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी अधिक वाढल्याने तुटवडा जाणवत आहे. मात्र ज्या रुग्णाला खरोखरच या औषधाची गरज आहे, त्यालाच डॉक्टरांनी ते इंजेक्शन देणे गरजेचे असून सरसकट सर्वच रुग्णांना हे औषध देणे चुकीचे आहे. तरी डॉक्टरांनी सरसकट सर्वच रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचा निर्णय घेऊ नये.    

        पेण मधील करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पेण मध्ये 200 खाटांचे हॉस्पिटल लवकरात लवकर उभे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने कल्पेश ठाकूर यांच्या नि:स्वार्थी सेवेबद्दल त्यांचा उपस्थित सर्व मान्यवरांनी यथोचित गौरव केला. करोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे काटेकोर पालन करीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायक संतोष पाटील तरणखोपकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: