आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

महात्मा गांधी जयंती दिनी उरण सामाजिक संस्थेचे घर बैठे आंदोलन.

उरण (विठ्ठल ममताबादे )-उरण तालुक्यात एकही अत्याधुनिक व सुसज्ज असे रुग्णालय नसून अनेक वर्षांपासून रुग्णालयची समस्या प्रलंबित आहे.उरणमध्ये सुसज्ज व अत्याधुनिक सेवासुविधांनी युक्त असे रुग्णालय त्वरित उभारण्यात यावे यासाठी उरण तालुक्यात  सर्वप्रथम उरण सामाजिक संस्थेने लढा उभारला व त्यासाठी वेळोवेळी शासकीय दरबारी  पाठपुरावा सुद्धा केला. उरण मध्ये त्वरित  हॉस्पिटल व्हावे यासाठी नेहमी पाठपुरावा करणाऱ्या उरण मधील उरण सामाजिक संस्थेतर्फे  उरण तालुक्यात मंजूर झालेल्या जागेवर तातडीने रुग्णालय उभारावे या प्रमुख मागणीसाठी  दि 2/10/2020 रोजी  महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून घर बैठे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना उरण सामाजिक संस्थेच्या वतीने प्राध्यापक राजेंद्र मढवी व सीमा घरत यांनी दिले आहे. 

उरण सामाजिक संस्थेच्या प्रयत्नामुळे आणि तत्कालीन आमदार विवेकानंद पाटील, आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे उरण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयासाठी प्लॉट नंबर -1, सेक्टर 15 A, द्रोणागिरी उरण येथे  5983 चौ. मी  भूखंड 2013 साली मंजूर झालेला आहे. मात्र आतापर्यंत या बाबतीत शासनाने चालढकलचे धोरण अवलंबिले आहे. आजपर्यंत उरण मधील विविध अपघातात 800 हुन अधिक व्यक्तींना योग्य व त्वरित उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला आहे.मोठ मोठे ऑपरेशन साठी मुंबई, नवी मुंबईला जावे लागते. हार्ट अटॅक सारख्या जीवघेणा रोगामुळे तसेच  योग्य वेळेत उपचार होत नसल्याने इतर विविध रोगांच्या  व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तरीही शासनाचा या जनतेच्या महत्वाच्या समस्येकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे.जनभावना लक्षात घेऊन सदर समस्या त्वरित सुटण्यासाठी व सरकारचे या महत्वाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि 2/10/2020 रोजी सकाळी 11 ते 12 या एका तासाच्या दरम्यान घरातच बसून  "घरबैठे मागणी आंदोलन" आयोजित केले आहे. उरण मधील जास्तीत जास्त नागरिकांनी या आंदोलनात कोरोनाचे शासनाचे नियम पाळून सहभागी व्हावे असे आवाहन उरण सामाजिक संस्थेमार्फत करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: