आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १६ जून, २०२०

समाजसेवेचा पिंड बाळगून असलेला कोविड योद्धा !


सध्याच्या कोरोना जागतिक महामारीच्या काळात डाॅक्टर, नर्स, आरोग्यसेवक, पोलिस, सफाई कामगार, सरकारी कर्मचारी इत्यादी कोविड योद्धे रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून कोरोनाविरुद्धचे युद्ध लढत आहेत. यासोबतच काही समाजसेवी संस्थाही या लढ्यात उतरुन सर्वतोपरी मदत गरजूंना उपलब्ध करुन देत आहेत. बरेचसे समाजसेवकही मदतकार्यात पुढाकार घेताना दिसत आहेत. हे सर्व कोविड योद्धेच होत. अशाच समाजसेवकांपैकी एक समाजसेवक म्हणजे ताडदेवच्या नवी जायफळवाडी येथील श्री. ज्ञानोबा गणपत बांदल. 

   श्री ज्ञानोबा गणपत बांदल हे उत्कर्ष सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. तर पोलादपुर तालुका युवक  संघटना मुंबई या संघटनेचे सहकार्याध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते मुंबई टँक्सी चालक मालक सेनेचे सहचिटणिसही आहेत. या अशा विविध सामाजिक संस्थात्मक पदांची जबाबदारी सांभाळत असताना ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती अपार श्रद्धा असणारे कट्टर शिवसैनिक आहेत. विशेष म्हणजे शिवसेना प्रभागात कोणतेही मोठे पद नसताना किंबहुना कोणत्याही पदाची अभिलाषा न बाळगता शिवसेनेशी एकनिष्ठ राहून समाजसेवेचे व्रत त्यांनी अविरत सुरु ठेवले आहे. शिवसैनिक हा मुळातच समाजसेवकाचा पिंड बाळगणारा असतो. त्याचे प्रत्यंतर श्री. ज्ञानोबा बांदल यांनी नवी जायफळवाडी परिसरात वेळोवेळी केलेल्या समाजोपयोगी कार्यातून दिसून येते.

   सध्याच्या कोविड १९च्या कठिण परिस्थितीतही त्यांचे समाजकार्य थांबलेले नाही. या परिस्थितीतही विविध प्रकारची समाजसेवा त्यांनी सुरुच ठेवली आहे. आरोग्य तपासणी शिबीर, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, परिसराचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) इत्यादी उपक्रम समाजसेवेच्या माध्यमातून श्री. ज्ञानोबा बांदल यांनी चालू ठेवले आहेत. तर  मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात स्वत: सहभाग घेऊन रक्तदानही केले आहे. त्याचबरोबर पावसाळा तोंडावर असताना त्यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करुन धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणीही करुन घेतली आहे.

सातत्याने समाजसेवेत कार्यरत असणार्‍या श्री. ज्ञानोबा बांदल यांचे कोरोना महामारीच्या काळातही न थांबलेले समाजकार्य कौतुकास्पद आहे. एका प्रकारे त्यांनाही कोविड योद्धा म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या या समाजेसेवेच्या कार्याला सलाम.

- दीपक गुंडये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या

दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...