आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १९ जून, २०२०

मुंबईतील अद्भुत ठिकाण - ग्लोबल विपश्यना पॅगोडा


मुंबई ही खरेतर अनेक आश्चर्यांची खाणच आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या ह्या शहरात अनेक उपनगरे असून प्रत्येक उपनगरात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण वास्तू किंवा स्थळ पाहायला मिळते. मुंबईची सीमाच इतकी विस्तीर्ण आहे की प्रत्येक मुंबईकराने यातील प्रत्येक वास्तू पाहिलीच असेल असे छातीठोकपणे सांगणे धारिष्ट्याचे ठरेल. अशाच एका अद्भुत स्थळाला मी माझे कार्यालयीन सहकारी व आयुष विभागाचे सहायक संचालक डॉ घोलप यांचेसह नुकतीच भेट दिली. बोरिवली पश्चिमेला असलेल्या गोराई खाडीच्या पलीकडे उभे आहे, मुंबईतील एक आधुनिक आश्चर्य आणि ते म्हणजे ग्लोबल विपश्यना पॅगोडा. सध्या लॉकडाऊन थोडासा अनलॉक कडे सरकतोय. मात्र तरीदेखील सर्व पर्यटनस्थळे, प्रशिक्षण केंद्रे बंदच आहेत. त्यानुसारच इतर पर्यटन स्थळांसारखे ग्लोबल विपश्यना पॅगोडादेखील पर्यटकांसाठी पूर्णपणे बंदच आहे. त्यामुळे आम्हीदेखील तेथे पोहोचलो तेव्हा पूर्णपणे शुकशुकाटच होता. डॉ घोलप यांनी पॅगोडा संस्थेतील त्यांचे परिचित श्री अगरवाल यांना संपर्क साधून आगामी प्रशिक्षण सत्रासाठी नियोजनात्मक बाब म्हणून संस्था पाहण्यासाठी विनंती केली व त्यानुसार शनिवारी झालेली आमची ही भेट पूर्वनियोजित होती. 



      मुंबईतील सुप्रसिद्ध ठिकाण एस्सेल वर्ल्ड च्या बाजूलाच साधारणतः दहा वर्षांपूर्वी निर्माण झालेली ही वास्तू खरेतर अद्भुत कलेचा नमुनाच आहे. आम्ही त्या ठिकाणी पोहोचून श्री अगरवाल यांना संपर्क केला. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आम्ही वास्तूत प्रवेश केला. पॅगोडा म्हणजे खरंतर, आपल्या भारतीय बौद्ध स्तुपाचेच एक वेगळे रूप. बौद्ध धर्म भारताबाहेर जसजसा आशिया खंडात पसरत गेला, तसतसे जपान, म्यानमार या ठिकाणी बुद्धांनी सांगितलेल्या विपश्यनेसाठी ध्यानधारणेसाठी विशिष्ट वास्तुविशेषांची निर्मिती केली गेली. भारतात ज्याप्रमाणे स्तूप, विहार निर्माण झाले, तसेच अन्यत्र पॅगोडांची निर्मिती झाली. भारतातील स्तूप घुमटाकार होते, परंतु अन्य देशांतील पॅगोडा आकाशाला गवसणी घालणारे उंच उंच. त्याच धर्तीवर मुंबईतील बोरिवलीत अरबी समुद्रातील गोराई खाडीत उभा राहिलेला हा ग्लोबल विपश्यना पॅगोडादेखील आकाशाला गवसणी घालणारा आहे.  म्यानमारमधील श्वाडॅगन पॅगोडाची प्रतिकृती म्हणजेच हा ग्लोबल विपश्यना पॅगोडा. श्वाडॅगन पॅगोडाची उंची ३३० फूट आहे, तर ग्लोबल विपश्यना पॅगोडाची ३२५ फूट. दोघांचा सोनेरी रंग मात्र सारखाच आहे, लांबून पॅगोडा पाहताना सुवर्णमंदिराचा भास होतो, याचा घुमट अवकाशात घुसत असल्याचेदेखील भासते. त्यामुळेच गोराईचा हा पॅगोडा, केवळ मुंबईच नाही, जागतिक आश्चर्याचाच नमुना आहे. कारण फक्त दगडांपासून बांधण्यात आलेला हा जगातील सगळ्यात मोठा पॅगोडा आहे. तसेच हा डोम बांधताना कुठल्याही प्रकारच्या खांबांचा, अथवा लोखंड-स्टीलचा आधार घेण्यात आलेला नाही. चहापाणी झाल्यावर अगरवाल यांनी आम्हाला संपूर्ण परिसर दाखवत या सर्व इतिहासाची इत्यंभूत माहिती दिली. प्राचीन भारतीय वास्तुशैलीत ज्याप्रमाणे प्रचंड आकाराचे दगड केवळ खाचांनी एकमेकांशी जोडले जायचे, त्याचप्रमाणे दगड रचून हा डोम उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे मध्यभागी असलेला वजनदार डोम जमिनीपासून ९० फुटांवर असून त्याला कुठल्याही प्रकारचा आधार दिलेला नाही. ग्लोबल विपश्यना पॅगोडामध्ये बुद्धांच्या प्रतिमा इतक्या विलक्षण आहेत की त्यावरील तेज त्यांच्या जिवंतपणाची जाणीव करून देतात. या परिसरात अनेक मुर्त्या, प्रतिमा, बोधपर फलक, पवित्र असा पिंपळ वृक्ष, फळ व फुलझाडे, उद्याने असून त्याचे निरीक्षण करत आम्ही सभोवताली एक फेरफटका मारला. या ठिकाणी विपश्यना करण्यासाठी मोठे सेंटर असून त्या ठिकाणी विपश्यना करण्यासाठी जगभरातून अनेकजण येत असतात. दहा दिवसांचे विपश्यनेचे प्रशिक्षण वर्ग याठिकाणी भरत असून त्याची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने केली जाते. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे प्रशिक्षण वर्ग बंद आहेत. भारत आणि जगभरात प्रसिद्ध असलेले विपश्यनागुरू सत्यनारायण गोएंका यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सेंटर उभारण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार येथे विपश्यनेचे वर्ग चालतात आणि हा पॅगोडा सर्व जातिधर्माच्या लोकांसाठी खुला आहे. पॅगोडाचा परिसर इतका मनमोहक आहे की पाहताक्षणीच आम्ही त्याच्या मोहात पडलो. प्रवेशद्वारापाशी असलेली ८० मेट्रिक टन वजनाच्या मार्बलपासून बनवलेली बुद्धमूर्ती साडेएकवीस फूट उंचीची असून जाताक्षणीच लक्ष वेधून घेते. त्याशिवाय बोधिवृक्ष, अशोकस्तंभ, धम्मचक्र अशी बुद्धांशी संबंधित प्रतीकेही इथे पाहायला मिळतात. त्याशिवाय चित्रमालिकेतून बुद्धचरित्र मांडणारे कलादालन व पुस्तकालयदेखील इथे आहे जे बंद असल्यामुळे आम्हाला पाहता आले नाही. दरवर्षी लाखो लोक या ठिकाणाला भेट देतात. ग्लोबल विपश्यना पॅगोडाच्या कळसाची उंची साधारणतः ९९ मीटर इतकी आहे. या पॅगोडाचा घुमट २८० फूट व्यासाचा असून हा जगातील सर्वात मोठा डोम आहे. आजवर विजापूरचा इतिहासप्रसिद्ध गोल घुमट सगळ्यात मोठा ‘स्तंभविरहित घुमट’ म्हणून प्रसिद्ध होता, परंतु कुठलाही स्तंभ किंवा लोखंडाचा वापर न करता उभारण्यात आलेला ग्लोबल विपश्यना पॅगोडाचा डोम गोल घुमटापेक्षा तिप्पटीने मोठा आहे. डोमच्या बांधणीसाठी तब्बल २५ लाख टन बेसॉल्ट आणि जोधपुरी लाल दगडांचा वापर करण्यात आलेला असून त्यांच्या जोडणीसाठी इंटर लॉकिंग पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. या डोममध्ये एकाच वेळी तब्बल आठ हजार माणसे ध्यानधारणेला बसू शकतात.


 निरनिराळ्या बॅचेसमध्ये इथे ऑनलाईन नोंदणीद्वारे विपश्यना वर्ग चालत असून प्रशिक्षणार्थीना इथे राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध आहे. निवासासाठी इथे अनेक खोल्यादेखील आहेत ज्याची स्वच्छता व व्यवस्था तारांकित हॉटेल्सला लाजवेल अशी आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व सेवा ही मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. केवळ मर्जीने अथवा दानशूर व्यक्तींकडून सहाय्य स्वीकारले जाते. एका दिवसासाठी भेट देणाऱ्या पर्यटकांना पॅगोडा परिसर पूर्णपणे पाहता येतो ज्यासाठीदेखील कुठलेही शुल्क नाही. उद्यान, उपहारगृह यांचा गरजेनुसार वापर करता येतो. दहा दिवस कोर्स केलेले प्रशिक्षणार्थी कधीही या ठिकाणी एक दोन दिवसांसाठी येऊन ध्यानधारणा आनापणा करू शकतात. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात शांत, निसर्गरम्य असे हे विपश्यना केंद्र ध्यानधारणेसाठी व मनःशांतीसाठी उत्तम ठिकाण आहे. आज विविध आजारांनी ग्रस्त लोक औषधोपचाराने आपले शरीर बरेदेखील करतील मात्र मनाचे आजारपण दूर करण्यासाठी विपश्यनेपेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. दुपारी बाराच्या सुमारास पोहोचलेलो आम्ही तब्बल अडीच तास दुपारी अडीच वाजेपर्यंत या परिसराची सोशल डिस्टन्स व प्रतिबंधात्मक काळजी घेत भटकंती केली. अगरवाल यांच्या आग्रहाखातर येथील सात्विक जेवणाचादेखील आम्ही आस्वाद घेतला व तीनच्या सुमारास नवी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालो. लॉकडाऊन उघडल्यावर ह्या विपश्यना केंद्राला व अद्भुत स्थळाला भेट देण्याचा आपणदेखील अवश्य प्रयत्न कराल याची खात्री आहे. 


-वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...