आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

पेण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांकडून नर्सला छत्रीने मारहाण ? गुन्हा दाखल

प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या उपचारावरून वाद; नर्सला शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप
 गडब (अवंतिका म्हात्रे): पेण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या उपचारावरून वाद निर्माण झाल्यानंतर ऑनड्यूटी नर्ससोबत असभ्य वर्तन करून तिला छत्रीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 10 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 2 वाजता गौरी देवजी कडू या प्रसूतीसाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. त्यावेळी ऑनड्यूटी नर्सने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा सोनावणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर नियमानुसार सुरक्षा कर्मचाऱ्यांमार्फत डॉक्टरांना लेखी कॉल पाठविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

लेखी कॉल देऊनही डॉक्टर रुग्णालयात तपासणीसाठी आले नसल्याचा आरोप असून, रुग्णाला अलिबाग येथे हलविण्याचा निरोप देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार ऑनड्यूटी डॉक्टर मराठे यांनी रुग्णाला पुढे हलविण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, दरम्यानच्या काळात प्रसूतीकळा वाढल्याने रुग्णाची रुग्णालयातच प्रसूती करणे आवश्यक झाले.

यानंतर पुन्हा डॉ. सोनावणे यांच्याशी संपर्क साधण्याचा तसेच लेखी कॉल पाठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते रुग्णालयात आले नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. अखेर रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांना बोलावण्यासाठी गेले असता त्यांच्याशी कथितरीत्या शिवीगाळ व असभ्य वर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

दरम्यान, रुग्णाची रुग्णालयातच सुखरूप प्रसूती झाली. त्यानंतर डॉ. सोनावणे रुग्णालयात आले. प्रसूतीनंतर रुग्णाला टाके घालण्याची जबाबदारी डॉक्टरांची असताना संबंधित नर्सला टाके घालण्यास सांगण्यात आले आणि त्यानंतर तिच्याशी शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

नर्सचा आरोप : मोबाईलवर चित्रीकरण करताच छत्रीने मारहाण

तक्रारीनुसार, संबंधित प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टरांनी नर्सला छत्रीने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून असभ्य भाषेत अपमान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

नर्सच्या तक्रारीनंतर या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार शुक्ला शिरगावकर यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.

रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे

याबाबत वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर अरसळे यांनी सांगितले की, दोन्ही कर्मचाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा केल्यानंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होईल. घटनेची माहिती घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल.

पेण उपजिल्हा रुग्णालयातील सेवा, डॉक्टर व कर्मचारी यांच्यातील समन्वय आणि रुग्णांना मिळणाऱ्या उपचार व्यवस्थेबाबत या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६

डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे यांना ‘वंदे मातरम् सन्मान पुरस्कार’

मुंबई : (प्रतिनिधी )सामाजिक, कामगार आणि जनसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ‘वंदे मातरम् सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    समाजातील गरजू, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणे, नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे कार्य डॉ. कांबळे यांच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची आणि समाजहिताच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘वंदे मातरम् सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
    या पुरस्कार सोहळ्यात विविध सामाजिक, कामगार, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ गायिका तसेच ‘मुंबई मित्र’ वृत्तपत्र समूहाच्या संपादिका अनघा राणे यांच्या हस्ते डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. कांबळे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    डॉ. कांबळे हे विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवित असून, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्यक्ष पातळीवर काम करण्यावर त्यांचा भर आहे. सामाजिक न्याय, कामगार कल्याण, नागरिकांना शासकीय सुविधा मिळवून देणे आणि युवकांना समाजकार्याच्या प्रवाहात सहभागी करून घेणे या क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

फक्त रात्रशाळा शिक्षकाचा प्रवास टपाल तिकीटावर उमटला ; "प्रा. नागेश हुलवळे यांच्या बहुआयामी कार्याची दखल"

अहिल्यानगर जिल्हाच्या अकोले तालुक्यातील जांभळे या छोट्याशा गावातील प्रा. नागेश हुलवळे यांचा भारतीय डाक विभागाने 'माय स्टॅम्प...