वाडा (प्रतिनिधी):बिल्डर आणि रहिवासी यांच्यामधील संबंध नेहमी तणावाचे राहतात. दोघांमधे सहसा पटत नाही. वाडा शहरातील शरद नगर मध्ये मात्र वेगळी परीस्थीती आहे. बिल्डर व रहिवासी मंडळी यांच्यामधील नातं हे जिव्हाळ्याचं व कौटुंबिक आहे. नगरामधे राहणाऱ्या सर्व महिलांना शरद नगरचे संस्थापक व बिल्डर शरद यशवंत पाटील हे बहीण मानतात. त्यामुळे गेली १५ वर्ष सलग दरवर्षी धनत्रयोदशीला भाऊबीज सोहळा रंगतो. यावर्षीही शुक्रवार दि. ०६/११/२०२६ रोजी शरद नगर मधील सर्व महिलांना शरद पाटील यांनी भाऊबीज केली व एक आदर्शवत सोहळा संपन्न झाला.
' आम्ही संस्कृती जपतो - आम्ही परंपरा पाळतो ' हे घोषवाक्य असलेल्या वाडा तालुक्यातील शरद नगरमधे दरवर्षी सामुहिक भाऊबीज सोहळा संपन्न होतो. सर्व महिलांना साडीची भेट दिली जाते. महिला शरद पाटील यांना ओवाळणी करून आशीर्वाद देतात. शरद नगरची स्थापना २०११ साली झाली. तेव्हापासून दरवर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला जातो. यावर्षीही नगरातील जय जिजाऊ महिला मंडळाने भाऊबीज सोहळा स्वप्नपूर्ती गणपती बाप्पा मंदिरामधे आयोजित केला होता. या सोहळ्याला नगरातील महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
नगर उभारणारा बिल्डर व नगरामधे राहणारे रहिवासी यांच्यामधे चांगले संबंध असल्याने या नगरामधे विविध उपक्रम नियमित साजरे होत असतात. वाडा तालुक्यामधे ' बिल्डरची भाऊबीज ' या नावाने या उपक्रमाचे कौतुक होते. स्वप्नपूर्ती गणपती बाप्पा मंदिरामधे संपन्न झालेल्या या सोहळ्यामधे जय जिजाऊ महिला मंडळाने मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा