आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२६

दिवाळीच्या दिवशी घेतला माणुसकीचा संकल्प ! अपंगत्वाशी झुंजणाऱ्या कुटुंबाला सामाजिक कार्यकर्त्या योगिता शिर्के यांचा मदतीचा हात

गडब (अवंतिका म्हात्रे)- दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण मानला जातो. मात्र, समाजातील काही गरजू कुटुंबांच्या आयुष्यात हलाखीच्या परिस्थितीमुळे अंधार कायम असतो. अशाच एका गरजू कुटुंबाच्या जीवनात माणुसकीचा प्रकाश निर्माण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या योगिता शिर्के यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मदतीचा हात पुढे केला आहे.
       मुरबाड तालुक्यातील रांजणगाव येथील कुसुम नथुराम शेलवले (वय ६४) यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांचा मुलगा शरद नथुराम शेलवले (वय २९), सून शारदा शरद शेलवले (वय २६) आणि नात सोनू (वय ५) हे तिघेही दिव्यांग आहेत. कुटुंबातील सदस्यांना दिव्यांगत्वामुळे दैनंदिन जीवन जगताना अनेक हाल-अपेष्टा सहन कराव्या लागत असून उदरनिर्वाह करणे मोठे आव्हान बनले आहे.
        या कुटुंबाची व्यथा समजल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या योगिता शिर्के यांनी तात्काळ पुढाकार घेतला. केवळ सणापुरती मदत न करता, या दिव्यांग कुटुंबाला दर महिन्याला आवश्यक किराणा सामान देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
आजच्या धावपळीच्या युगात स्वतःच्या घरात दिवे लावण्याबरोबरच गरजवंतांच्या आयुष्यात आशेचा दिवा लावून योगिता शिर्के यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे शेलवले कुटुंबाला केवळ आर्थिक आधारच नाही, तर जगण्याचे नवे बळ आणि मानसिक दिलासा मिळाला असून, समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीही अशा कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे यावे, असा संदेश यातून दिला गेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दिवाळीच्या दिवशी घेतला माणुसकीचा संकल्प ! अपंगत्वाशी झुंजणाऱ्या कुटुंबाला सामाजिक कार्यकर्त्या योगिता शिर्के यांचा मदतीचा हात

गडब (अवंतिका म्हात्रे)-  दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण मानला जातो. मात्र, समाजातील काही गरजू कुटुंबांच्या आयुष्यात...