गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर महाराष्ट्राच्या घराघरांत उत्साह संचारतो. आरास सुरू होते, मोदकांचा सुगंध दरवळतो, ढोल ताशांचा नाद घुमू लागतो आणि वातावरण भक्तिमय होते. पण याच उत्साहाच्या गर्दीत एक प्रश्न दरवर्षी अधिक मोठा होत चालला आहे. आपण गणेशोत्सव साजरा करतोय, की गणेशाच्या नावावर स्वतःचे प्रदर्शन भरवतोय?
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले, तेव्हा देश पारतंत्र्यात होता. लोकांनी एकत्र यावे, समाजात जागृती निर्माण व्हावी, जातीभेदाच्या भिंती ओलांडून लोकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण व्हावी, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि स्वराज्याची ज्योत घराघरांत पोहोचावी, ही त्यामागची भूमिका होती. गणपतीची मूर्ती हे केंद्र होते, पण ध्येय होते समाजाला जागे करणे.
आज काही ठिकाणी गणपतीची उंची किती, मंडप किती कोटींचा, सजावट किती भव्य, दर्शनासाठी किती लाख भाविक आले, दक्षिणा किती जमा झाली आणि सोशल मीडियावर आपल्या मंडळाची किती चर्चा झाली, याचीच जणू स्पर्धा सुरू आहे. बाप्पापेक्षा मंडळ मोठे आणि भक्तीपेक्षा ब्रँडिंग मोठे झाले, तर त्याला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणायचे की प्रतिष्ठेची बाजारपेठ?
सकाळी बाप्पाला पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची, भक्तिभावाने हात जोडायचे आणि रात्री त्याच बाप्पाच्या मंडपामागे पत्ते आणि जुगाराचा डाव रंगवायचा. हा कसला भक्तिभाव? एका बाजूला अथर्वशीर्ष आणि दुसऱ्या बाजूला डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर धांगडधिंगा. देवाला आपण प्रसन्न करतोय की त्याच्या नावाखाली स्वतःची हौस भागवतोय?
याहून अस्वस्थ करणारे चित्र मोठ्या मंडळांच्या दर्शनरांगांमध्ये दिसते. रणरणत्या उन्हात किंवा मुसळधार पावसात तासनतास उभे असलेले वृद्ध, महिला, लहान मुले, कडेवर तान्ही बाळे घेऊन उभ्या असलेल्या माता, हे सगळे केवळ काही सेकंदांच्या दर्शनासाठी.
आणि अखेर बाप्पासमोर पोहोचल्यावर काय?
“चला, चला, पुढे चला!”
डोकं टेकवायलाही वेळ नाही. स्वयंसेवकांनी ढकलायचे, काही ठिकाणी अक्षरशः डोके बाप्पाच्या चरणांवर टेकवून पुढे सरकवायचे. पण त्याच वेळी एखादा मोठा अभिनेता, उद्योगपती किंवा राजकीय नेता आला की रांग थांबते. सुरक्षा व्यवस्था बदलते. मार्ग मोकळा होतो. निवांत आरती होते, फोटो होतात आणि दर्शनही मनसोक्त होते.
मग प्रश्न एवढाच. बाप्पाच्या दरबारातही सामान्य भक्त आणि व्हीव्हीआयपी भक्त असे दोन वर्ग निर्माण झाले आहेत का? कदाचित बाप्पाही आज या सगळ्याकडे पाहून विचारत असेल.
“मी विघ्नहर्ता आहे की तुमच्या प्रतिष्ठेचा ब्रँड अँबेसेडर ? माझ्या दर्शनासाठी आलेल्या वृद्धाला तुम्ही ढकलता आणि प्रसिद्ध व्यक्तीसमोर लाल गालिचा अंथरता, तर माझ्या मूर्तीसमोर पूजा नेमकी माझी सुरू आहे की पैसा, सत्ता आणि प्रसिद्धीची?” हा प्रश्न केवळ मंडळांना नाही, सरकारलाही आहे.
लाखो भाविक एखाद्या मंडळाकडे येणार असतील तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? मंडळाची, पोलिसांची, महानगरपालिकेची की सरकारची? गर्दीची कमाल क्षमता निश्चित का करू नये? वृद्ध, दिव्यांग, गर्भवती महिला आणि लहान मुलांसह येणाऱ्यांसाठी स्वतंत्र व सन्मानजनक दर्शनव्यवस्था सक्तीची का नसावी? आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, सुरक्षित प्रवेश व निर्गमन मार्ग, गर्दीचे वैज्ञानिक नियोजन आणि जबाबदार स्वयंसेवक यांची तपासणी बंधनकारक का नसावी?
ध्वनिप्रदूषणाचे नियम आहेत, पण अंमलबजावणी किती होते, हा वेगळाच प्रश्न. मंडपात किंवा त्याच्या आडोशाला जुगार, मद्यपान अथवा इतर बेकायदा प्रकार आढळले तर संबंधित मंडळावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. देवाच्या नावावर नियम मोडण्याचा परवाना कोणालाही मिळता कामा नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हीव्हीआयपी दर्शन संस्कृतीचा फेरविचार झाला पाहिजे. देवासमोर सगळे समान असतील, तर दर्शनव्यवस्थेतही तो समानपणा दिसला पाहिजे.
आज लोकमान्य टिळक स्वतः एखाद्या भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रवेशद्वाराशी उभे राहिले असते, तर कदाचित त्यांनीही विचारले असते. “मी लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव सार्वजनिक केला होता. तुम्ही लोकांना व्हीआयपी आणि सामान्य अशा रांगांत विभागण्यासाठी का?” त्यांना अपेक्षित असलेला गणेशोत्सव समाजाला विचार देणारा होता. आजचा काही ठिकाणचा गणेशोत्सव मात्र समाजाला आवाज देतोय, तोही डेसिबलमध्ये. गणेशोत्सव भव्य असण्यात काहीही गैर नाही. ढोल ताशेही हवेत, देखावेही हवेत, आनंदही हवा. पण त्या सगळ्याच्या केंद्रस्थानी गणपती आणि माणुसकी राहिली पाहिजे. मंडळाची प्रतिष्ठा नव्हे.
कारण शेवटी बाप्पाला तुमची मूर्ती किती फुटांची होती, मंडप किती कोटींचा होता किंवा दानपेटीत किती रुपये जमा झाले याचा हिशेब नको असेल. कदाचित तो फक्त एवढेच पाहत असेल.
“माझ्या नावाने दहा दिवस उत्सव करताना तुम्ही एका माणसाला तरी माणसासारखे वागवले का?”
आणि या प्रश्नाचे उत्तर जर आपल्याकडे नसेल, तर पुढच्या गणेश चतुर्थीला बाप्पाला “पुढच्या वर्षी लवकर या” म्हणण्याआधी एकदा स्वतःलाच विचारायला हवे.बाप्पा खरोखर पुन्हा यायला उत्सुक असेल का?
- लेखक - पार्थ मिलिंद भगरे
- मुलुंड पूर्व मुंबई
- ८८५०७७५१५४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा