आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६

लहान मुलांमध्ये रमणारे आनंद दिघे साहेब...

ठाणे (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)_प्रत्येक व्यक्तीला कामाच्या रहाटगाडग्यातून मन रमण्यासाठी काहीतरी वेगळेपण हवे असते... मग त्यासाठी तो वेगवेगळे छंद जोपासत असतो... आनंद दिघेसाहेब आणि लहान मुले हे एक वेगळंच Combination होते... ते लहान मुलांमध्ये इतके रमत की, ते एखाद्या ठिकाणी, कार्यक्रमात किंवा शाळेत गेले तर तेथील लहान लहान मुलांमध्ये अगदी रममाण होऊन पुढील एखाद्या ठिकाणी जाण्यास विसरत... मग त्या मुलांना खाऊ, भेटवस्तू देऊन अगदी त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यातीलच ते होऊन जात असंत.!_*
        *_दीपावलीच्या सुट्ट्या शाळांत जाहीर झाल्या की, साहेब संपूर्ण ठाणे जिल्यातील लहान मुलांना क्रिकेटचं साहित्य देत असंत... अगदी सकाळीच लहान लहान मुले एका पानावर संबंधित संघाचे नाव, संघातील सर्व खेळाडूंची नावे लिहून आणीत... लहान मुलांचा टेंभी नाक्यावरील गोंधळ, गोंगाट, रांगा लावण्यावरून त्यांची आपसांत होणारी लुटुपुटीची भांडणे साहेबांना खूप आवडत असंत.! मग आम्ही कुणीतरी त्या सर्व संघातील सदस्यांची हजेरी घेऊन तिच सर्व मुले आलेली आहेत का.? त्याचबरोबर त्यांची नावे यादीतील नावाप्रमाणे तपासून खात्री करून अंतिम यादी साहेबांकडे देत असू... मग साहेब तो क्रिकेटचा तयार संच भेटण्यास आलेल्या कोणत्याही व्यक्ती, कार्यकर्त्याच्या हस्ते त्या संघाला सुपूर्द करीत असंत... आणि मग ते साहित्य मिळाल्यावर लहान मुलांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद, तो जल्लोष साहेब मिश्किलपणे हसत तो आनंद टिपत असंत, त्यांना त्यामध्ये एक वेगळाच आनंद प्राप्त होत असे... आमच्यापैकीच कोणीतरी संबंधित क्रिकेटचं साहित्य पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्याला लाखोंच्या बिलांचे धनादेश घेऊन जायचो... परंतू सदर साहित्य वाटत असतांना कोणीही फोटो काढून त्याची कोठेही प्रसिद्धी केलेली त्यांना अजिबात आवडत नसे... तोच नियम जून, जुलै, ऑगस्ट असे ३/४ महिने सलग शाळांतील विद्यार्थ्यांना सरसकट वह्या वाटपाच्या कार्यक्रमाबाबत.! तिथे तो विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे की सधन घरातील, हा भेदभाव नसे... आणि संबंधित साहित्य वाटतानाही फोटो, प्रसिद्धी या प्रकाराला त्यांचा तीव्र विरोध असे, त्यांचे म्हणणे असे की लोक आपल्याकडे मदतीला गंमत म्हणून येत नाहीत, ती त्यांची मजबुरी असते, आणि आपण जर असे काही उद्योग केले तर उद्या आपल्याकडे या मदतीसाठी कुणीही येणार नाही... त्यामागे त्यांची किती संवेदनशीलता, किती उदात्त विचार होते.? जिल्ह्याच्या ग्रामीणच नव्हे तर काही शहरी भागांतही या वह्या किंवा शालोपयोगी साहित्य ट्रक/टेम्पो भरभरून ३/४ महिने जात असंत...
       नोव्हेंबर, डिसेंबर महिना सुरू झाला की लहान मुलांना घेऊन पालक शाळांच्या प्रवेशासाठी आनंदाश्रमात (कार्यालयात) यायचे... कार्यकर्त्यांची लगबग व्हायची... ठाणे जिल्यातील शाळांच्या नावांचे वेगवेगळे फोल्डर्स बनवून त्या त्या फोल्डर्समध्ये त्या त्या विद्यार्थ्यांची नावे, पत्ते, संपर्क दूरध्वनी नोंदण्याची जबाबदारी एखाद्या कार्यकर्त्यावर दिली जायची... (बहुदा ते रजिस्टर तयार करण्याची जबाबदारी आमच्यावरच असायची)... त्या सर्व विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाचा हा अखंड यज्ञ जून/ जुलै/ऑगस्ट ते अगदी सप्टेंबर पर्यंतही सुरू असायचा... या शालेय प्रवेशांसाठी साहेब सर्व महत्त्वाची कामे बाजूला सारून पुनःपुन्हा शाळेत चकरा मारत पण त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान ते होऊन देत नसत...
        आनंदाश्रमातील त्यांच्या टेबलवर सतत मिठाई, पेढ्यांचे बॉक्सेस असंत... कोणीही लहान मुले आली की त्यांना ते ती मिठाई देत असत, ऐनवेळी अगदी काही नसले तरी चॉकलेटचा डबा आतमधून आणून त्यांना चॉकलेट तरी ते देत असंत, पण त्या लहान बालकाला ते विन्मुख पाठवत नसत, कामाच्या धबडग्यातही त्या मुलाला ते उचलून घ्यायचे, त्या लहान शिशूला त्याच्या कोमल गालावर हात फिरवून शब्द दिला जायचा "बेटा, मी तुला हवे तिथे तुझं ऍडमिशन करून देईन" मुले खुश होऊन नाचायला लागली की, त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद साहेबांना फारच समाधान देऊन जात असे...
      येत्या २६ ऑगस्ट २०२६ रोजी साहेबांना परलोकवासी होऊन २५ वर्षे होतील, परंतु प्रत्येक ठाणेकरांच्या हृदयात साहेबांनी असे काही स्थान प्राप्त केलेय की सहजासहजी लोक साहेबांना विसरू शकत नाहीत, नव्हे नव्हे ठाण्यात एक पिढीच साहेबांनी घडवलेली होती...
        कितीही कातडे पांघरा, असे साहेब होणे नाही, साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.!!
     २६  ऑगस्ट ठाण्याचे अनभिषिक्त राजे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची पुण्यतिथी, त्यांना विनम्र आदरांजली!!

-विजय चव्हाण...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लहान मुलांमध्ये रमणारे आनंद दिघे साहेब...

ठाणे (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)_प्रत्येक व्यक्तीला कामाच्या रहाटगाडग्यातून मन रमण्यासाठी काहीतरी वेगळेपण हवे असते... मग त्यासाठी तो वेगव...