मुंबई (रामदास धो. गमरे): बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या समितीच्या मुंबई विभाग सभासद आणि रहिवाशांची सर्वसाधारण सभा रविवार दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजता माजी चिटणीस गजानन तांबे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई - १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सदर सभेचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी गायक सुधाकर मर्चंडे यांनी आपल्या भारदस्त आणि पहाडी आवाजात केले तर सुनील पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करीत असताना बौद्धजन पंचायत समिती संघटनेची गाव खेड्यात असलेली गरज व समाजाच्या विकासासाठी असलेली पुढील वाटचाल, उपाययोजना यावर आपले विचार मांडीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नात्याने उपस्थित असणाऱ्या बौद्धजन पंचायत समितीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी आपल्या भाषणात "बौद्धजन पंचायत समितीची स्थापना ही शैक्षणिक, सामाजिक कार्याच्या उद्देशाने झाली असून या मूलभूत ध्येयाला केंद्रस्थानी ठेवून समिती आजवर अश्ववेगाने आपल्या कार्याचा विस्तार करीत समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने आणि प्रभावीपणे कार्यरत आहे. समितीच्या वार्षिक बजेट मध्ये सर्वात जास्त भर आणि खर्च हा शैक्षणिक प्रकल्पांवर केला जातो परंतु ग्रामीण, खेड्यापाड्यात अजूनही गरजू मुलांना त्याचा फायदा होत नाही म्हणून ग्रामीण, दुर्गम खेड्यापाड्यात बौद्धजन पंचायत समितीचा विस्तार होऊन सर्व फायदे तेथील सभासदांना, त्यांच्या मुलांना, परिवाराला मिळाले पाहिजेत याकरता जिल्हा, तालुका व ग्रामीण पातळीवर बौद्धजन पंचायत समितीचे संघटन होणे गरजेचे आहे" असे नमूद करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर सभेत सर्वानुमते मंजूर आणि पारित झालेल्या ठरावानुसार अध्यक्षपदी अतिश जाधव, उपाध्यक्ष सुधारक मर्चंडे, चिटणीस सुनील पवार, सरचिटणीस सुजित कासारे, खजिनदार स्वप्नील जाधव, हिशेब तपासनीस कमलेश पवार, संपर्क प्रमुख रणजीत महाडिक, अंकुश गमरे, सल्लागार गजानन तांबे यांची निवड करण्यात आली. सदर सर्वानुमते मंजूर करण्यात आलेल्या कार्यकारिणीची नावे जाहीर करताच सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले, सदर मुंबई विभागातील सभासदांचा मेळावा आणि सभा आयोजित करून ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे सुधाकर मर्चंडे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा