पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील ओतूर येथे स्थित श्री कपर्दीकेश्वर देवस्थान हे इतिहास, लोक परंपरा, संत परंपरा यांचा सुंदर संगम असलेले स्थान आहे. कपर्दीकेश्वर देवस्थानाची सर्वात प्रसिद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे श्रावणी सोमवारची तांदळाची पिंड. सहाजिकच याच परंपरेमुळे कपर्दीकेश्वराची श्रावणातील दर सोमवारी भरणारी यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेली आहे.
याच परंपरेचा धागा पकडून रविवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२६, श्रावण शुद्ध एकादशी अर्थात पुत्रदा एकादशी या अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवसाचे औचित्य साधून ओतूर परिसरातील पवित्र भूमीत एक श्रद्धामय धार्मिक उपक्रम भक्तिभावाने ओतूर येथील श्री. हांडे देशमुख परिवारातर्फे संपन्न झाला.
ओतूर येथील प्राचीन व श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या ग्रामदैवत श्री कपर्दीकेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी तांदळाच्या पिंडी करण्याची धार्मिक परंपरा आहे. या पवित्र परंपरेमध्ये भक्तांकडून श्रद्धेने तांदूळ अर्पण केले जातात आणि त्यापासून पिंडी तयार करून विधीपूर्वक पूजा-अर्चा केली जाते. श्री कपर्दीकेश्वर देवधर्म संस्थेत श्री. राजेंद्र आनंदराव हांडे देशमुख हे व्यवस्थापकीय मंडळात स्वयंसेवक म्हणून सेवाव्रती आहेत.
श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष पवित्र मानला जात असल्याने या काळात मंदिरांमध्ये विविध धार्मिक उपक्रम, अभिषेक, पूजन आणि भक्तीचे कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने केले जातात.
या धार्मिक परंपरेत आपलाही सहभाग असावा, या भावनेतून पुणे स्थित श्री. चंद्रकांतराव नारायणराव देशमुख यांच्या सक्रिय सहभागाने ओतूर येथील श्री. हांडे देशमुख परिवारातर्फे एका पिंडीसाठी लागणारे तांदूळ आज पुत्रदा एकादशीच्या शुभदिनी भक्तिभावाने अर्पण करण्यात आले.
हांडे देशमुख परिवारातील सदस्यांनी एकत्र येऊन, या पिंडीच्या तांदळाची वाजत-गाजत, पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत श्री कपर्दीकेश्वर मंदिराकडे नेण्यात आली. धार्मिक वातावरण, भक्तिभाव आणि पारंपरिक उत्साह यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर देवस्थानाच्या व्यवस्थापकांकडे हे तांदूळ विधीपूर्वक पूजा-अर्चा करून श्रद्धेने सुपूर्द करण्यात आले.
हा केवळ तांदूळ अर्पण करण्याचा कार्यक्रम नसून, आपल्या पूर्वजांनी जपलेल्या धार्मिक श्रद्धा, संस्कार, परंपरा आणि देवस्थानाशी असलेले कौटुंबिक नाते पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. धार्मिक परंपरा केवळ कर्मकांडापुरती मर्यादित न राहता त्यातून कुटुंबातील एकोपा, सामाजिक बांधिलकी, देवावरील श्रद्धा आणि आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दलची जाणीव दृढ व्हावी, हीच त्यामागची भावना आहे.
पुत्रदा एकादशी ही भगवान विष्णूच्या उपासनेला समर्पित असलेली एकादशी मानली जाते. ‘पुत्रदा’ म्हणजे पुत्रप्राप्ती देणारी, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या दिवशी अनेक भाविक उपवास, नामस्मरण, पूजा-अर्चा आणि प्रार्थना करून भगवान विष्णूचे स्मरण करतात. अशा पवित्र दिवशी श्री कपर्दीकेश्वर मंदिराच्या धार्मिक परंपरेत आपल्या परिवाराचा सहभाग होणे ही निश्चितच समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे.
श्रावणातील भक्तिमय वातावरण, मंदिराची पवित्रता, पारंपरिक वाजत-गाजत केलेले तांदळाचे आगमन आणि विधीपूर्वक केलेले अर्पण यामुळे आजचा दिवस श्री हांडे देशमुख परिवारासाठी श्रद्धा, संस्कार आणि समाधानाचा अविस्मरणीय दिवस ठरला.
देवस्थानाच्या धार्मिक परंपरा अखंड सुरू राहाव्यात, त्यातून समाजामध्ये भक्ती, सद्भावना आणि एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी आणि श्री कपर्दीकेश्वर महाराजांची कृपादृष्टी सर्व भक्तांवर सदैव राहावी, हीच या मंगल प्रसंगी मनःपूर्वक प्रार्थना.
-सुभाष हांडे देशमुख
ओतूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा