मुंबई( दिपक कारकर): कोकणच्या समृद्ध लोकपरंपरेचे वैभव असलेली कलगी-तुरा (शक्ती-तुरा/जाखडी) ही पारंपरिक लोककला पुन्हा एकदा मुंबईकरांच्या भेटीला येत आहे. लोककलेचे जतन,संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचविण्याच्या उद्देशाने गौरी गणपती आरती संग्रह, पातीवाडी यांच्या वतीने शनिवार,दि.०८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता मराठी साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे पारंपरिक कलगी-तुऱ्याचा भव्य सामना आयोजित करण्यात आला आहे.
या बहुप्रतीक्षित सामन्यात कलगीवाले शाहिर मधुकर अवेरे सह शाहीर अभिषेक खापरे आणि तुरेवाले शाहिर नितीन रसाळ यांच्यात शब्दांची, काव्याची, बुद्धिमत्तेची आणि लोकपरंपरेची रंगतदार जुगलबंदी अनुभवायला मिळणार आहे. ढोलकी, झांज आणि घुंगरूंच्या तालावर रंगणारे प्रश्नोत्तरांचे फड, तर्क-वितर्क, उत्स्फूर्त काव्यरचना आणि सामाजिक आशयाने परिपूर्ण सादरीकरण ही या कलेची खरी ओळख आहे.
कोकणातील गावागावांत रंगणारी ही लोककला केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून समाजप्रबोधन, अध्यात्म, लोकजीवन, विनोद आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा जपणारी कला म्हणून ओळखली जाते. बदलत्या काळात अनेक लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर असताना,त्यांचे जतन करण्यासाठी गौरी गणपती आरती संग्रह पातीवाडी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. या शाहिरांना व्यासपीठ उपलब्ध करून देत कलगी-तुऱ्याची परंपरा अधिक बळकट करण्याचा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
कोकणच्या सांस्कृतिक वारशाचा हा अनोखा सोहळा अनुभवण्यासाठी लोककला प्रेमी, रसिक प्रेक्षक आणि मुंबईतील कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तिकीट व अधिक माहितीसाठी संपर्क :
योगेश अवेरे– 9870441096
निलेश चांदिवडे– 8104422329
मधूकर अवेरे– 9699894780
तुकाराम खापरे– 9833585328
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा