मुंबई (प्रतिनिधी-महेश्वर भिकाजी तेटांबे)
हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात, तसेच छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अष्टपैलू अभिनेते कांचन पगारे आता एका नव्या दमाने रंगभूमीवर परतले आहेत. 'तरंगिणी एंटरटेनमेंट' आणि 'नवनीत' निर्मित, तसेच प्रमोद शेलार लिखित व दिग्दर्शित 'शिक्कामोर्तब' या नव्याकोऱ्या नाटकातून ते रसिक प्रेक्षकांना आपल्या प्रतिभेची एक वेगळीच जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. नाटक ही कलाकाराच्या अभिनय क्षमतेची खरी कसोटी मानली जाते. प्रसिद्धीपेक्षा कलेवरील निष्ठा आणि अभिनयातील प्रामाणिकपणा जपत, रंगभूमीशी पुन्हा घट्ट नाते जोडण्याचा कांचन पगारे यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
'शिक्कामोर्तब' या नाटकात त्यांनी एका मजनू ह्या 'बंगाली' माणसाची अत्यंत अफलातून आणि आव्हानात्मक भूमिका लीलया साकारली आहे. बंगाली धाटणीच्या मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आणि त्या भूमिकेची योग्य पकड घेण्यासाठी त्यांनी घेतलेली अपार मेहनत नाटकाच्या सादरीकरणात स्पष्टपणे दिसून येते. मजनू या पात्रात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन ते जिवंत करण्याची त्यांची शैली वाखाणण्याजोगी आहे. विनोदी प्रसंग असोत किंवा भावूक क्षण, त्यांच्या अभिनयातील नैसर्गिकपणा प्रेक्षकांना भारावून टाकतो. या नाटकात कांचन पगारे यांच्यासह सागर कारंडे, स्नेहा पराडकर आणि भक्ती रत्नपारखी या दिग्गज कलाकारांची दमदार फळी आहे. विशेषतः रंगमंचावर सागर कारंडे आणि कांचन पगारे यांची अभिनयातील 'केमिस्ट्री' आणि जुगलबंदी संपूर्ण नाटकात भाव खाऊन जाते. त्यांना स्नेहा पराडकर यांच्या करारी 'वकिली'ची आणि भक्ती रत्नपारखी यांच्या 'लैला' या पात्राची उत्तम साथ लाभली आहे.
एका जोडप्याच्या आयुष्यात अचानक आलेल्या दुसऱ्या जोडप्यामुळे निर्माण होणारा गोंधळ आणि त्यातून नात्यांवर अधिकृतरीत्या 'शिक्कामोर्तब' करणे किती गरजेचे असते, हा विषय अत्यंत खुमासदार विनोदी शैलीत मांडून प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत. कांचन पगारे आणि इतर कलाकारांच्या दमदार अभिनयाला तांत्रिक बाजूची उत्तम जोड मिळाली आहे. नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी उभारलेले आलिशान घर, शीतल तळपदे यांची मोहवून टाकणारी प्रकाशयोजना आणि अभिजित पेंढारकर यांच्या सुमधुर संगीतामुळे नाटकाची रंगत अधिकच खुलते. नाटकाचे निर्मिती प्रमुख म्हणून महेंद्र खराडे उत्तम जबाबदारी सांभाळत आहेत. अभिनयाचा हा निखळ आनंद अनुभवण्यासाठी आणि कांचन पगारे यांच्या या नव्या व प्रेरणादायी नाट्यप्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी रसिक नक्कीच आतुर असतील. या नवीन नाट्यकृतीसाठी कांचन पगारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा. ही कलाकृती नक्कीच यशाची शिखरे गाठेल आणि रसिक प्रेक्षक आपल्या प्रेमाचा 'शिक्का' या नाटकावर नक्कीच उमटवतील, अशी नटेश्वर चरणी प्रार्थना!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा