नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख): अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखा व मोरया इव्हेंट्स व एंटरटेनमेंट यांच्या विद्यमाने दिनांक २२ मार्च २०२६ रोजी आयोजित केलेल्या उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेमध्ये नेरुळ ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालय यांच्या मार्फत "राधा ना बावरली" ही एकांकिका सादर झाली. यामध्ये देवाने पदरी अंधत्व दिल्यानंतर आपलं उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ट्रेनमध्ये गाणी गाऊन भीक मागणारी राधा आणि निसर्गाचा कोप म्हणा किंवा जन्मताच विद्रूप चेहरा असलेला, शारीरिक व्याधीने त्रस्त असून सुद्धा फिल्मी स्टाईलने जगणारा, म्युनसीपालटीत झाडूवाल्याचे काम करणारा धर्मा. या दोन शापित व्यक्तींरेखांची ही आंधळी प्रेम कहानी. आंधळ्या राधाची भूमिका आपल्या कसदार अभिनयाने साकारलीय ती कल्पना मॅडम यांनी आणि धर्माची स्टाईलिश भूमिका साकारलीय ती सुनील तांबे यांनी. दोघांचाही अभिनय तोडीस तोड. अगदी कमी वेळेतही प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी ही नाट्यकृती यशस्वी सादर केली.
यामध्ये दिग्दर्शक म्हणून सुनील कदम सरांचा वाटाही तितकाच महत्त्वाचा ठरला आहे. कदम सरांचे दिग्दर्शनकौशल्य वाखानण्याजोगं आहे. दुःखातूनही सुख शोधणाऱ्या या गरीब दांपत्याचे एक एक सीन लाजबाब. दोघांच्या लग्नानंतरचा रोमँटिक सीन तर अफलातून बसवलाय. त्यामुळे कदम सरांचंही विशेष अभिनंदन. वृंदा मॅडम आणि दत्ताभाऊ अहिरे यांनी बॅक स्टेज (रंगमंच व्यवस्था) उत्तमरीत्या सांभाळलीय. आणि या संपूर्ण टीमला प्रोत्साहित करणारे, रिअल्सलला स्वतः जातीने उपस्थित राहून टीमला पाठिंबा देणारे नेरुळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रभाकर गुमास्ते हेही कौतुकास पात्र ठरले.
या स्पर्धेत एकूण १३ एकांकिका सादर झाल्या. स्पर्धेतल्या एकूण ५० ते ५५ कलाकारांमधून जी सहा उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिके दिली त्यामध्ये दोन अभिनयाची बक्षीसं आपल्या नाटकाला आहेत. तरीही अंतिम फेरी करिता आपल्या एकांकिकेची निवड झाली नाही, याचंच आश्चर्य वाटतंय. खरं तर संहितेला योग्य न्याय देण्याची जबाबदारी परीक्षकांची असते. कारण स्पर्धेची नाटकं होतात ती परीक्षकांसाठीच होतात, असं म्हणतात. तरीही त्यामध्ये उन्नीस-बीस केलं जातं, याची प्रचिती मात्र काल आम्हाला आली. असं आपलं मत राधा ना बावरली या टीमचं विशेष कौतुक, अभिनंदन करताना आनंदयात्रीचे शशिकांत गोरड यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा