वसई (प्रतिनिधी): श्रावण सरला की वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे आणि बाप्पा घरोघरी विराजमान झाले की पाठोपाठ येते ती गणेशाची आई गौराई म्हणजेच माहेरपणासाठी आलेली माहेरवाशीण तीही प्रत्यक्ष आदिशक्ती पार्वती!
कळंब गावातील घरत परिवाराने गौराई आगमनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखेतर्फे गौराईचा जागर करण्यासाठी आगळीवेगळी काव्यमैफील श्री. अनंत घरत यांच्या निवासस्थानी आयोजित केली होती. अतिशय मंगलमय आणि आनंददायी वातावरणात रंगलेली ही "दुर्वांकुर काव्यमैफिल" आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अनुभूती देणारी होती.मैफलीचे अध्यक्षस्थान कवयित्री लेखिका मा.संगीता अरबुने यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून को.म.सा.प. पालघर जिल्हाध्यक्ष प्रविण दवणे होते
सदर मैफिलीत जेष्ठ कवयित्री सौ. संगीता अरबुने, जेष्ठ गझलकारा सौ. ज्योती बालिगा-राव, श्री.प्रवीण दवणे, श्री. प्रकाश पाटील, सौ. शिल्पा परुळेकर -पै, श्री.रेमंड मचाडो, सौ. सुषमा राऊत, सौ.विशाखा गाळवणकर, सौ.रंजना ठाकूर, सौ. पद्मजा पाटील, श्री. अमोल नाईक, श्री. आनंद घरत, श्री. किशोर पवार, सुरेश घरत यांनी आपल्या कविता-आपली गीते सादर केली.
आदिशक्ती, नारिशक्ती आणि भक्तिमय आध्यात्मिक कवितांनी रंगलेल्या या काव्य मैफिलीत श्री. वीरेंद्र पाटील आणि सौ.शिल्पा-परुळेकर पै यांच्या निवेदनाने अधिक रंगत आणली.कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखेचे नविन निवड झालेले अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी श्रीगणेशाच्या साक्षीने शाखेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला असून यापुढे अनेक कार्यक्रम राबवण्याचा त्यांचा मनोदय असून नवीन कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्यामुळेच काम करायला उत्साह येतो, असे म्हणून त्यांनी सर्व सहकाऱ्यांचेआभार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा