आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

जिथे बाप्पा तिथे मोदक

     
तुर्थीच्या दिवशी श्री गणेश सर्व भक्तांसाठी पृथ्वीवर अवतरले. असे मानले जाते की गजमुख असलेला श्रीगणेश म्हणजे सर्व प्रकारची बुद्धीमत्ता, ऐश्वर्य आणि सौभाग्य मिळवून देणारा देव आणि शिव पार्वतीचा पुत्र आहे. प्रत्येक भक्ताला गणपतीची ओढ लागलेली असते. वर्षाचे ३६५ दिवस प्रत्येकजण हा गणपती बाप्पाची आतुरतेने वाट बघत असतो. महाराष्ट्रच नव्हे तर देशभर तसेच जगभर देखील अनेकजण गणेश चतुर्थी सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होते. हा भारतातील सर्वांत लोकप्रिय हिंदू सणांपैकी एक सण आहे. त्याला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते.हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणपती बाप्पाची सुंदर अशी आरास, आरती, पूजा, भजन ह्यासर्वांची जणू काही मंदियाळी गणेश चतुर्थी सणात जमलेली असते. महत्वाचं म्हणजे गणेशोत्सवात आवर्जून गणपती बाप्पांसाठी त्याच्या आवडीचे ‘मोदक’ घरोघरी आनंदाने केले जातात. मोदक हे 'आनंद' आणि 'सिद्धी' चे प्रतीक मानले जातात. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि मंगलकर्ता असल्याने, त्यांना मोदक अर्पण करणे म्हणजे आनंद आणि यश मिळवणे, असा समज आहे. 

गणपती बाप्पा आणि मोदक ह्यांचं एक अतूट नातं
    आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात. बाप्पाला अनेक प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दिला जातो. पण जिथं बाप्पा तिथं मोदक हे समीकरण नेहमीच ठरलेलं असतं. काजू मोदक, उकडीचे मोदक, मोतीचूर मोदक, माव्याचे मोदक, लाल गव्हाचे मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणपतीच्या दिवसात बाप्पासाठी तयार केला जातो. पण गणपतीला मोदक इतके का आवडतात, *पण तुम्हाला माहित आहे का? मोदकांच्या नैवेद्यामागे खास कारणही आहे. असं सांगितलं जात की, एकदा भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश दरवाज्यावर पहारा देत होते. जेव्हा परशुराम तिथे पोहचला तेव्हा गणपतीनं त्याला दारात थांबवले. परशुराम रागावून गणपतीशी भांडू लागला. या युद्धात शिवाने दिलेल्या परशुने परशुरामाने गणेशावर हल्ला केला. ज्यामुळे यामुळे गणपतीचा एक दात तुटला. जेव्हा दात तुटल्यामुळे गणपतीला अन्न चावण्यास त्रास होऊ लागला, तेव्हा त्याच्यासाठी मोदक तयार केले गेले. मोदक मऊ असतात आणि त्यांना चावण्याची गरज नसते. म्हणूनच भूक लागल्यानंतर गणेशजींनी मोदक खाल्ले. तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ बनला आहे.

      इसवी सन 750 ते 1200 या कालखंडात उकडीच्या मोदकांसारखा पदार्थ बनू लागल्याचा उल्लेख आढळतो.मोदक ही पाककृती ज्या प्रांतात तांदूळ जास्त पिकतो तेथे ही पाककृती अधिक लोकप्रिय आहे. मात्र थोड्या फार बदलासह या एकाच पाककृतीची नावं‌ बदललेली दिसतात. जिथं जे पिकतं तेच नैवेद्याच्या ताटातून ईश्वराला समर्पित केलं जातं. महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उकडीचे मोदक होतात तर विदर्भ, मराठवाडा इथं तळणीचे मोदक होतात. ओला नारळ जिथं मुबलक उपलब्ध तिथं तशाप्रकारे आतलं चूण बनतं. जिथे ओला नारळ नाही तिथं सुक्या खोबऱ्याचा वापरही केला जातो.
     दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा ह्या राज्यांत देखील हे मोदक बनवले जातात. मराठी, तमिळ आणि कानडी भाषेत ‘मोदक’ किंवा ‘कोळकटै’, मल्याळी भाषेत ‘कोळकटै’ किंवा ‘कडबू’, तेलगू भाषेत ‘कुडुमु’ अशी त्याची अनेकविध नावं आहेत. एकंदरीत मोद अर्थात आनंद देणारे हे मोदक गणेशाला फार आवडतात. आणि बाप्पाच्या आनंदासाठी घरा घरात २१ मोदक भक्ती आणि समृद्धी ह्यांचे प्रतीक म्हणून बनवले जातात.

दिव्या पाटील, 
घणसोली नवी मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

काव्यांगण... शिक्षक दिन विशेष

आवडते मला माझी शाळा सकाळी भरतो गोपाळाचां मेळा शाळेत माझ्या भरपूर खेळ मुलाचां बसला त्याच्याशी मेळ आनंदाने येतात सगळी मंडळी डब्यात खाऊ भाजी पो...