मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त, जेव्हा रायगड जिल्ह्यातील लाखो नागरिक, बुद्धीची देवता असलेल्या त्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपल्या घराबाहेर पडतील, तेव्हा एक अनोखा सामाजिक संदेश त्यांच्या नजरेस पडणार आहे.
बाल लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी आणि अशा घटनांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी कार्यरत असलेल्या अर्पण संस्थेने रायगड पोलीस विभाग आणि महिला व बालविकास विभाग (WCD), रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने, एक अभिनव जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत, २०० पेक्षा अधिक सार्वजनिक गणोशोत्सव मंडपांमध्ये आणि गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गांवर, बाल लैंगिक शोषण (CSA) प्रतिबंधावर जनजागृती करणारे फलक लावले जाणार आहेत. मुलांना बाल लैंगिक शोषणाविषयी आवश्यक ती माहिती आणि कौशल्ये प्रदान करून त्यांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम बनवणे आणि त्यांच्यासोबत आलेल्या प्रौढ व्यक्तींना बाल लैंगिक शोषणाविषयी जागरूक बनवून, त्यांना आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
बाल लैंगिक शोषण हा एक अत्यंत गंभीर अपराध असून, आपल्या देशात दर दिवशी १८७ मुलांचे लैंगिक शोषण केले जाते. विशेष म्हणजे ९७% घटनांमध्ये, मुलांचे लैंगिक शोषण हे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींकडून केले जाते (NCRB 2022). त्यामुळे या जनजागृती मोहिमेद्वारे शोषणाच्या प्रतिबंधावर विशेष भर दिला जाणार असून, मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी वैयक्तिक सुरक्षा शिक्षणाचा (PSE) व्यापक प्रचार केला जाणार आहे. वैयक्तिक सुरक्षा शिक्षण (PSE) मुलांना असुरक्षित घटना आणि व्यक्ती ओळखून त्यांना नकार देण्यासाठी आणि अशा परिस्थितींमध्ये मदत मागण्यासाठी सक्षम बनवते.
या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून, गणेश मंडपांमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो मुलांना आणि त्यांच्या पालकांना ‘पिंकी’ नावाच्या व्यक्तिरेखेवर आधारित एका गोष्टीमार्फत वैयक्तिक सुरक्षा शिक्षणाचे (PSE) ५ मूलभूत संदेश दिले जाणार आहेत. गणेश मंडपांमध्ये भाविकांच्या दर्शनाची रांग जिथून सुरू होईल, तिथे अगदी मध्यवर्ती भागातच, या संदेशांचे फलक लावण्यात येतील. जेणेकरून सर्व भाविकांना हे संदेश वाचून त्यांचा अर्थ समजून घेता येईल. प्रत्येक फलकावर एक QR कोड दिला असेल, जो स्कॅन केल्यास, मुलांना आणि त्यांच्या पालकांना अर्पणच्या इ-लर्निंग प्लॅटफॉर्मला भेट देऊन, पिंकीची संपूर्ण गोष्ट वाचता येईल. यामुळे पालकांना आणि मुलांना रांगेत उभे राहून या विषयाबद्दल अधिक जाणून घेता येईल. या गोष्टीची निर्मिती अर्पण संस्था आणि Tinkle या मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या मासिकाने संयुक्तपणे केली आहे.
रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल याप्रसंगी बोलताना म्हणाल्या "यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त विविध गणेशोत्सव मंडपांमध्ये अर्पण संस्थेतर्फे आयोजित वैयक्तिक सुरक्षा जनजागृती मोहिमेत सहभागी होताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पालक आणि मुलांना वैयक्तिक सुरक्षेच्या मूलभूत नियमांविषयी जागरूक केल्यास आपण बाल लैंगिक शोषणाला आळा घालू शकतो. समाजापर्यंत हा संदेश पोहोचवणे आवश्यक आहे. कायद्याचे रक्षणकर्ते म्हणून आम्ही त्यांच्या या उपक्रमाच्या पाठीशी आहोत."
रायगड जिल्हा महिला व बाल विकास विभाग अधिकारी श्री. श्रीकांत हवाले याविषयी बोलताना म्हणाले - "मुलं ही आपल्या देशाचं भविष्य असून त्यांना सुरक्षित ठेवणं ही प्रत्येक प्रौढ नागरिकाची जबाबदारी आहे. बाल लैंगिक शोषणामुळे त्यांच्या मनावर कायमस्वरूपी आघात होऊ शकतो, त्यामुळे अशा घटनांना आळा घालणे अत्यावश्यक आहे. व्यापक जनजागृतीच्या माध्यमातून हे साध्य होऊ शकते. अर्पण संस्थेने सुरू केलेल्या या जनजागृती मोहिमेला रायगड जिल्हा महिला आणि बाल कल्याण विभागाचा संपूर्ण पाठींबा आहे. गणेशोत्सवानिमित्त बाप्पाच्या दर्शनासाठी विविध मंडपांमध्ये येणाऱ्या अधिकाधिक पालकांपर्यंत व मुलांपर्यंत वैयक्तिक सुरक्षेचे मूलभूत संदेश पोहोचावेत, यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार आहोत."
या मोहिमेविषयी आपलं मनोगत व्यक्त करताना अर्पणच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुजा तापडिया म्हणाल्या - "बाल लैंगिक शोषणमुक्त जग निर्माण करणं हे अर्पणचं मुख्य उद्दिष्ट आहे. जर आपण मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्रपणे काम केलं, तरच आपल्याला हे उद्दिष्ट पूर्ण करता येईल. सर्वप्रथम आम्हाला मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानायचे आहेत. कारण ते अर्पणच्या प्रत्येक उपक्रमामध्ये ठामपणे आमच्या पाठीशी उभे राहतात आणि आम्हाला सर्वतोपरी मदत करतात."
या अभियानाच्या माध्यमातून, आम्ही मुलांसोबत आलेल्या प्रौढ व्यक्तींना सतर्क बनवून आणि बाल सुरक्षेमध्ये सक्रिय भूमिका बजावण्यासाठी त्यांना प्रेरित करून, सर्व मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी बांधील आहोत, असेही त्या म्हणाल्या.
गणेशोत्सवामध्ये आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे पूजन करतो. गणपती ही विद्येची आणि बुद्धीची देवता असल्याने, मुलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैयक्तिक सुरक्षेशी संबंधित महत्वाची माहिती देण्याचा, यापेक्षा अधिक चांगला आणि योग्य क्षण आणखी कोणता असू शकतो? यावर्षी अर्पणची ही मोहिम मुंबई पोलीस, रायगड पोलीस विभाग आणि महिला व बालविकास विभाग रायगड, यांच्या सहयोगाने राबवली जात आहे. या उपक्रमामुळे गणेशोत्सव फक्त भक्तीपुरता मर्यादित न राहता, त्याला प्रत्येक मुलाला सुरक्षित ठेवणाऱ्या आणि त्याचे रक्षण करणाऱ्या व्यापक सामाजिक चळवळीचे स्वरूप प्राप्त होईल. यात शंका नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा