सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा ; नवी मुंबई महापालिका खोपटावासियांच्या आंदोलनाने हादरली !
उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )निवडणुकीवर डोळा ठेवून तुटपुंजे आर्थिक सहाय्य देवून महिलांना राज्य सरकारने खुश करण्यापेक्षा त्यांच्या संसाराची, कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी दिली पाहिजे. कुटुंबातील तरुण मुलांना, कुटुंबं प्रमुखांना अपघातात मारण्याची सुपारी जर सरकार देत असेल तर या सरकारचेही भलं होणार नाही. लाडक्या बहिणींना आर्थिक मदत केली नाहीत तरी चालेल; पण त्यांचे संसार उद्ध्वस्त करू नका, असे गार्हाणे शेकडो महिलांनी टाहो फोडून सरकारला घातले.
खोपटे येथे निलेश म्हात्रे याचा अपघाती मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाच्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक बसने त्याला धडक देवून अपघात घडवून आणला. ८ फेब्रुवारीला अपघात घडला. वाहन चालक आजही तळोजा कारागृहात आहे. मात्र, त्यावेळी निलेश म्हात्रे तसेच जखमी झालेल केशव ठाकूर यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे लेखी आश्वासन देणारे नवी मुंबई महापालिकेचे परिवहन विभागाचे उपायुक्त योगेश कडूस्कर यांनी अक्षम्य हलगर्जी आणि पद तसेच अधिकाराचा गैरवापर करून खोपटे अपघातग्रस्त कुटुंबांची थट्टा उडवली आहे.
एकीकडे महापालिकेच्या लेटरहेडवर आर्थिक मदतीचा करार केला जातो, दुसरीकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी राज्य शासनाला पत्र पाठविले जाते. तर तिसरीकडे उरण पोलिसांना पत्र देवून खोपटावासियांनी अपघातानंतर महापालिका वाहतूक प्रशासनाला ओलिस ठेवल्याची ओरड करत ‘लखोबा लोखंडे’ सारखी टोपी फिरवत आहेत.
उपायुक्त योगेश कडूस्कर यांच्या गैरवर्तनाविरोधात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी प्रत्यक्ष भेटून दाद मागितली. त्यांनीही कडूस्कर यांची ‘री’ ओढत चौकशीचा फार्स केला.उपायुक्त शरद पवार यांच्याकडे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकार दिले. ते पवार कडूस्कर यांना अभय देत ‘काहीही करा, आंदोलन करा किंवा वाटेल ते करा’ अशी मग्रूरी करीत असल्याने आज कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
एनआरआय पोलिस ठाण्याच्या कडक बंदोबस्तात हे आंदोलन नवी मुंबई महापालिका प्रशासकीय भवनासमोर केले गेले. आंदोलनाला परिवहन विभागाचे अधिकारी रवींद्र दौडकर सामोरे गेले. त्यांच्यावर आंदोलकांनी प्रश्नाचा मारा केला. निलेश म्हात्रे यांच्या आईने तर टाहो फोडून वातावरणात अत्यंत गंभीरता आणली. तसेच बहिण आणि इतर कुटुंबियांनी तुमची मदत नको, आम्हाला आमचा भाऊ द्या, अशी भावनिक साद घालत प्रशासनाला घाम फोडला.
दौडकर यांनी केलेल्या युक्तीवादाची कांतीलाल कडू यांनी कायद्याच्या आधारे चिरफाड केली. हा अपघात नसून कट रचून केलेला खून असल्याचा आरोप कडू यांनी केला आहे. निर्दयीपणे माणसं मारणार्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा त्यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला.
जनवादी महिला संघटनेच्या प्रदेश सचिव हेमलता पाटील, एसएफआयचे नेते गोरख ठाकूर, विजया वर्तक, प्रशांत ठाकूर, सलोनी केणी, उषा म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, गोरख ठाकूर, अनंत ठाकूर, संजय ठाकूर, मालती पाटील आदींची कडक भाषणे झाली. त्या सर्वांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.
यावेळी खोपटे ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर, उपसरपंच रितेश ठाकूर, सदस्य सुजित म्हात्रे, संदेश म्हात्रे, प्रशांत ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर, नवनाथ ठाकूर, साहिल म्हात्रे, अनंत ठाकूर, संजय ठाकूर, जनवादी महिला संघटनेच्या सदस्या हेमलता पाटील, उषा म्हात्रे, लता पाटील, गीता पाटील, छाया मढवी, निरा घरत, पल्लवी भोईर, संदिप पाटील, मनिषा पाटील, रुपेश भगत, संदेश पाटील, यशवंत कडव, बाबुराव म्हात्रे, चांगदेव ठाकूर, जगदीश ठाकूर आदींसह खोपटे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट:-
बहिणीला देणार कायमस्वरूपी नोकरी
-------------------
आंदोलनाचे वादळ नवी मुंबई महापालिकेवर धडकल्याने अधिकार्यांची तारांबळ उडाली होती. त्यांनी निलेश म्हात्रे यांच्या बहिणीला महापालिकेत हंगामी नोकरीं देत असल्याचे पत्र कडू यांना सादर केले. मात्र, कडू यांनी त्यातील त्रुटींवर बोट ठेवून पत्राची चिरफाड केली. त्यानंतर दुरुस्ती करून कायम स्वरूपी नोकरी देण्याची कार्यवाही चार दिवसात पूर्ण करण्याचे दौडकर यांनी मान्य केले. तसेच दोन्ही अपघातग्रस्तांना देण्यात येणार्या आर्थिक मदतीविषयी वरिष्ठांशी चर्चा करून आठ दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
चौकट:-
न्यायालयात करणार खासगी दावा
-------------------
अपघातानंतर खोटी कागदपत्रे तयार करणारे नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त योगेश कडूस्कर यांच्याविरोधात उरण पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीने केली आहे. परंतु, शासकीय अधिकार्याला वाचविण्याचा प्रयत्न उरण पोलिस करीत आहेत. त्यामुळे कांतीलाल कडू यांनी आज संगितले की, पनवेल सत्र न्यायालयात खासगी दावा दाखल करून कडूस्कर, आयुक्त कैलास शिंदे, उपायुक्त शरद पवार, नवी मुंबई पोलिस आयुक्त आणि उरण पोलिस ठाण्याच्या अधिकार्यांविरोधात न्यायालयाकडे दाद मागून गुन्हा दाखल करण्यासाठी खासगी दावा येत्या १५ दिवसात दाखल केला जाईल, असे यावेळी बोलताना कडू यांनी इशारा दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा