मुंबई (प्रतिनिधी)- कांजुरमार्ग ( पुर्व ) येथील शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ४२ वे वर्ष आहे . या मंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदाही पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा पायंडा कायम ठेवत सामाजिक संदेश देणाऱ्या विषयावर सजावट केली आहे. यावर्षी गणपती बाप्पाची साडेपाच फुटाची शाडूची मूर्ती विराजमान आहे. सजावटीसाठी कागद , पुठ्ठा आणि कापड यांचा वापर करण्यात आला आहे. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच संस्कृति जतन करण्याचं कार्य मंडळ सातत्याने करत आहे. प्रामुख्याने शालेय विद्यार्थी दत्तक घेणे, त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे तसेच बालजल्लोष यासारख्या उपक्रमांतून पारंपरिक खेळांचे जतन आणि प्रसार करण्याचे काम मंडळामार्फत केले जाते. यंदा मंडळाची ५ वी पिढी कार्यरत आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे काम अविरत चालू आहे.
या वर्षी मंडळाने देखावा साकारताना"मोबाईल मध्ये हरवलेले बालपण" हा सामाजिक विषय घेऊन दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्येवर प्रकाश टाकला आहे. तसेच त्यावर काय उपाय करता येतील याचा हि मंत्र दिला आहे.
मोबाईल मध्ये हरवलेले बालपण.....
मोबाईल हि काळाची गरज आहे..... बाळाची नाही.....
लहान मुलांना संस्कारक्षम वयात देण्यात येणाऱ्या मोबाईल मुळे त्यांच्यावर कशा प्रकारे मानसिक आणि शारीरिक परिणाम होतो आहे हे या सजावटीतुन मांडण्यांत आले आहे. पालक म्हणून आपण आपली जबाबदारी विसरत चाललो आहोत. मोबाईल हे संवाद साधण्याचे माध्यम आहे . परंतु आज ते विसंवाद होण्याचे प्रमुख कारण बनले आहे. या वर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. असा संदेश यातून देण्यात आला आहे.
उत्सव साजरा करत असताना कार्यकर्ते, पदाधिकारी, जेष्ठ सभासद यांच्यातील सुसंवाद आणि योग्य तो समन्वय साधून पुढील पिढीला योग्य मार्गदर्शन करत मंडळाची यशस्वी वाटचाल सुरु आहे. दरवर्षी विविध गणेश दर्शन स्पर्धामधून सहभाग घेऊन उत्कृष्ट बक्षिसे, पारितोषिके मिळवून गणेशभक्त कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचा मंडळाचा प्रामाणिक प्रयत्न सतत सुरू असतो. त्यासाठी मंडळाच्या सर्व लहान थोर कार्यकर्त्यांचा मोठा हातभार लागून ते अविरत परिश्रम घेत असतात.यावर्षीची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत जोईल यांच्यासह शशांक चौधरी, प्रशांत पवार, उमेश सातपुते, दत्ता गजरे, साहिल खडपे, सुशांत प्रभू यांनी देखावा व सजावटीसाठी सर्व वयोगटातील लहान मोठया मुलांना सहभागी करून घेतले. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा व पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा वारसा अजून वृद्धिंगत व्हावा हा यामागील उद्देश असल्याचे मंडळाचे सहचिटणीस श्री वैभव देवरुखकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा