पेण( प्रतिनिधी) पेण तालुक्यातील हमरापुर हे गणपतीचे माहेरघर असून देशात तसेच परदेशातही येथून गणेशमूर्ती पाठवल्या जातात.आताच या गणेशमूर्तींना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत क्लस्टर विकसित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त गणपती व्यावसायिकांनी एकत्र येऊन या क्लस्टर समुह केंद्र योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
महसूल पंधरवडा निमित्त जिल्हा उद्योग केंद्राद्वारे श्री मोरया गणपती आयडॉल फाउंडेशन आयोजित क्लस्टर समूह विकास केंद्र योजना मार्गदर्शन कार्यक्रम हमरापूर, पेण येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा उदयोग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस हरळय्या ,पेण प्रांत प्रविण पवार, तहसीलदार तानाजी शेजाल, नायब तहसिलदार प्रसाद काळेकर,क्लस्टस विशेष हेतू वहन संस्थेचे निशिकांत गायकवाड उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की,हमरापूर विभागात दोनशे पेक्षा जास्त गणपती बनविणारे कारखाने आहेत. येथील कारागीर अतिशय सुबक,आकर्षक मनमोहक, सुंदर अशा गणेशमूर्ती बनवितात.या मूर्ती भारतातील सर्व भागात तसेच परदेशातही पाठविल्या जातात. या गणेशमूर्ती कारागिराना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागद्वारे हमरापूर, पेण येथे क्लस्टर समूह केंद्र तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून मुर्तीकारांना विविध सेवा सवलतीचा लाभ घेता येईल. तसेच एकत्रित सुविधा घेता येतील. तसेच आगामी काळात क्लस्टरसाठी लागणाऱ्या सामूहिक सुविधा केंद्रात अत्याधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही श्री जावळे यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सहाय्य करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री हरळय्या यांनी उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर समूह केंद्र योजनेतर्गत गणपती कारखानदार यांना देण्यात येणाऱ्या सुविधाची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमापूर्वी जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी गणपती कला केंद्राची पाहणी करून गणेशमूर्ती कश्या पध्दतीने बनवितात याची माहिती घेतली.
कार्यक्रमास सरपंच,स्थानिक कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा