आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

मोटरमन चंद्रशेखर सावंत यांचे सेवानिवृत्तीला पुस्तके भेट देण्याचं स्तुत्य आवाहन

दिवस ३ जुलै २०१८, स्थळ अंधेरी रेल्वे स्थानक. मुसळधार पावसामुळे सर्वत्र दैना उडालेली असताना सकाळी साडेसातच्या सुमारास या स्थानकात काहीतरी भलेमोठे कोसळल्याचा जोरदार आवाज आला आणि त्यासोबतच ट्रेन चे अर्जेंट ब्रेक अचानकपणे दाबल्याचा देखील. अंधेरी पूर्व पश्चिम जोडणारा गोखले पादचारी पूल थेट रेल्वे रुळांवर कोसळला होता. याच रुळावर येणाऱ्या लोकलचा आपत्कालीन ब्रेक दाबत लोकलचे मोटरमन सावंत यांनी शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवले होते. लोकल तशीच पुढे गेली असती  तर थेट ब्रीज लोकलवर कोसळून मोठी जीवितहानी झाली असती. पश्चिम रेल्वेत मोटरमन म्हणून गेली कित्येक वर्षे नोकरी करणाऱ्या सावंत यांनी दाखवलेल्या ह्या प्रसंगावधनाने अनेकांचे जीव त्या दिवशी वाचले. येत्या ३१ मे २०२४ रोजी श्री चंद्रशेखर सावंत पश्चिम रेल्वेतील सेवेची ३२ वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी त्यांना अनेक शासकीय व स्वयंसेवी संस्थांनी गौरवले आहे. पश्चिम रेल्वेने त्यांचा आदर्श मोटरमन म्हणून गौरव करत रु ५ लक्ष पारितोषिक दिले होते. त्यातील ३ लाख रुपये त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांसाठी खर्च केले. येत्या ३१ मे रोजी त्यांची सेवानिवृत्ती मोठया दिमाखात पार पडणार असली तरी त्यांनी सामाजिक भान जपत आपल्या सेवनिवृत्तीला भेटायला येणाऱ्या सर्वांनी आपल्याला पुस्तक भेट देण्याचे आवाहन केले आहे. या दिवशी जमा होणारी पुस्तके ते एखाद्या शाळेत किंवा ग्रंथालयात भेट देणार आहेत. आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशी वाचनसंस्कृतीला हातभार लावण्याचा त्यांनी केलेला मानस खरोखरच काबिलेतारीफ आहे. त्यांना सेवा सेवानिवृत्तीच्या आणि पुढील सामाजिक आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

-वैभव पाटील
नवी मुंबई अध्यक्ष
जॉय सामाजिक संस्था मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...