प्रतिनिधी (नवी मुंबई ) सुभाष हांडे देशमुख:
नवी मुंबई : आपणही समाजाचे कांहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला - क्रीडा, आस्थापना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटक यांच्या प्रती सातत्याने अभ्यासूवृत्ती व सकारात्मक भावना जोपासत भरीव कार्य करीत असलेले सुरेश केसरकर यांनां, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन व कलादालन पुणे येथील मुख्य सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांच्या हस्ते तसेच प्रमुख अतिथी न्यायाधीश मा. सोनल पाटील, जीएसटी आयुक्त मा. सुरेंद्रकुमार मानकोसकर, डॉ. कुमार सप्तर्षी, निवृत्ती न्यायाधीश मा. आर. व्ही. जताळे, पोलीस उप आयुक्त संदीप गिल्ल (भापोसे), संविधान अभ्यासक सुभाष वारे, मानवाधिकारचे हायकोर्ट व सुप्रिम कोर्टचे कायदेतज्ञ असीम सरोदे तसेच सन्माननीय प्रमुख अतिथी त्याचबरोबर कार्यक्रमाचे निमंत्रक सन्मा. विकास कुचेकर, संचालक सन्मा. श्रीकांत (अण्णा) जोगदंड व सर्व कार्यकारिणी यांच्या उपस्थितीत - मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने १० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये "मानवाधिकार पुरस्कार" देऊन सन्मानीत करण्यात आले.
सुरेश केसरकर हे सातत्याने उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या जोरावर समाजातील सर्वच घटकांप्रती कृतज्ञता जोपासत उल्लेखनीय कार्य करीत आहेत. स्वतः औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असून स्वतःची नोकरी सांभाळून, शासनाच्या विविध योजना व उपक्रम समाजामध्ये उत्कृष्टपणे राबविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. विविध संस्था, संघटना तसेच ट्रस्टच्या माध्यमातून अविरतपणे साहित्यिक, लेखक, कवी, समाजसेवक यांच्या कार्याचा सन्मान व्हावा त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांचे देश हिताचे कार्य निरंतर चालू राहावे यासाठी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्या लेखनाचे प्रकाशन करणे या कामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत असतात.
द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, यशोदर्शन फाउंडेशन, व्ही 4 ऑर्गन्स फाउंडेशन तसेच राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या सहयोगाने जिल्हा, राज्य व देश पातळीवर अवयवदान व देहदान याविषयी जनजागृती होण्याकरता पथनाट्ये, पोस्टर्स, मान्यवरांचे प्रबोधनात्मक व्याख्यान तसेच ऑनलाईन कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील सर्वच कार्यकर्त्यांनी देश हितासाठी या कार्यात सक्रीय व्हावे याकरिता विविध संघटनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील आहेत.
देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, त्यांना वृद्धापकाळात सन्मानाने जगता यावे, त्यांची चांगल्या प्रकारे गुजराण व्हावी, निवृत्तीनंतर समाधानकारक पेन्शन मिळावी याकरिता सातत्याने जिल्हा, राज्य व देश पातळीवर पत्रव्यवहार व त्यासंबंधी पाठपुराव्याच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील दिनदलित, वंचित व उपेक्षित घटक, शोषित कामगार वर्ग तसेच शासकीय सेवेत प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या सर्वच प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी, प्रभावी लेखणी तसेच अभ्यासू वृत्ती अंगीकारून शासन स्तरावरती सातत्याने आवाज उठवित असतात.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामध्ये राज्य गुणवंत कामगार असोसिएशन ही नोंदणीकृत संस्था असून या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात समाजातील सर्वच घटकांप्रती अविरतपणे कार्य सुरू आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.
त्यांना हा प्रतिष्ठेचा व नावलौकिक वाढविणारा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरावरुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा