उरण (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील करंजा कोंढरीपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांचे सुपुत्र कु.मयंक दिनेश म्हात्रे (वय १० वर्ष) याने रविवार दि.३ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे ४ वाजून १४ मिनिटांनी पेण तालुक्यातील धरमतर खाडीत उडी घेतली व पोहत पोहत मयंक म्हात्रे हा सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी उरण तालुक्यातील करंजा जेट्टीवर पोहोचला. धरमतर जेट्टी ते करंजा जेट्टी हे १८ किलो मीटर अंतर असून हे अंतर मयंक म्हात्रे यांनी केवळ ५ तास १३ मिनिटात पोहून पार केले. विशेष म्हणजे मयंक म्हात्रे याचे वय १० वर्षे असून त्यांनी हा विक्रम पहिल्यांदाच पार पाडला.
यापूर्वी त्याने अनेक जिल्हास्तरीय पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेउन नेत्रदिपक यश मिळविले होते. पहिल्यांदाच धरमतर खाडी (पेण तालुका )ते करंजा जेट्टी(उरण तालुका )हे १८ किलोमीटर अंतर मयंकने ५ तास तास १३ मिनिटात पोहून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. कु. मयंक दिनेश म्हात्रे हा उरण शहरातील सेंट मेरी स्कूल मध्ये इयत्ता ५ वी मध्ये शिकत आहे. त्याचे वडील दिनेश म्हात्रे, आई वीणा दिनेश म्हात्रे, मागर्दशक शिक्षक किशोर पाटील (केगाव दांडा ), कोच हितेश भोईर (करंजा ) यांचे मयंकला नेहमी मार्गदर्शन लाभले आहे.वयाच्या ५ व्या वर्षापासूनच कु. मयंक दिनेश म्हात्रे पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेत आहे. त्याच्या या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतूक व अभिनंदन होत आहे. जेएनपीटीचे माजी विश्वस्त भूषण पाटील , सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर,संतोष ठाकूर, मच्छींद्र म्हात्रे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी , क्रिडा क्षेत्रातील शिक्षकांनी कु.मयंक म्हात्रे याची भेट घेउन त्याचे अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा