मुंबई -(शांताराम गुडेकर / दिपक कारकर )
कोकणातील पारंपरिक लोककला होळी आणि गणेशोत्सव हे कोकणातील खरे-खुरे उत्सव.या दोन्ही उत्सवासाठी येथील शेतकरी मोकळा असतो.भाताची लावणी संपली की घरोघरी गणपती येतात आणि भाताची कापणी /मळणी संपताच शिमग्याचे म्हणजेच होळीचे वेध लागतात.कोकणातील या दोन्ही सणांशी इथल्या लोककला निगडीत आहेत.मग भजन,जाखडी नृत्य,भारुड असो किंवा नमन या कलेवर जिवापाड प्रेम करणारे रसिक नेहमीच या कलेचा आनंद लुटायला आतुर झालेले असतात.
कोकणची पारंपारिक लोककला म्हणून "नमन" या कलेकडे पाहिले जाते.शिमगोत्सवात कोकणात बहुतांशी गावातल्या प्रत्येक वाडीत नमनाचा सुर चांगलाच गवसलेला असतो.श्री गणपती आराधना ( गण ) गवळण,पारंपारिक सोंगे,सामाजिक किंवा प्रबोधनाचा संदेश देणारी नाट्यकृती "फार्स" तर सोबत काल्पनिक,पौराणिक,किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित वगनाट्य सादर केले जाते.ढोलकी, मृदुंग,टाळ ही पारंपरिक वाद्य आणि विविध चालबद्ध गाणी यांचा मेळ नमनात असतो.नमन या लोककलेत आता अनेक बदल झालेत.वेशभूषा,प्रकाश योजना,संगीत आणि वाद्यवृंद यांनी सध्याची ही नमन लोककला वेगवान आणि रंगीतसंगीत बनली आहे.
कोकणातील ही लोककला हीच जतन करण्यासाठी आणि रसिक मनोरंजनासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या "ऋणानुबंध पुरस्कार - २०२२" ने सन्मानित असणाऱ्या श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे नवोदित कलाकारांची सांगड घालून शाहीर सचिन धुमक संकल्पित, टीम सचिन चाहते परिवार यांचे "बहुरंगी भारूड" सोमवार दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी रात्रौ ८.३० वा. मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विले पार्ले (पू.) येथे आयोजित केले आहे.दरम्यान एक आगळी- वेगळी गवळण नवोदित लेखक अविनाश मांजरेकर यांच्या लेखणीतून,योगेश ओकटे यांचे उत्तम नृत्य दिग्दर्शन तर एक ऐतिहासिक नाट्यकृती शाहीर सचिन धुमक यांच्या लेखणीतून साकारलेली "पांगेरा" पहायला मिळणार आहे.कोकणातील लोकप्रिय लोककला प्रकार "बहुरंगी भारूड" प्रयोगाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी दिपक कारकर - ९९३०५८५१५३,संतोष घाणेकर - ९८३३६८९६४२,रमेश भेकरे - ९५९४३५२८६३,रमेश कोकमकर - ८८५०४२२७११ यांच्याशी संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा