नवी मुंबई : नेरूळ येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा
३२ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संघाच्या श्री गणेश सभागृहात दिनांक १२ डिसेंबर रोजी पार पडला. ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दि. ना. चापके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी संचालक चंद्रकांत बर्वे, शरद डिचोलकर, संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, सचिव दीपक दिघे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रसंगी वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात विजेत्या ज्येष्ठांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे वय वर्षे ७५, ८० व ८५ वर्षे पूर्ण केलेले व लग्नाची ५० वर्ष पूर्ण केलेल्या सदस्य जोडप्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कुमारी भावना हाडवळे हिच्या सूरमधुर बासरीने झाली. दीप प्रज्वलनानंतर उत्कर्ष महिला मंडळातील महिलांनी अतिथींचे संगीतमय स्वागत केले.
अरविंद वाळवेकर यांनी प्रास्तविकात संघाच्या विविध स्तरावर होत असलेल्या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. चंद्रकांत बर्वे यांनी दूरदर्शन व आकाशवाणी केंद्रात काम करताना आलेल्या स्वअनुभवांचे किस्से सांगितले. शरद डीचोलकर यांनी जेष्ठांच्या आनंदमयी जीवनाच्या प्रवासाचे ममत्व विशद करून प्रत्येकाने स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावयाची आवश्यकता आणि निरोगी अशा दीर्घायुष्याचे महत्त्व उदाहरणे देऊन विशद केले. श्री. चापके यांनी ज्येष्ठांनी दररोज एकमेकास भेटावयास हवे याचे महत्त्व नमूद करुन ते प्रत्येकाच्या शरीर स्वास्थ्यासाठी कसे गरजेचे आहे हे सविस्तरपणे सांगून संघटनेचे कार्य अधिक विस्ताराने व व्यापक व्हावयास हवे हे स्पष्ट केले. याप्रसंगी संस्थेचे सल्लागार प्रकाश लखापते यांनी आपल्या मातोश्री व पिताश्रींच्या स्मरणार्थ सुरु केलेल्या, संघात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येत असलेल्या पारितोषकांचे वितरण करण्यात आले. त्याचे मानकरी सौ. सुचित्रा कुंचमवार व दीपक दिघे हे ठरले. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते ते प्रदान करुन गौरविण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभाकर गुमास्ते यांनी केले आणि बक्षीस समारंभ व सत्कार समारंभ चे सुत्रसंचालन अजय माढेकर व सौ. सुचित्रा कुंचमवार यांनी केले. दिपक दिघे यांनी आभारप्रदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंकुश हाडवले, रणजित दिक्षित, नंदलाल बॅनर्जी, दत्ताराम आंब्रे,
रमेश गायकवाड, दत्तात्रय म्हात्रे, विजय सावंत, सुनील आचरेकर, गुप्ता झांसीकर, अंकुश जांभळे, लक्ष्मण गावडे, सौ. रजनी कलोसे
सौ. निर्मला शिंदे, सौ. कल्पना मोहिते. यांनी खूप मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा