सर्वप्रथम आमचा सर्व वाचकवर्ग,सहकारी पत्रकार बंधू ,वृत्तपत्र लेखक , कवी -साहित्यिक ,दानशूर जाहिरातदार -देणगीदार , हितचिंतक यांना इंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आपल्या सर्वांच्या सहकार्याने व समन्वयाने या नव्या वर्षांपासून पाक्षिक आदर्श वार्ताहर तिसरा वर्धापन दिन साजरा करून चौथ्या वर्षांत पदार्पण करत आहे याबद्दल मनःपूर्वक आभार !!
आज अनेक नवीन दैनिक , साप्ताहिक , पाक्षिक , मासिक व इतर नियतकालिक आपणास व्हाटस अप समूह किंवा वृत्तपत्र स्टॉलवर नजरेस पडतात. मात्र आमचे पाक्षिक असो किंवा या नवीन वृत्तपत्रांचे सातत्य भविष्यात कितपत टिकवून राहील वा ते टिकवून ठेवता येईल याबाबत आमच्या मनात साशंकता आहे. याचे कारण देखील स्पष्ट आहे. आज दूरदर्शन सुरु केल्यावर तुमच्या समोर पाच- पन्नास वृत्त वाहिन्या विविध ब्रेकिंग न्यूज देण्यास तयार असतात. तर तिकडे सोशल मीडियाच्या ( व्हाट्सअप , फेसबूक , ट्विटर, टेलिग्राम इत्यादी )माध्यमातून राज्यातीलच नव्हे तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी सर्वात आधी वाचायला, पाहायला मिळतात. आजच्या सबसे तेज -स्पर्धेच्या युगात आपलीच ब्रेकिंग न्युज सर्वात लवकर प्रेक्षकांसमोर कशी जाईल याची चढाओढ प्रत्येक वृत्त वाहिन्यांमध्ये लागलेली असते. मात्र एखादी बातमी रंगवून सांगताना प्रेक्षकांना आपण त्यातील सत्य कितपत सांगतोय याचे भान सर्वांनाच नसते..सोशल मीडियावर देखील एखाद्या बातमीची शहानिशा न होता ती धडाधड पुढे पसरवली जात असते.याउलट बातमीची सत्यता तपासण्यासाठी नव्हे सत्य घटना वाचण्यासाठी , जाणून घेण्यासाठी विश्वासार्ह माध्यम म्हणून वाचक वर्ग आजदेखील "वृत्तपत्रांना "च प्राधान्य देताना दिसतो.
असे असले तरी आज मुद्रित माध्यमांची झालेली अवस्था सर्वानांच ठाऊक आहे.वृत्तपत्रांच्या स्टॉलवर वृत्तपत्रे विकत घेऊन ती वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कोरोना आल्यापासून वृत्तपत्रांची पीडीएफ आवृत्ती प्रसिद्ध केली जात असल्याने सध्या वृत्तपत्रे ऑनलाईन वाचण्याकडे वाचकांचा ओढा आहे. खप नसल्याने, खर्च परवडत नसल्याने अनेक वृत्तपत्र कार्यालयात कामगार कपात, पगार कपात करण्यात आलेली आहे .आजमितीस मोठी, भांडवलदारी तसेच ज्यांना भक्कम आर्थिक पाठबळ आहे ती वृत्तपत्रे तगून आहेत. मात्र पुरेशा जाहिराती मिळत नसल्याने तसेच वृत्तपत्रांचा कागद , छपाई व अन्य किरकोळ खर्च महाग झाल्याने साप्ताहिक किंवा पाक्षिक , मासिक वृत्तपत्रे चालविणे , ती वेळच्या वेळी प्रसिद्ध करणे मुश्किल ठरत आहे.
बातमी प्रसिद्ध करण्यासाठी हक्काने किंवा वारंवार पाठवताना ती वृत्तपत्रात छापण्यासाठी काहीतरी खर्च येतो हे सर्वानी लक्षात घेऊन अधून मधून निदान जाहिरात रूपाने मदत करण्याचे भान सुद्धा जपले पाहिजे. असो . आजपर्यंत पाक्षिक आदर्श वार्ताहरची वाटचाल खडतर राहिली असली तरी आमच्या सहकाऱ्यांनी, वाचकांनी ,लेखकांनी जाहिरातदारांनी साथ देऊन ती सुकर केली आहे. समाजहिताची व प्रबोधनाची पत्रकारिता करण्यासाठी आपली अशीच साथ लाभो हिच मनोमन प्रार्थना.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा