आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

सर्व मतदार बनू..“सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरुक” !! जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी “राष्ट्रीय मतदार दिवस” झाला उत्साहात साजरा ; मतदारांनी जागरुकपणे मतदान करावे - जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

अलिबाग (जिमाका):- मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. मतदान करताना आपली सद्सदविवेकबुध्दी जागृत ठेवून मतदान करुन लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी येथे केले.

     राष्ट्रीय मतदार दिवसाच्या पार्श्वभूमीवर हा जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड व जे.एस.एम महाविद्यालय अलिबाग, निवडणूक साक्षरता क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.25 जानेवारी रोजी पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, जे.एस.एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड-19 नियमांचे पालन करीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

     यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री.अमोल यादव, उप जिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री.प्रशांत ढगे व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार श्रीमती मीनल दळवी, जिल्हा दिव्यांग आयकॉन श्री.साईनाथ पवार, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा जिल्हा युथ आयकॉन तपस्वी गोंधळी आदी मान्यवर उपस्थित होते.

        जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर पुढे म्हणाले, राष्ट्रीय मतदार दिनाचा आजचा हा कार्यक्रम केवळ रायगड जिल्ह्यात, कोकणात किंवा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देश पातळीवर राबविला जात आहे. आजच्या या राष्ट्रीय मतदार दिनाची मुख्य संकल्पना आणि मुख्य हेतू हा आहे की, आपण आपली मतदार नोंदणी केली म्हणजे सर्व झाले असे नाही तर आपल्या शेजारी आपले मित्र, मैत्रीण, नातेवाईक यांनाही आपण विचारले पाहिजे की, ते मतदार आहेत की नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतदार झाल्यानंतर ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा विधानसभा ज्यावेळी आपल्याला मतदान करण्याची संधी मिळते तेव्हा आपण आपले मतदान प्रक्रियेतील अविभाज्य मत नोंदविणे गरजेचे आहे.

     आजचा हा कार्यक्रम आपण कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करीत शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करीत आहोत. कोविडमुळे हा कार्यक्रम आज आपण आयोजित केला नसता तर वर्षभर आपण केलेल्या कामाचा प्रचार व प्रसार झाला नसता आणि राष्ट्रीय मतदार दिवसही यंदा साजरा झाला नसता. आजचा कार्यक्रम मा. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तसेच समाजमाध्यमातून संपूर्ण राज्यात तसेच देशभर हे शेअर करण्यात येत आहे. मा.भारतीय निवडणूक आयोगाला देखील आपण या कार्यक्रमाची छोटीशी चित्रफित तयार करून पाठविणार आहोत.

     जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर म्हणाले की, दि.05 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात विविध मतदार जनजागृती कार्यक्रम देखील राबविण्यात आले होते. त्यामध्ये शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, विविध महामंडळ, संस्थाना जनजागृतीसाठी अंतर्भूत केले होते. त्यानंतर वोटर हेल्पलाईन ॲप तयार केलेला आहे. या वोटर हेल्पलाईन ॲपमध्ये मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओ यांना आम्ही प्रशिक्षण दिले होते. या ॲपची माहिती देखील देण्यात आली आणि नागरिकांना हे ॲप डाऊनलोड करून त्याचा उपयोग करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. नवीन युवा मतदारांची देखील नोंदणी करण्यात आली. त्यांच्यासाठी वेबिनार आणि ऑनलाईन बैठका आयोजित करण्यात आल्या तसेच महाविद्यालय स्तरावर ब्रँड अँबेसेडर नेमण्यात आले होते. महिला मतदारांसाठी देखील जनजागृती करण्यात आली. तसेच आपल्यामध्ये उपस्थित दिव्यांग आयकॉन श्री.साईनाथ पवार यांच्या तसेच इतरांच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांची देखील नोंदणी करण्यात आली. आपण सर्वजण ज्यावेळी शपथ घेत होतो त्यावेळी ती शपथ दिव्यांगांना कळावी,याकरिता आपण सांकेतिक भाषा दुभाषीही उपलब्ध करून दिले.

     एवढेच नाही तर पनवेल तालुक्यात आपण तृतीयपंथी मतदारांची देखील नोंदणी केली. या मोहिमेंतर्गत विशेष ग्रामसभांचेही आयोजन करण्यात आले. दि.16 डिसेंबर 2021 रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण करण्यात आले, वाचन करण्यात आले. आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने आपण महानगरपालिका क्षेत्रात देखील मतदार नोंदणी केली. असंघटित मजूरांचीदेखील मतदार नोंदणी आपण केली. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातूनही मतदार जनजागृती करण्यात आली. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम व युट्यूब अशा विविध समाजमाध्यमातून मतदार नोंदणी आणि निवडणूक विषयक प्रसिद्धी करण्यात आली.

     ते पुढे म्हणाले, दि.01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित सेनादलातील अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात 1 हजार 228 (पुरुष- 1 हजार 192 आणि स्त्री- 36) सैनिक मतदार आहेत. याप्रकारे जवळजवळ 22 लाख 82 हजार 203 मतदारांची जिल्ह्यात नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरुष 11 लाख 62 हजार 900 आणि तृतीय पंथी 24 अशी मतदार नोंदणी करण्यात आली आहे. हा 12 वा मतदार दिन साजरा करीत असताना यापूर्वी आपण फक्त नोंदणी करीत होतो आणि नोंदणी करीत असताना त्या मतदार यादीमध्ये काही प्रमाणात त्रृटी तयार होत गेल्या. त्या त्रृटींचे निराकरण करून त्या मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम गेल्या चार-पाच वर्षांत आपण चालू केले आहे. या वर्षी आम्ही मतदार यादी अद्ययावतीकरणापूर्वी जवळजवळ 22 हजार नवीन युवक मतदार होते ते या मोहिमेत 66 हजारापर्यंत पोहोचले आहेत. याशिवाय बऱ्याच मतदारांचे छायाचित्र नव्हते, काहींचा फोटो होता परंतु तो फार जुना होता. तर या अद्ययावतीकरणाच्या मोहिमेत आपण सर्व जुने छायाचित्र काढून त्या जागी त्या व्यक्तीचे नवीन छायाचित्र समाविष्ट केले. जवळ जवळ 99% मतदार यादीचे अद्ययावतीकरण पूर्ण झाले आहे. मतदार यादी अद्ययावतीकरणाचे काम सर्व यंत्रणेने कोविड महामारीच्या काळातदेखील चालू ठेवले, हे यातील वैशिष्ट्य आहे. संपूर्ण यंत्रणेचे हे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.

     शेवटी आजच्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर्वांचे कौतुक करून जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये आपण सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले.

     यावेळी जे.एस.एम महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील म्हणाले की, भारत हा जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे आणि ही लोकशाही जर टिकवून ठेवायची असेल तर लोकशाहीचे प्रमुख स्तंभ म्हणून निवडणुकांकडे पाहिले जाते. या निवडणुका अत्यंत पारदर्शक, नि:पक्षपातीपणे आणि अत्यंत व्यवस्थित पार पाडण्याचे काम भारताच्या निवडणूक आयोगामार्फत केले जाते. 1952 साली ज्यावेळी पहिल्यांदा निवडणूक झाली त्यावेळी पासून हे काम सुरू आहे.

     निवडणूक आयोगाची स्थापना दि.25 जानेवारी 1950 रोजी झाली म्हणून आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करत असतो. याची सुरुवात 2011 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक आयोग स्थापन केला आणि प्रस्ताव सादर केला की, आपण मतदार दिवस साजरा करूया आणि त्यानुसार निवडणूक आयोगाच्या 61 व्या वर्धापन दिनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते पहिला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.

     ते म्हणाले, या वर्षीचा राष्ट्रीय मतदार दिवसाचा विषय “सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणूका” असा आहे. या सगळ्याचा समावेश असलेल्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग कायमच प्रयत्न करीत असतो. मतदान ही आमची जबाबदारी नाही तर आमचा हक्क आहे, असे या देशातील प्रत्येक नागरिकाने म्हटले पाहिजे. आपण ज्या वेळेस सर्वसमावेशक असे म्हणतो त्या वेळेस त्यामध्ये समाजातील सगळे घटक, प्रत्येक नागरिकाचा यामध्ये समावेश झाला पाहिजे याचा अंतर्भाव आहे. प्रत्येक नागरिकाने ज्याने आपल्या वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांनी आपले नाव मतदारयादीमध्ये नोंदविलेच पाहिजे आणि मतदार होण्याचा हक्क मिळविला पाहिजे.

        याप्रसंगी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाल्या की, सर्व युवांना माझे एकच आवाहन असेल की, आपण 18 वर्षाचे झालो आणि आपण वोटर आयडी बनविले पाहिजे केवळ यासाठी मर्यादित ठेवू नका. तर हे वोटर आयडी बनविल्यानंतर तुम्ही मतदान देखील केले पाहिजे. आपला भारत देश हा लोकशाही देश आहे आणि आपण मतदान करणे हे खूप महत्वाचे आहे.

       यावेळी नवमतदार कु.अक्षया प्रशांत नाईक हिला मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच मतदार नोंदणीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राकेश सावंत यांनी केले. तर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार श्रीमती मीनल दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...