मुंबई(गणेश हिरवे)- हांडेदेशमुख परिवाराचे आधारस्तंभ काकाश्री भास्करराव खंडेराव हांडेदेशमुख यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी अल्पशा आजाराने, पुणे येथे दिनांक २० डिसेंबर २०२१ रोजी निधन झाले. वयस्क झालेले असूनही तीव्र बुध्दीमत्ता व स्मरणशक्ती जागृत असलेले काकाश्रींचे आकस्मिकरित्या इहलोकी जाणे झाल्याने ते सर्वांच्याच मनाला चटका लाऊन गेले. म्हणूनच धनकवडी येथील स्मशानभूमीत झालेल्या त्यांच्या अंत्यसंस्कार विधीप्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे व जाणीवपूर्वक उपस्थिती दर्शवून, काही जणांनी आपल्या वक्तव्यातून श्रध्दांजलीच्या निमित्ताने भावना व्यक्त करून आपल्या मनातील दुःखाला वाट करून दिली..भास्करराव काका अण्णा या टोपण नावाने हांडेदेशमुख परिवारासह त्यांचे मित्रमंडळ व निवास परिसरात सुपरिचीत होते. अण्णांना तीन भाऊ व चार बहिणी अशी सात सख्खी भावंडे तर चार चुलत भाऊ व एक चुलत बहीण. एक सावत्र बहीण. यात अण्णा दोन नंबरचे पाल्य. त्यांच्या हळव्या मनाला लागणारी दु:खत घटना अशी घडून गेली की, गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमधे त्यांच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या चार भावंडांनी अखेरचा श्वास घेतला आणि सतत हसत खेळत वावरणारे, गप्पांमध्ये रंगणारे, दुर्दम्य इच्छाशक्ती व प्रचंड आत्मविश्वास असणारे अण्णा मनस्वी खालावत गेले. परिणामी दिवाळीच्या सुमारास पडलेल्या आकाली पावसाच्या वातावरणाने मनस्वास्थ्य हरवलेल्या अण्णांना किरकोळ आजाराने घेरले व त्यातच ते निजधामाला निघून गेले. हांडेदेशमुख परिवारातील सर्व भावंडांना त्यांच्या मुलांना, नातवंडांना एकत्रित ठेवणारे व प्रसंगी प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन देणारे व योग्य मार्गदर्शन करणारे आणि उपवर झालेल्या वधूवरांची नेटकी लिखित नोंद ठेऊन लग्नकार्य जमविण्यास सातत्याने पुढाकार घेणारे असे अण्णा. म्हणूनच एवढ्या मोठ्या कुटुंबाचा आधारवडच काळाच्या पडद्याआड गेला ही तीव्र भावना हांडेदेशमुख परिवारास दुःख देणारीच ठरली यात शंका नाही.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधीलओतूर या खेडेगावातून अण्णा पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीतून आपले शिक्षण पूर्ण करून जिल्हापरिषद पुणे यामध्ये शिक्षक म्हणून नोकरीत रुजू झाले. स्वातंत्र्य सैनिकाच्या घराण्याचा लाभलेला वारसा त्याचबरोबर एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे उपजतच आलेला सुसंस्कृतपणा, प्रचंड बुद्धीमत्ता, तीव्र ग्रहण व स्मरणशक्ती, कुठलेही काम निष्ठेने करण्याची सवय व जीद्द तसेच कामातील प्रामाणिकपणा याच्या बळावर उत्तम सेवा देऊन ते जिल्हापरिषदेच्या नोकरीतून गट शिक्षण अधिकारी या पदावरून सन्मानाने सेवानिवृत्त झाले. शिक्षण क्षेत्रातील गट शिक्षणअधिकारी या नात्याने अनेक शिक्षणसंस्थां प्रमाणे शिक्षण स्तरावरील अनेक मान्यवरांच्या संपर्कात ते आले. नोकरी निमित्तानं सतत फिरण झाल्यानं ग्रामीण भाग त्यांना फिरता आला. जवळून बघता आला. त्यामुळे त्यांच व्यक्तीमत्व अधिक प्रगल्भ तर झालेच त्याचबरोबर त्यांचा जनसंपर्कही अफाट वाढला. वागण्यात विनयशीलता तर त्यांनी अंगी बाणली होतीच बोलण्यातही प्रतिभा साकारली. जन्मत:हाच मोठ्या प्रमाणात आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती लाभल्यामुळे एकदा भेटलेली व्यक्ती, तीचे नाव - गाव त्यांच्या कायमचे लक्षात रहायचे. नुकत्याच झालेल्या दिवाळी सणाच्यावेळी दिनांक ८.११.२०२१ रोजी मी व मुलगा धिरज त्यांना भेटावयास गेलो होतो त्यावेळेस दोन तास त्यांनी राजकारण, समाजकारण आणि त्यांना भेटलेल्या व्यक्ती त्यांची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली. नेहमीप्रमाणे मी आणि धिरज त्यांचेशी सखोल गप्पा करून, ऐकून, खरे तर त्यांच्या समोर बसल्यावर फक्त ऐकून घेणे एवढीच भूमिका बजवायला लागायची हे अनुभवसिद्ध असल्यामुळे त्यांच्या आफाट स्मरणशक्तीच घरी नेरुळला येईपर्यंत चर्चा करीत होतो. आणि त्यानंतर दीड महिन्याच्या आत त्यांनी देह ठेवला की जो कायमचा चटका लाऊन गेला. एक बाकी खरं, समाजहिताच भान त्यांनी शेवटपर्यंत जपल. त्यांच्या प्रचंड जनसंपर्कामुळे आणि शिक्षण खात्यातील त्यांच्या उच्चपदस्थांशी दृढ झालेल्या ओळखींचा त्यांनी अनेक युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी उपयोग करून घेतला. अनेकांच्या कुटुंबाला आधार दिला, अनेकांची लग्ने जुळविण्यात पुढाकार घेतला. अगदि शेवटपर्यंत त्यांनी हा घेतलेला वसा जपला. सतत कार्यरत राहीले. बोलत राहीले. जनसंपर्कात रममाण राहीले. म्हणूनच त्यांच्या या निरलस अशा जीवनाला निरोगी असे दीर्घ आयुष्य लाभले. म्हणूनच या दशक्रिया विधिच्या अनुशंगाने त्यांना हांडेदेशमुख परिवारातर्फे मनःपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना अभिमानच वाटतो.म्हणूनच सारख जाणवत की, जसा काळ पुढे सरकेल तशी मनाची जखम सुध्दा भरत जाईल पण सातत्याने येणाऱ्या त्यांच्या आठवणींच काय? त्या आठवणी इतक्या खोलवर रुजल्या आहेत की ते सांगायला शब्द नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा