ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन
अलिबाग:- दक्षिण आफ्रिकेसह जगातील इतर काही देशांमध्ये कोविड-19चा घातक ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळल्यामुळे महाराष्ट्रात विशेष काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांना कोविड लसीकरण मोहीम अधिक गतीने व नियोजनबद्ध लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या, तहसिलदार, प्रांताधिकारी यांनीही कोविड लसीकरण, कोविड प्रतिबंधक उपाययोजना व्यवस्थितपणे राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
तसेच ओमायक्रॉन या विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढविणारे आहे. ओमायक्रॉन या व्हेरिएंटची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढता कामा नये, यासाठी एकूण परिस्थिती पाहता अजूनही ज्यांनी कोविड-19 लसीचा एकही डोस घेतला नाही त्यांनी आपल्या विभागातील शासकीय वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका किंवा तहसिलदार, प्रांत अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. तसेच दुसरा डोस प्रलंबित असलेल्या नागरिकांनी त्यांच्या दुसऱ्या डोसबाबतचा विहित कालावधी पूर्ण झाल्याबरोबर आपला दुसरा डोसही घ्यावा. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत नव्याने सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरीएन्टचे रुग्ण पाहता जिल्ह्यातील नागरिकांनीही याबाबत हलगर्जीपणा न दाखवता सामाजिक अंतर पाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, मास्क वापरणे याबाबत काटेकोरपणे सतर्कता बाळगावी, जबाबदारीने वागावे, जिल्ह्यात जास्तीत जास्त अँटीजन, आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात, परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे. त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने, रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो, त्यामुळे अशा प्रवाशांची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी ती माहिती तात्काळ स्थानिक प्रशासनाला द्यावी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नागरिकांना केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा