उरण (विठ्ठल ममताबादे )-समुद्र मार्गी दहशतवादी हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहेत. तसेच उरण तालुक्यातील करंजा परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असतानाही त्यांच्या सुरक्षिततेसाठी असलेली पोलीस चौकी गायब करून त्याठिकाणी सपाटीकरण करून ती जागा बळकविण्याचा घाट सुरू आहे. तरी या परिसरातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलिसचौकी पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी करंजा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे पत्र व्यवहारद्वारे केली आहे.
दहशतवाद्यांचे समुद्रमार्गे हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे समुद्र किनारे सुरक्षित राहण्यासाठी समुद्र किनारी पोलिसचौकी सुरू करण्यात आली होती. करंजा गावातही कोंडवाडा असलेल्या शासकीय जागेत काही वर्षांपूर्वी पोलीसचौकी सुरू करण्यात आली होती. परंतु कालांतराने ही चौकी आजतागायत बंद पडलेली आहे. बंद असलेली पोलीस चौकी सपाट करून त्याठिकाणी सध्या टँकर उभे करण्यासाठी होत आहे. भविष्यात ती जागा बळकाविण्याचा घाट काहींचा असल्याचे बोलले जात आहे.
करंजा गावची लोकसंख्या आता २५ ते ३० हजारांच्या घरात पोहचली आहे. त्यात करंजा परिसरालगतच द्रोणागिरी नोडची उभारणी होत इमारतींचे जाळे विणले जात आहे. त्यामुळे भविष्यात उरण पोलीस ठाण्यावर त्याचा अतिरिक्त भार पडेल.तसेच समुद्रमार्गे होणारे दहशतवादी हल्ले विचारात घेता करंजा गावातील गेली अनेकवर्षे बंद असलेली पोलिस चौकी पुन्हा नव्याने सुरू करण्यात यावी. अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.
भारत देशावर समुद्रमार्गे होणारे दहशतवादी हल्ले विचारात घेता व करंजा परिसराचा दिवसेंदिवस वाढत चाललेला विस्तार व लोकसंख्या याचा विचार करता करंजा गावानजीक समुद्रकिनारी पोलीस चौकी नाही तर पोलीस ठाणेच नव्याने सुरू करण्याची नितांत गरज आहे. तरी करंजा ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून पोलीस चौकी लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी पत्रव्यवहाराद्वारे सचिन डाऊर-सामाजिक कार्यकर्ता तथा अध्यक्ष
रमेशशेठ डाऊर सामाजिक प्रतिष्ठान उरण यांनी पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे केली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा