आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

जय भीम: एक प्रवास अंधाराकडून प्रकाशाकडे...

" जय भीम " प्रदर्शनापूर्वीच नावावरून चर्चेत आलेला, तामिळ, तेलगू, हिंदीसह पाच भाषांमध्ये अमेझॉन व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच प्रदर्शित झालेला एक संवेदनशील व सत्यघटनेवर आधारित हृदयस्पर्शी चित्रपट! चित्रपटाचे कथानक कसे आहे ? गीत-संगीत, दिग्दर्शन, अभिनय कसा आहे? हे सांगून चित्रपटाचे परीक्षण करण्यासाठीचा हा शब्दप्रपंच नाहीये.  तर हा चित्रपट पाहून झोप येत नसल्यामुळे मनामध्ये उठलेले विचारांचे काहूर पेनाद्वारे कागदावर उतरवून ते शांत करण्याचा हा खटाटोप आहे. तसे तर सेक्सपिअरने म्हटले होते की , नावात काय आहे ? त्यामुळे या चित्रपटाचे नाव ' जय-भीम ' असते काय किंवा इतर कुठले असते काय ? काहीही फरक पडला नसता कारण ही कलाकृतीच अशी आहे जी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणार होती. त्यांच्या मनाला स्पर्शून जाणारच होती. तर काहींच्या गाडीला हिरव्या मिरच्या ! त्याही लिंबा शिवाय झोंबवणारच होत्या. ( लिंबामुळे मिरच्यांचा तिखटपणा कमी होतो ना, म्हणून..) 

      चित्रपटाचे दोन पैलू आहेत किंवा दोन भाग आहेत ज्यावर पहाणारा विचार करतो. एक आहे सामाजिक आणि दुसरा कायदेशीर. साधारणपणे कथानक म्हणण्यापेक्षा 1993 मध्ये घडलेली ही सत्य घटना अशी आहे की, तामिळनाडूमधील इरुला या साप उंदीर पकडणाऱ्या आदिवासी जमातीतील राजा कन्नु व इतर दोन युवकांना पोलिसांनी चोरीच्या खोट्या आरोपाखाली विनापरवाना विना न्यायालयीन आदेश, मनमानीपणे अटक केली होती. त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर अमानुष अत्याचार केले होते. गुराढोरांप्रमाणे विवस्त्र करून मारहाण करत त्यांना त्यांनी न केलेला चोरीचा गुन्हा राजकीय दबावापोटी तसेच वरिष्ठांना खूष करण्यासाठी त्यांच्याकडून कबूल करून घेण्याचा निंदनीय प्रकार अगदी पोलीस स्टेशनमध्ये बेदरकारपणे सुरू होता!

      त्या तिघांना प्रचंड कस्टोडियल टॉर्चर करण्यात आले. अगदी त्यांना निवस्त्र करून काठ्या लाटांनी बदडण्यात आले. या अमानुष मारहाणीत त्या तिघांपैकी एक म्हणजे राजा कन्नू  दुर्दैवाने मृत्यू पावला. एक प्रकारे हा कस्तोडियल मर्डरच होता. परंतु तो लपविण्यासाठी,  ' संशयित अपराधी पोलीस स्टेशन मधून पळून गेले ' असा धादांत खोटा बनाव पोलिसांनी रचला होता.

     एकीकडे त्यांचे कुटुंबीय, खासकरून राजाकन्नूची गरोदर पत्नी संगिनी व त्यांचे कुटुंबीय परेशान होते, चिंताग्रस्त होते. त्या तीघांमधील दोघे सख्खे भाऊ होते तर एक त्यांचा मेहुणा होता म्हणजे तिघेही एकाच परिवारातील होते त्यामुळे त्यांच्या परिवाराचे सदस्य ते कुठे आहेत ? अशी विचारणा व आर्त विनवणी पोलिसांना करत होते तर दुसरीकडे पोलीस उलट त्यांच्यावरच दबाव आणून, त्यांना धमकावून, मारहाण करून हे तिघे कुठे पळून गेले आहेत ? त्यांना तुम्ही कुठे लपविले आहे ?असा उलट सवाल करीत होते! राजा कन्नूची गरोदर पत्नी संगिनी रानोमाळ दारोदार भटकत आपल्या पतीचा, दिराचा व नणंदेच्या पतीचा शोध घेत होती. ती पोटोशी होती तरीही भले मोठे पोट घेऊन ती याच्या त्याच्याकडे मदतीची याचना करीत होती परंतु कोणीही अगदी तिचा समाजही तिच्या मदतीला येत नव्हता. परंतु असे म्हणतात ना की  ' ज्याचे कोणी नसते त्याचा परमेश्वर असतो आणि तो कधी कोणत्या रूपात मदतीला धावून येईल हे सांगता येत नाही ' झालेही तसेच ! त्यांच्याच आदिवासी पाड्यावर,  एक सामाजिक कार्यकर्ती जिचे नाव मैत्रा असे असते, ती प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेत असते. ती या पाड्यावरील किंवा वस्तीवरील सर्वांना ओळखत असते. तिला हे माहीत असते की, गायब झालेले किंवा गायब केलेले तिघेजण आणि त्यांचा पूर्ण परिवार आणि पाडा हा अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू व नम्र आहे. ही मंडळी असे काम करूच शकत नाही त्यामुळे तिच्या मनामध्ये यांच्याविषयी एक सहानुभूती असते. ती स्वतः संगिनी सोबत या तिघांचा शोध घेते. या त्या कार्यालयात, पोलीस स्टेशनमध्ये जाते परंतु कुठूनही कसलीही मदत मिळत नाही. सर्व करून थकल्यानंतर ती संगिनीला घेऊन ॲड. के. चंद्रू यांच्याकडे जाते आणि इथून पुढे कहानीला एक  नाट्यमय वळण प्राप्त होते.

     ॲड. के. चंद्रू जे या सत्य घटनेचे खरे नायक आहेत त्यांच्याविषयी थोडे थोडे समजून घ्या त्यांच्याविषयी म्हणजे खऱ्या ॲड के. चंद्रूंविषयी म्हणतोय मी ! चित्रपटातील नायक सूर्या विषयी नाही. खरे ॲड के. चंद्रू ज्यांची व्यक्तिरेखा दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याने साकारली आहे ते विद्यार्थी दशेपासूनच कार्ल मार्क्स व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी झपाटलेले एक मानवाधिकार रक्षक वकील आहेत. ॲड के. चंद्रू सुरुवातीला चेन्नई म्हणजे त्या वेळच्या मद्रास उच्च न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस करत होते. पुढे ते याच न्यायालयाचे म्हणजे चेन्नई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झाले ! न्याधिशाच्या आपल्या कार्यकालात त्यांनी तब्बल शहाण्णव हजार केसेस निकाली काढल्या ! एक पारदर्शक प्रामाणिक न्यायाधीश म्हणून त्यांचा लौकिक आहे ! न्यायदानाच्या क्षेत्रात त्यांना प्रचंड सन्मान आहे. त्यांनी न्यायाधीश असताना कधीही आपल्या सोबत सुरक्षारक्षक किंवा अंगरक्षक बाळगले नाहीत ! एव्हाना त्यांना न्यायालयात वकिलांनी किंवा इतर कुणी माय लॉर्ड किंवा मी लॉर्ड म्हटलेलेही आवडत नसे ! एक न्यायाधीश म्हणून त्यांची जेवढी कारकिर्द प्रसिद्ध आहेत त्यापेक्षा अधिक प्रसिद्ध आहे त्यांची वकील म्हणून कारकीर्द ! या आदिवासींवरील खोट्या आरोपाची, अटकेची व पुढे बेपत्ता झाल्याची केस ते लढतात. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे संगिनी मैत्राच्या माध्यमातून ही केस ॲड. के. चंद्रु यांच्याकडे घेऊन गेली. संपूर्ण कहाणी कथा ऐकल्यानंतर ॲड. के. चंद्रु स्तब्ध झाले आणि त्यांनी ही केस लढण्याचा निर्णय घेतला. मानवाधिकारांच्या केसेसमध्ये त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी एक रुपयाही शुल्क घेतलेले नाही हे विशेष ! आणि ही बाब समाजसेवी मैत्राला ठाऊक होती म्हणूनच ती राजा कन्नूच्या गरोदर पत्नीला म्हणजे संगिनीला घेऊन ॲड. चंद्रूंकडे गेली होती.

      केसमध्ये विक्टिमच्या बाजूने कुठलाही पुरावा नसताना आणि दुसरीकडे सर्व काही पूर्वनियोजित आणि कागदोपत्री वेल इस्टॅब्लिश, वेल प्लॅनड, सुनियोजित व वजनदार सक्षम, पावरफुल असूनही केवळ सत्याच्या जोरावर ॲड. के. चंद्रू यांनी ही केस ( हिबीस कॉर्पस केस ) आपल्या कठोर परिश्रमाने, अभ्यासाने, बुद्धीने  निर्भीडपणे लढली. मानवतेसाठी, मानवाधिकारासाठी आणि त्या अबला गरोदर महिलेसाठी लढली. केवळ लढलीच नाही तर सर्व प्रकारच्या दबावाला झुगारून जिंकून दाखविली ! त्या बाईला व तिच्या होणाऱ्या बाळाला आणि असलेल्या मुलीला थोडासा का असेना,  काही प्रमाणात का असेना परंतु न्याय मिळवून दिला !

       हे होते चित्रपटाचे कथानक आणि साधारणपणे ॲड. चंद्रू यांची ओळख. आता चित्रपट पाहिल्यानंतर मनामध्ये जे प्रश्न निर्माण होतात, जे बेचैन करतात ते हे की, जर डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना आज अस्तित्वातच नसती तर गोरगरीब कमजोर निर्बल अशिक्षित मागासवर्गीय जनतेच्या हितांचे, त्यांच्या अधिकारांचे रक्षण कसे झाले असते ? अधिकारांचे सोडा त्यांच्या जीवाचे, त्यांच्या इज्जतीचे, त्यांच्या माणूसपणाचे,    रक्षण कसे झाले असते ? त्यामुळे चित्रपट पाहिला की एकच बाब मेंदुवर पुन्हा पुन्हा आघात करते ती ही की,  बाहुबलींच्या या देशात, ताकतवान लोकांच्या या देशात भीमाचा कायदा आहे म्हणूनच आदिवासी, दलित, विमुक्त भटक्या जमाती, मागासवर्गीय, गोरगरीब, महिला, बालके, अनाथ, अपंग लोक सुरक्षित आहेत ! आता हा भाग निराळा की हा पीडित शोषित दूर्लक्षित वर्ग कायद्याची मदत घेण्यास किती सक्षम आहे ? प्रत्यक्षात कायदा नेमका कुणासाठी काम करतो ? कायदा, शासन, प्रशासन, खासकरून पोलिस यंत्रणा व न्याय व्यवस्था वरील गोर गरीब वंचित मागास उपेक्षित दुर्लक्षित जनसमूहाच्या हक्क अधिकारांचे रक्षण करण्यासाठी किती कटिबद्ध आहे ? या व्यवस्थांचा लाभ घेण्यासाठी ही जनता किती सबळ व सक्षम आहे ? हा चिंतनाचा व संशोधनाचा विषय जरी असला तरी या यंत्रणा अस्तित्वात आहेत याचे श्रेय डॉ. बाबासाहेबांना जाते आणि त्यासाठी सर्वांनी त्यांच्याप्रती कृतज्ञ असलेच पाहिजे.

     मनापासून चित्रपट पाहणारा प्रत्येक जण चित्रपट संपल्यानंतर खिन्न होतो, उदास होतो, निराश होतो आणि काही वेळाने पुन्हा एकदा त्याच्या मध्ये एक प्रकारची उर्जा, एक प्रकारची शक्ती देखील संचारते ! आत्मविश्वास येतो की आपल्या रक्षणासाठी कोणीतरी (काहीतरी) आहे! याचा व्यवस्थित उपयोग करून घेतला, तो करून घेण्यासाठी शिक्षण घेतले, सक्षम बनले तर अन्याय होणार नाही, केला जाणार नाही व झालाच तर त्याचा प्रतिकार करून न्याय मिळवता येऊ शकतो ! अशाच प्रकारची शक्ती माझ्या मध्येही संचारली आणि म्हणूनच मी दोन शब्द लिहिण्याचा निर्णय घेतला. मला असे वाटते की सर्व या वंचित आणि कमजोर घटकांनी कसल्याही परिस्थितीमध्ये, कुठलेही कारण न सांगता, प्राप्त परिस्थितीवर मात करून, जमेल तसे (हवे तर भलेही एक वेळ उपाशी राहण्याची वेळ आली तरी बेहत्तर) परंतु  शिक्षण आणि तेही उच्च शिक्षण मात्र घेतलेच पाहीजे. त्यातही कायद्याचे शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. सोबतच आपण अधिकाधिक शासनामध्ये प्रशासनामध्ये  जाणे अत्यंत गरजेचे आहे. आपण समाज म्हणून तर एकजूट झालेच पाहिजे परंतू सोबतच मतदार म्हणून देखील एकजूट होणे काळाची गरज आहे. आपल्यातील तपास अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व वकील मंडळी यांनी आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक व समाजाप्रती संवेदनशील व सहानुभूतीपूर्ण असले पाहिजे. परंतु प्रश्न असा आहे की आज मागासवर्गीयांमधील वंचितांमधील म्हणजे आपले म्हणवणारे किती वकील आपल्याच लोकांवरील अन्याय-अत्याचारा विरोधातील केसेस मोफत लढतात ? वकिलीचा धंदा करणाऱ्या आपल्याच लोकांना सामाजिक बांधिलकी व सेवाभाव समजून सांगावा तर कसा व कोणी ? आणि मग समाजाने तरी आपल्याच समाजातील डॉक्टर वकील आधिकारी झालेल्या लोकांचा अभिमान तरी का बाळगावा ? संगिनी न घाबरता, न डगमगता आणि कुठल्याही प्रकारच्या आर्थिक आमिषाला बळी न पडता लढली ! हातात एक आणि पोटात एक अशी दोन लेकरे सोबत घेऊन लढली ! परंतु आज आपण काय पाहतोय ? दुर्दैवाने कितीतरी पोरी बायका, त्यांचा परिवार पैशापुढे अन्याय-अत्याचाराला, इज्जतीला, अस्मितेला गौण स्थान देतात ! पैसे घेऊन तडजोड करतात ! हे दुर्दैवी वास्तव कसे काय नाकारता येऊ शकेल ? याने शोषकांचे आत्मबल वाढते. काळ सोकावतो. समाजमन बोथट होते व परिणामी जेव्हा अशा दुर्दैवी अन्याय अत्याचारकारक घटना घडतात तेव्हा त्याचे इतर समाजाला,  प्रसारमाध्यमांना विशेष वाईट वाटत नाही ! 

      आज समाजसेवक भरपूर आहेत ! समाजसेवी संस्था भरपूर आहेत परंतु मैत्री सारखी समाजसेविका जी आदिवासी पाड्यावर वस्त्यांवर जाऊन शिक्षणासारखे पवित्र कार्य मोफत करते ! आशा समाजसेविका किंवा समाजसेवक किती आहेत ? पेरूमल स्वामींसारखे निर्भिड प्रामाणिक व अंतरात्म्याचा आवाज ऐकणारे आय. जी. किंवा पोलीस अधिकारी किती आहेत ? हे असे काही तीव्र धारदार व टोकदार प्रश्न आहेत जे ' जय भीम ' विचारतो ! ' जय-भीम ' एक आरसा आहे जो यंत्रणा व समाजाची वास्तवता किंवा सत्य प्रतिमा दाखवतो ! जी पाहण्याचे आपल्यात हिम्मत नाही ! वास्तव स्वीकारण्याची ताकद नाही आणि पाहिलेच तर शरमेने मान खाली झुकविण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही कारण आपल्याला आपल्या मनासारखे, मनाच्या समाधानासाठी खोटेनाटे का असेना परंतु स्वतः काढलेले किंवा कोणाकडून काढून घेतलेले किंवा डाऊनलोड केलेले चित्र मोठ्या थाटाने आणि फुशारकीने फ्रेम करून भिंतीवर लावण्याची व रात्रंदिवस तेच पाहण्याची सवय होऊन गेली आहे ! परंतु आपण हे विसरतो की हे चित्र जे आपण फ्रेम केलेय ते सत्य नाहीये ! सत्य चित्र प्रचंड व्याकुळ करणारे आहे.

      ' जय भीम ' सत्यावरचा भ्रामक पडदा उठवतो. शासन प्रशासनातील व्यक्तीसापेक्षता भ्रष्टाचार बेकायदेशीरपणा झुंडशाही ठोकशाही या कटू वास्तवाचे शवविच्छेदन करतो. पोलीस हेच सर्वात मोठे गुंड आहेत हे परखडपणे आणि निर्भीडपणे जगासमोर आणतो. पोलीस कायदा आणि न्यायव्यवस्था कुणासाठी आहे ? किती गोर गरीब मागासवर्गीय व अशिक्षित तथा अल्पशिक्षित लोक आपल्या इज्जतीचे, मोडक्यातोडक्या संसाराचे, आपल्या मानवी अधिकारांचे रक्षण या सर्व यंत्रणांचा लाभ घेऊन करण्यास सक्षम आहेत असा खडा व रोखठोक सवाल विचारतो. ' जय भीम ' झणझणीत अंजन घालतो त्या माध्यमांच्या डोळ्यात, त्या सर्वच व्यवस्थांचा डोळ्यात ज्या देशांमध्ये कायद्याचे राज्य आहे! स्वातंत्र्य, लोकशाही, राज्यघटना आहे असे म्हणतात त्यांच्या !

     अशा प्रकारे ' जय भीम ' एक कहाणी आहे सामाजिक विषमतेची शोषणाची भेदभावाची आणि सर्व क्षेत्रातील मागास घटकांची. जय-भीम व्यथा मांडतोय कायद्याच्या निरंकुश अनिर्बंध व खोट्या दूरोपयोगाच्या बळी ठरत असलेल्या मागासवर्गीयांची! 'जय-भीम ' एक कहाणी आहे गरिबीतही प्रामाणिकपणे परिश्रमाने मोठे होऊ इच्छिणाऱ्या कष्टाळू लोकांची आणि त्यांचे पाय ओढणाऱ्या, त्यांना पुन्हा दलदलीमध्ये ओढत आणणाऱ्या निष्ठुर समाजव्यवस्थेची ! जय-भीम प्रेम कहानी आहे झोपडीतील पती पत्नींची ज्यांचे स्वतःचे हक्काचे पक्के घर बांधणे हेच अंतिम स्वप्न आहे जे पुरे करण्यासाठी घाम गाळून, पै पै जमा करतात परंतु दुर्दैवाने ते पुरे होऊ शकले नाही ! जय भीम कहाणी आहे खऱ्या अर्थाने समाजसेवा कशी करावी हे सांगणाऱ्या मैत्राची आणि एका जिगरबाज वकिलाची ! एक असा वकील जो प्रामाणिक आहे ध्येयवेडा आहे. त्याची कायदा व न्याय यावर असीम निष्ठा आहे. जो निर्भिड आहे. ही कहाणी आहे भ्रष्ट व लबाड तसेच पूर्वग्रहदूषित पोलीस यंत्रणेची जी राजकारण्यांच्या व वरिष्ठांच्या दबावाखाली काम करते.  सत्याला असत्य आणि असत्याला सत्य म्हणून सादर करते ! जी खर्‍या गुन्हेगारांना सोडून खोट्यांना गुन्हेगार बनविते ! अथवा गुन्हेगार सिद्ध करते! त्यांच्या चारित्र्याला कलंकित करते. ही कहाणी आहे उच्च-निचतेने बरबटलेल्या सामाजिक विषमतेची ! ' जय-भीम ' कहाणी आहे एका कधीही न संपणाऱ्या लढ्याची!!

     ' जय-भीम ' ओरडून सांगतोय की, औद्योगीकरण, यांत्रिकीकरण, कायदे यामुळे असंख्य जमातींचे असंख्य  महत्त्वपूर्ण समाजोपयोगी पारंपारिक व्यवसाय गेले आहेत. त्यांचे रोजगार संपुष्टात आले आहेत. बेरोजगारी वाढली आहे व परिणामी त्यांच्या पदरी निराशा व हताशा आली आहे परंतु दारिद्र्यातही प्रामाणिकपणे कष्ट करून ते स्थिती परिवर्तन करू पाहणाऱ्या जमातींवरील  ' गुन्हेगारीचा ' ' अस्पृश्यतेचा ' कलंक अद्यापही संपुष्टात आलेला नाही. पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था व संपूर्ण समाज मनच आजही या जमातींना त्यांच्या पारंपारिक व्यवसायावरून जातीवरून ओळखत बोलवत व हिणवत आहे. त्यांचे शोषण करीत असल्याचे त्यांना तुच्छ मानत असल्याचे, जातीवाचक बोलत असल्याचे ' जय भीम ' ओरडून ओरडून सांगतोय.

    जय-भीम प्रकर्षाने दाखवून देतोय की, अजूनही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही या देशांमध्ये लाखो-करोडो आदिवासी दलित विमुक्त आणि भटक्या जमातींमधील लोक बेघर भूमिहीन आहेत! एवढेच नाही तर त्यांच्याकडे त्यांच्या जातीचे, त्यांच्या ओळखीचे पुरावे देखील नाहीत! त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे शौचालय तर सोडा त्यांच्यासाठी हक्काची स्मशानभूमी देखील नाही ! त्यांचे शासन प्रशासनात प्रतिनिधित्व तर सोडा त्यांना किमान मतदान करण्याचा मतदार म्हणून अधिकार देखील नाही ! ' जय भीम ' ओरडून सांगतोय की लोकशाही गणराज्य असणाऱ्या या देशांमध्ये अजूनही एक वर्ग पारतंत्र्यातच आहे ! त्यांच्यापर्यंत ना लोकशाही ना राज्यघटना पोहोचली आहे!!

     दुर्दैवाने ही बाब सवर्णांच्या किंवा सनातन्यांच्या तर सोडा कारण त्यांना ती लक्षात घ्यायचीच नाही परंतु आदिवासी दलित आणि विमुक्त भटके यांच्या देखील लक्षात येत नाही! देशात खरी समस्या ' धर्म ' नसून ' जात ' आहे जोवर जातींमधील विषमता उच्चनीचता संपुष्टात येत नाही तोवर धर्माचे निरर्थक भूषण बाळगणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. जर धर्म मजबूत करायचा असेल तर जातीयता संपुष्टात आणली पाहिजे. ब्रिटिश कालीन क्रिमिनल ट्राईब्ज ॲक्ट संपुष्टात येऊन तयार झालेल्या हॅबिच्युअल ऑफेंडर्स ॲक्ट खाली पोलिस यंत्रणेकडून वारंवार खोट्या बनावट केसेस केल्या जातायेत ! निष्कारण पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून ठराविक जमातींना अडकवले जातेय ! या पाठीमागे त्यांचा हेतू सॉफ्ट टार्गेटला टारगेट करणे हा असतो. आपले अपयश लपविण्यासाठी, मिडीयाला व वरिष्ठांना शांत करण्यासाठी तसेच पदोन्नतीतचे बक्षीस मिळविण्यासाठी आणि नसलेली कर्तव्यदक्षता दाखविण्यासाठी  देशभरातील अनेक निरपराध जमातींच्या खास करून विमुक्त म्हणजे डीनोटिफाईड जमातींच्या हजारो- लाखो लोकांना जाणीवपूर्वक लक्ष करून त्यांचे शोषण केले जाते. हे दाहक वास्तव या ' जय-भीम ' च्या माध्यमातून प्रकर्षाने समोर आले आहे! मग ते कोणी स्वीकारो अथवा ना स्वीकारो. महान समाजसेविका तथा साहित्यिक स्वर्गीय महाश्वेतादेवींसह अनेक विमुक्त भटक्या चळवळीमधील सामाजिक कार्यकर्ते मागील पाऊण शतकांपासून हा काळा कायदा बरखास्त करण्याची मागणी करीत आहेत परंतु सरकार मात्र आश्वासनांपलीकडे काहीही देत नाही! तुमचा विश्वास बसणार नाही परंतु आपल्या देशात दररोज सरासरी पाच कस्टोडीयल डेथ्स होतात म्हणजे दररोज सरासरी पाच लोक पोलीस स्टेशनमध्ये कस्टोडी दरम्यान मरतात!

     सनातनी व सवर्ण सतत ' जात संपली पाहिजे ' म्हणून बोंबा मारत असतात परंतु बोलताना मात्र जातीवरूनच बोलत असतात ! वागणूक देताना मात्र जातीवरूनच देतात ! आणि रोटीबेटी व्यवहार करताना देखील जात डोळ्यासमोर ठेवूनच करतात ! हे या लोकशाहीप्रधान घटनात्मक देशाचे वास्तव आहे. असा देश ज्या देशांमध्ये तेहतीस कोटी देव आहेत ! त्या देशाचे हे वास्तव आहे.  असा देश जिथे स्त्रीला देवी म्हटले जाते परंतु त्याच देशातील आदिवासी दलित विमुक्त भटक्या जमातींमधील महिलांची वस्त्रे उतरवताना ना पोलीसांना ना सवर्णांना  देवी-देवतांची आठवण होते! अशा देशातील हे वास्तव आहे आणि वास्तव हे नेहमी कटू असतेय. आपण हे समजून घेतले पाहिजे की यांच्या लेखी किंवा यांच्या तोंडी जात संपली पाहिजे म्हणजे, ' आरक्षण संपले पाहिजे ' मागास जाती जमातींचे ' कायदेशीर संरक्षण संपले पाहिजे ' असे यांना म्हणायचे असतेय. 

   ' जय-भीम ' चित्रपट केवळ खोट्या केसेसमध्ये अधिवासी दलीत विमुक्त भटक्या जमातींमधील  निरपराधांना अडकवून त्यांचे कसे शोषण केले जातेय एवढेच सांगत नाही तर मानवाधिकारांच्या होत असलेल्या उलंघनाचे, जातीय विषमतेच्या दाहक वास्तवाचे सत्य उलघडून दाखवतोय आणि धर्म श्रेष्ठत्वाचा माजही उतरवतोय! जातीय विषमतेमुळे धर्माचे पारिपत्य होते, धर्म लयास जातो, धर्मांतरे होतोत हे वास्तव समजून सांगतोय. बहुसंख्य बहुजनांच्या आपल्या देशात समता न्याय संधी व प्रतिष्ठा मात्र अद्यापही अल्पसंख्यांक आहे ! त्यामुळे जागे व्हा, काल्पनिक मोठेपणाच्या व प्रतिष्ठेच्या मागे धावण्यापेक्षा वास्तवाचा स्विकार करून परिस्थिती परिवर्तनासाठी आपल्या लोकांना न्याय मिळावा यासाठी आपले शक्य तेवढे योगदान द्या हे सांगतोय. " चोर सोडून संन्याशाला फासावर लटकविणारा हा क्रुर कायदा म्हणजे 

   " हॅबिच्युअल ऑफेंडर्स ॲक्ट " बरखास्त होणे अत्यंत आवश्यक आहे, जो खोट्या केसेसमध्ये ठराविक जमातींच्या लोकांना अडकविण्याचा पोलिसांना एक प्रकारे परवानाच देतोय हे सांगतोय.

    भलेही भिमाचा म्हणजे डॉ. बाबासाहेबांचा किंवा त्यांच्या जीवनचरित्राचा व ' जय भीम ' चित्रपटाचा दूर दूर पर्यंत संबंध नसला तरी चित्रपट निर्मात्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर केला आहे हा सनातन्यांचा किंवा काही वाट चुकलेल्या बुद्धीवाद्यांचा आरोप तकलादू आहे असे मला वाटते. मला असेही म्हणावे वाटते की त्यांना " जय भीम "  म्हणजे काय ?  याचा अर्थच व्यवस्थित समजलेला नाही.  ' जय-भीम ' म्हणजे कायदा न्याय संघटन सहकार्य संघर्ष व शिक्षण ! जिथे जिथे या बाबी येथील तिथे तिथे भीम येईलच...

     चित्रपटाच्या नावाला विरोध करणारे मूर्ख नसून चलाख आहेत ! कारण ' भीम ' नावातच एवढी शक्ती आहे की चांगल्या चांगल्यांची फाटते ! जरी चित्रपटाचे नाव ' जय भीम ' आहे परंतु म्हणून चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद हा केवळ नावामुळे मिळतोय असे म्हणणे म्हणजे एका सुंदर कलाकृतीचा अपमान ठरेल. वास्तव घटनेवर आधारित कथानकावर दिग्दर्शकासह सर्व कलाकारांनी प्राण ओतून निर्माण केलेला हा सिनेमा कोण्या दुसऱ्या शिर्षकाखाली प्रदर्शित झाला असता तरी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलाच असता यात शंका नाही परंतु जेव्हा चित्रपटाचा आत्मा व प्रेरणाच ' भीम ' आहे तेव्हा तो त्यापासून वेगळा करताच कसा येईल?

     ' जय भीम ' चा अर्थ चित्रपटाच्या शेवटी खूप व्यवस्थित समजून सांगितला आहे. तो आपण समजून घेणे खुप गरजेचे आहे. " जय भीम म्हणजे एक प्रकाश जो अंधाराकडून सन्मानजनक प्रकाशाकडे नेतो. जय भीम म्हणजे प्रेम ! जो दुःखितांचे मायेने अश्रू पुसतो, सहकार्य करतो व दुःखात साथ देतो. सनदशीर व कायदेशीर मार्गाने अन्यायाचा प्रतिकार व न्यायाचा आग्रह म्हणजे जय भिम ! लाखो दुःखी पिडीत अन्याय अत्याचार ग्रस्त शोषित जनतेचे अश्रू म्हणजे जय भिम !

 "जय भीम "  म्हणजे एक प्रवास....  अंधारातून प्रकाशाकडे!! 


-बाळासाहेब धुमाळ

मो. 9421863725

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...