आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

अत्याधुनिक “जिल्हा माहिती भवन” उभारण्यासाठी शासनाकडून तत्वत: मान्यता

 अलिबाग(जिमाका) :- आधुनिक काळाच्या गरजेनुसार जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती व  तंत्रज्ञानावर आधारीत अत्याधुनिक इमारत व सुसज्ज मनुष्यबळ असणे आवश्यक आहे.  भविष्याचा अचूक वेध घेवून दूरदृष्टी ठेवून कार्यरत असणाऱ्या माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी ही गरज ओळखली आणि त्यादृष्टीने त्या अद्ययावत “जिल्हा माहिती भवन” उभारण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्नशील होत्या.

     त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून जिल्हा माहिती भवन उभारण्याकरिता जागा उपलब्ध करून देणे व पुढील कार्यवाही करण्यासाठी तत्वत: मंजूरी देण्यात आली आहे. 

     पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे नियोजित “जिल्हा माहिती भवन” विषयी असे मत आहे की, आधुनिक काळात माहिती व तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करुन विविध प्रसारमाध्यमांपर्यंत तसेच जनतेपर्यंत शासनाच्या योजनांची तसेच शासनाच्या विविध कामांची माहिती तत्परतेने पोहोचविणे, ही एक अत्यावश्यक बाब बनली आहे.  “जिल्हा माहिती कार्यालय” नेमके हेच काम करते. त्यांच्या या कार्याला अधिक सुसूत्रता येण्यासाठी, त्यांचे कार्य अधिक गतिमान होण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन प्रसिध्दीविषयी कामकाज अधिक उत्तमरित्या होण्यासाठी त्याचबरोबर प्रसारमाध्यम प्रतिनिधींना जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून माहिती प्रसारणाच्या कामाच्या दृष्टीने अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळण्यासाठी हे अद्ययावत “जिल्हा माहिती भवन” निश्चित उपयुक्त ठरेल. 

     या प्रस्तावित जिल्हा माहिती भवनामध्ये जिल्हा माहिती कार्यालय, मिनी थिएटर, मिनी स्टुडियो, माहिती व तंत्रज्ञान कक्ष, मीडिया सनियंत्रण कक्ष, प्रदर्शन दालन, विविधोपयोगी सभागृह, डिजिटल वाचनालय, प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता अद्ययावत प्रसारमाध्यम कक्ष,आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र  अशा विविध बाबी नियोजित आहेत.

      पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या दूरदृष्टीमुळे रायगड जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण ठरेल असे अद्ययावत “जिल्हा माहिती भवन” उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक पुढील कार्यवाही लवकरच गतिमान होईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: