आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

क्लिन इंडिया अभियानांतर्गत वडखळ येथे “प्लास्टिक कचरा संकलन” मोहीम संपन्न

 

पेण- क्लिन इंडिया अभियानांतर्गत नेहरू युवा केंद्र, अलिबाग-रायगड, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग, पेण तालुक्यातील ग्रामपंचायत वडखळ, रूरल अँड यंग फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “प्लास्टिक कचरा संकलन” मोहीम  (दि.21 ऑक्टोबर) रोजी राबविण्यात आली.

      नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक परेश म्हात्रे, पूजा खाडे, स्वयंसेवी संस्थांचे 20 सदस्य आणि वडखळ पंचायतीचे सरपंच श्री. मोकल, उपसरपंच, महिला प्रतिनिधी, कर्मचारी वृंद, प्रदीप म्हात्रे, सखाराम भगत, समिक्षा मलव, ग्रामसेवक श्री. धोत्रे या सर्वांनी सकाळी 8 ते 10 या वेळेत वडखळ बस स्थानक, ग्रामपंचायत परिसर, पेट्रोल पंप परिसर, महामार्गावरील सर्व दुकाने आणि बाजारपेठ या परिसरातील जवळ जवळ 850 किलो  फक्त प्लास्टिक कचरा गोळा करून जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या वाशी येथील पुनर्निर्माण केंद्रावर पंचायतीच्या गाडीने पाठविला. यासाठी जे.एस.डब्‍ल्यू कंपनीचे सामाजिक कार्य अधिकारी श्री.रसिक काळे आणि किरण म्हात्रे यांनी मोलाचे सहकार्य केले.

      यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी श्री.निशांत रौतेला, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा समन्वयक श्री.जयवंत गायकवाड, रूरल अँड यंग फौंडेशनचे अध्यक्ष कमलेश ठाकूर हे या मोहिमेत सहभागी झाले होते.

      या प्रसंगी श्री.जयवंत गायकवाड यांनी आपल्या मनोगतात वडखळ पंचायतीच्या या उपक्रमातून “एक दार आठवड्याला एक दिवस प्लास्टिक कचरा संकलन” ही संकल्पना राबविण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर विविध बचतगट, संस्था, युवा मंडळांचा सहभाग वाढावा म्हणून वार्षिक कॅलेंडर च्या माध्यमातून नियोजनाची नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्याची तसेच प्लास्टिकमुक्त पंचायतीकडे वाटचाल कशी करता येईल, यासाठी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे, असे विचार मांडले.  

     हा उपक्रम प्रत्यक्ष राबविताना स्वतः सरपंच संस्थेच्या प्रतिनिधींबरोबर सर्व व्यापारी वर्गाला मेगा फोन वरून प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे आवाहन करीत होते.त्याचबरोबर ते स्वत:ही स्वयंसेवकांबरोबर खांद्याला खांदा लावून कचरा गोळा करताना दिसले. यात पंचायतीच्या सर्व महिला प्रतिनिधींनी देखील पुढाकार घेतला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: