आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

विविध शासकीय कार्यालये उरण शहरातच राहावेत यासाठी निवेदन

उरण - उरण शहरातील टपाल कार्यालय, तलाठी कार्यालय, सर्कल कार्यालय, कृषी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय इत्यादी सरकारी आस्थापना ज्या सुरुवातीपासून गेल्या अनेक वर्षांपासून उरण शहरात कार्यरत होत्या मात्र हे शासकीय कार्यालय आता उरण शहराबाहेर स्थलांतरित झाल्याने नागरिकांची खूप मोठी गैरसोय होत आहे सदर शासकीय कार्यालय पुन्हा उरण शहरात स्थलांतरित करण्यात यावेत यासाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे,गटविकास अधिकारी पंचायत समिती नीलम गाडे यांना निवेदन देण्यात आले आहे.

 उरण तालुक्यातील गावातील नागरिक जेंव्हा एक काम घेऊन शहरात येतो त्यावेळी वेळ आणि पैसा वाचावा म्हणून तो त्याच दिवशी इतर सरकारी, खाजगी कामे, बाजाराहाट इत्यादी कामे उरकून घेत असतो. शेतकरी वर्ग आणि इतर नोकरदार, व्यावसायिक सुद्धा आपापल्या कामाचे नियोजन करून शहरात येत असतात. शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असल्यास शहरातील नागरिकांना व लांबून आलेल्या नागरिकांना कामे करणे सुलभ होते. परंतु उरण शहरातील अनेक महत्त्वाची कार्यालये उरण शहराबाहेर स्थलांतरित झाले आहेत.काही कार्यालये दोन-तीन किलोमीटरवर तर काही कार्यालये 5-6 किलोमीटर अंतरावर स्थलांतरित  झाल्याने नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. महत्वाची कार्यालये उरण शहराबाहेर स्थलांतरित झाल्याने वेळ श्रम पैसा जास्त खर्च लागत आहे.भर ऊन,पावसात इकडेतिकडे हेलपाटे मारावे लागत आहे. अनेकदा नागरिकांना एकाच कामासाठी अनेकदा फेऱ्या मारावे लागतात. त्यामुळे जास्त वेळ पैसा श्रम खर्ची घालावे लागत आहे.त्यात ज्येष्ठ नागरिक, महिला,अपंग,विद्यार्थी वर्गाची खूप अडचण होत आहे.त्यामुळे सदर विविध शासकीय कार्यालयांसाठी उरण शहरांमध्येच त्वरित जागा उपलब्ध करून देण्यात यावी. या बाबतीत नवीन इमारत/ इमारती बांधण्यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी शासन स्तरावर पत्रव्यवहार करावा अशी मागणी उरण सामाजिक संस्थेने तहसीलदार, गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे पत्र व्यवहाराद्वारे केली आहे. त्यासाठी उरण सामाजिक संस्थाही पुढाकार घेईल. व आवश्यक ते सर्वतोपारी मदत करण्यास तत्पर असल्याचे उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: