आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ मे, २०२१

आरोग्याचे रक्षण हे रोगाच्या इलाजापेक्षा नक्कीच जास्त महत्त्वाचे असते !! डॉ. सौ स्वाती गाडगीळ यांचे आडवलीतील आर. ए.यादव हायस्कूल मधील मुलींना मार्गदर्शन

सिंधुदुर्ग : मासिक पाळीस्वच्छता व व्यवस्थापन सप्ताह निमित्त रविवार दिनांक ३० मे २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, आडवली येथे आर. ए. यादव शाळेतील विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीच्या दिवसातील स्वच्छता आणि आरोग्य या विषयावर डॉ. सौ. स्वाती गाडगीळ यांनी ऑनलाईन चर्चासत्र घेतले. 
Mission Menstrual Hygiene हा राज्यव्यापी कार्यक्रम त्यांनी या वर्षी हाती घेतला आहे. त्यांची एनजीओ डोंबिवली वूमेंस वेल्फेअर सोसायटी गेली दहा वर्ष अनेक सामाजिक प्रश्नांवर काम करीत आहे. वयात आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना मासिक पाळीच्या दिवसात वापरण्याचे नॅपकिन्स देण्यात येतात आणि आर्थिक स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात पैश्याचा गल्ला दिला जातो, ज्या मध्ये अगदी एकच रूपया रोज टाकला तरी महिन्याच्या शेवटी नॅपकिन्स विकत घेता येतील एवढे पैसे जमतात असे त्या समजावून सांगतात. रोगाचा इलाज करण्यापेक्षा, आरोग्य राखण्यासाठी नक्कीच कमी पैसे खर्च होतात हे प्रबोधन त्यांनी केले. शासनाच्या मासिक पाळीतील आरोग्य या योजने अंतर्गत आशा सेविकांद्वारे घरोघरी देण्यात येणारे सहा sanitary नॅपकिन्सचे पाकीट केवळ सहा रुपयात मिळते याची माहिती मुलींना आणि वारंग मॅडम ना दिली जेणेकरून त्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन त्याची हक्काने मागणी करू शकतात. मासिक पाळीच्या काळात अंगावरून जास्त जात असेल तर हिमोग्लोबिनची मात्रा कमी होते आणि रक्ताच्या तपासणीतून ते कळू शकतं. हिमोग्लोबीन कमी असल्यास थकवा येतो, झोप येते, आणि पुढे आरोग्याच्या निरनिराळ्या तक्रारी सुरू होऊ शकतात. म्हणून लौकर निदान होणे गरजेचे असते. ओटीपोटाचा क्षयरोग किंवा अन्य जंतूंची बाधा झाली तर वंध्यत्व येणं, अनियमित पाळी येणं, पाळीच्या दिवसात असह्य वेदना होणं असे त्रास होऊ शकतात. स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला वेळीच घेतला तर शरीरावर होणारे विपरीत परिणाम टाळता येतात हे डॉ. स्वाती गाडगीळ यांनी मुलींना सोप्या भाषेत समजावून सांगितलं. 
    जास्तीतजास्त महिलांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे असं त्या म्हणतात कारण एक डॉक्टर म्हणून आणि समाजसेविका या नात्याने प्रत्येक महिलेचे आयुष्य आरोग्यपूर्ण असावे हा विडा त्यांनी उचलला आहे आणि या कामात, केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर अगदी दुर्गम आणि ग्रामीण भागातील मुली आणि महिला सुद्धा मोलाची मदत करू शकतात.
  आरोग्याचे रक्षण हे रोगाच्या इलाजापेक्षा नक्कीच जास्त महत्त्वाचे असते. हा उपक्रम मालवण तालुक्यातील आडवली गावापर्यंत नेण्याचे श्रेय श्री. सुंदर बाणावलीकर यांना जाते. आर. ए. यादव शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुषार सकपाळ आणि सौ. वारंग मॅडम यांच्या पुढाकाराने आजचा कार्यक्रम यशस्वी झाला. ही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्याची सुरुवात आहे. त्यांचे सहकार्य आणि सहभाग इथून पुढे देखील खूप मोलाचा ठरणार आहे.या मार्गदर्शन वर्गासाठी प्रशालेचे माजी विध्यार्थी श्री सुंदर बाणावलीकर व डॉ. सौ. स्वाती गाडगीळ यांचे सर्वोदय एज्युकेशन सोसायटी, मुंबईचे संस्था अध्यक्ष,सर्व संस्था पदाधिकारी,सदस्य.अध्यक्ष,शाळा समिती,सदस्य,तसेच सर्व निमंत्रित सदस्य आडवली प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या तर्फे आभार मानण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...